Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Khari Kujbuj Political Satire: आरोग्य मंत्री विश्‍वजीत साहेबांनी आपले वजन एकदम घटवले आहे. त्याबद्दल सर्वत्र आश्र्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Sameer Amunekar

विजय मुख्यमंत्री झाले तर...

आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यातील कोळशाची वाहतूक कायमची थांबवण्याची मागणी करून, एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘मी मुख्यमंत्री झालो तर गोव्यात फक्त आवश्यक तेवढाच कोळसा येईल. या वक्तव्याने, ‘तुम्हीच गोव्याचे मुख्यमंत्री व्हा’ अशा आशयाच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. सरदेसाईंच्या या थेट वक्तव्यानंतर, मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण त्यांनी मौन धारण केले. मुख्यमंत्र्यांच्या या मौनामुळे, राज्यात नवीनच चर्चा मात्र सुरू झाली. काही लोक म्हणतात की, ‘सरदेसाईंनी सत्य मांडले आणि मुख्यमंत्र्यांकडे उत्तरच नव्हते’, तर काहीजण म्हणतात की, ‘सरदेसाईंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेला जाहीरपणे वाट मोकळी करून दिली.’ या संपूर्ण घटनेमुळे, आता मुख्यमंत्र्यांचे मौन हेच चर्चेचा विषय बनले आहे. या मौनाचा नेमका अर्थ काय, हे गोवावासीयांना अजून समजले नाही, पण यावर तर्क-वितर्क लढवणे मात्र सुरूच आहे. ∙∙∙

आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

आरोग्य मंत्री विश्‍वजीत साहेबांनी आपले वजन एकदम घटवले आहे. त्याबद्दल सर्वत्र आश्र्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात एका मुलाखतीत विचारले असता, आपण जास्त समोसे खात नाही, जर खाल्ले असते तर वजन घटले नसते. त्यांनी आणखी एक कारण सांगितले की ते दिवसातून केवळ एका वेळेचे जेवण घेतात. आहारावर नियंत्रण ठेवल्याचे हे परिणाम आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. ज्यांना वजन घटवायचे आहे त्यांनी आपल्या प्रमाणे ‘री’ ओढावी असे तर आरोग्य मंत्र्यांना सांगायचे तर नाही ना. यात काही गैर मुळीच नाही. आहे की नाही, चांगला सल्ला.

रेजिनाल्‍ड ‘बोलणार’?

गत विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आलेक्‍स रेजिनाल्‍ड यांनी कुडतरीतून अपक्ष म्‍हणून निवडणूक लढवली आणि ते आमदार म्‍हणून जिंकूनही आले. त्‍यानंतर त्‍यांनी सत्तेवर आलेल्‍या भाजपला ‘हात’ दिला आणि उद्योग महामंडळाचे अध्‍यक्षपदही मिळवले. काँग्रेसमध्‍ये असताना रेल्‍वे मार्ग दुपदरीकरण, कोळसा या विषयांवरून त्‍यांनी नेहमीच भाजप सरकारवर निशाणा साधलेला होता. त्‍यामुळे आता हा विषय उफाळून आलेला असताना सत्तेत असलेले रेजिनाल्‍ड काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. पण, रेजिनाल्‍ड अजूनही आपल्‍या भूमिकेवर ठाम असल्‍याचे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिसून आले. कॅसिनो, मोपा विमानतळावरून त्‍यांनी भाजप सरकारला टोला लगावलाच. पण, मुख्‍यमंत्री कार्यालयाने ज्‍या अतिरिक्त जमीन संपादनाबाबत स्‍पष्‍टीकरण दिले होते, त्‍यावर बोलताना पुन्‍हा जमीन संपादन नकोच, अशी भूमिका त्‍यांनी घेतली. सत्तेत असलो तरी याबाबत मी माझी स्‍पष्‍ट भूमिका पुढील अधिवेशनात मांडेन अशी हमी त्‍यांनी दिली आहे. पण, भाजप सरकारला पाठिंबा दिल्‍यापासून काही विषयांवरील त्‍यांच्‍या बदलत्‍या भूमिका पाहता खरेच रेजिनाल्‍ड कोळशावरून सभागृह गाजवणार का? असा प्रश्‍‍न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

ढवळीकरांचे ज्येष्ठतेचे सल्ले!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सुदिन ढवळीकरांवर टीका केली, त्यावर ढवळीकरांनी ज्येष्ठतेनुसार त्यांना सल्ले दिले आहेत. आता त्या सल्ल्यांचा विचार ते कसे करतात ते कळेल. परंतु ढवळीकरांनी दुहेरी रेल्वे मार्गाच्या डीपीआरबाबत केंद्रात त्याकाळी असलेल्या काँग्रेसला जबाबदार धरले आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून पाटकरांना आपल्या पक्षाचा बचाव करावाच लागणार आहे आणि ते त्यांचे कर्तव्यही आहेत. पाटकर आणि ढवळीकरांच्या वयात जमीन आस्मानचा फरक आहे. पाटकर राजकारणात नसतील तेव्हापासून ढवळीकर राजकारणात आहेत आणि त्यांनी राजकारणातील अनेक चढ-उतारही पाहिले आहेत. त्यामुळे त्यांनी पाटकर यांनी केलेल्या टिकेला टिकेनेच उत्तर दिलेले नाहीत, उलट त्यांना सबुरीचे सल्ले दिले आहेत, तेही ज्येष्ठतेनुसार. पाटकरांना ढवळीकरांनी ‘अजून तुम्ही लहान आहात आणि स्वतःचे अगोदर घर सांभाळावे’ असा सल्ला दिलाय, आता त्या सल्ल्याकडे पाटकर कोणत्या नजरेनं पाहतात हे त्यांनाच ठाऊक.

नुवे बाणावलीत येणार खरी रंगत

तसे पाहिले तर विधानसभा निवडणुकीस दीडेक वर्षाचा कालावधी आहे, पण गोव्यात आतापासूनच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. अन्य मतदारसंघांची बाब वेगळी पण सासष्टीतील नुवे व बाणावलीत वेगळीच रंगत यावेळी दिसेल, असे संकेत मिळू लागले आहेत. बाणावली हा एरवी चर्चिल व मिकी यांचा किल्ला पण आपमुळे त्यांचे सर्व मनोरथ ढासळतील असे चित्र होते. तेथे आपण उभे राहणार असल्याचे चर्चिलनी यापूर्वीच जाहीर केले आहे तर आता मिकी पाशेकोंनी तेथे आपली पत्नी व्हियोलाला उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तेथे कितीरंगी लढत होईल ते पहावे लागणार आहे. दुसरीकडे नुवेत तसेच चित्र आहे, तेथे मिकी म्हणे पूर्ण तयारीनिशी उतरणार आहेत. त्याशिवाय फिडोलनीही तशीच तयारी चालवली आहे. तशात तेथे कॉंग्रेसने उमेदवार उतरवला व भाजपने आपला डमी उमेदवार उभा केला तर नेमके काय होईल, याचा अंदाज राजकीय निरीक्षक बांधू लागलेत.

निवडणुकीची अशीही तयारी...!

आगामी काळात नगरपालिका निवडणुका लागणार आहेत. म्हापसा शहरात अनेक इच्छुकांनी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. यावेळी गणेश चतुर्थीनिमित्त काही प्रभागांत या काही इच्छुकांनी म्हणे कडधान्य वाटप केले, तर एकाने म्हणे आपल्या प्रभागात लोकांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतेवेळी देवासमोर चक्क चांदीचे नाणे ठेवले! त्यामुळे शहरात हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा प्रभाग तसा राजकीयदृष्ट्या महत्वाचा. कारण याच प्रभागात म्हणे आजी-माजी नगरसेवक आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी धडपडत आहेत. एकाने तर चवथीपूर्वी सायंकाळच्या वेळी गुपचूप जाऊन प्रत्येकी घरोघरी कडधान्य वाटप केले. मागील काही वर्षापासून ही व्यक्ती समाजसेवेत बरीच सक्रिय झाली आहे. अशावेळी आगामी निवडणुकीत बाप्पा आशीर्वादाने मतदार नक्की कोणाला कौल देतात, हे निवडणुकीत समजेलच.

दुहेरी रेल्वे मार्ग भाजपच्या पथ्यावर

गोव्यातून जाणाऱ्या द.पश्चिम रेल्वेच्या दुहेरी मार्गावरून सध्या विरोधी क्रांग्रेसने सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करण्यास नेट लावलेला असला व एकजात सगळे कॉंग्रेसवाले सरकारवर तुटून पडत असले तरी सत्ताधाऱ्यांना मात्र हा मुद्दा आपल्या पथ्यावर पडल्याचे वाटते. कारण त्यामुळे राज्यांतील अनेक ज्वलंत प्रश्नांकडे विरोधकांचे दुर्लक्ष झालेले आहे. तशातच सुदिन ढवळीकर यांनी या प्रकल्पाच्या डीपीआरचा मुद्दा उपस्थित करून एकंदजर प्रकरणाचा रोख कॉंग्रेसकडेच वळविल्याने ते नेते एकप्रकारे कोंडीत सापडले आहेत. एक खरे की आपणावर आलेली बाजू उलटविण्याचे जे कसब ङाजपकडे आहे तसे कसब व चलाखी कॅांग्रेस व त्याच्या नेत्यांकडे नाही हे खरे. म्हणूनच प्रवक्ते नेमताना केवळ नावे जाहीर करून भागत नाही, तर त्या पदासाठी त्या व्यक्ती सक्षम असायला हवी, याची काळजी घेणे गरजेचे असते. पण कॉंग्रेसकडे ती घेतली जात नाही तर कोणाची तरी व्यवस्था करण्यावर भर असतो

थ्री ‘कर’नी धरला ताल!

थ्री ‘कर’ अशासाठी म्हटले आहे की, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांच्यात साम्य म्हणजे आडनावातील शेवटचे दोन शब्द ‘कर’ एकत्रितरित्या घेतले गेले आहेत. कवळेकरांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला सावईकर व मडकईकर पोहोचले आणि त्यांनी तिथे भजनावर तालही धरला. विशेष बाब म्हणजे मडकईकरांसाठी हे तीन दिवस ‘लकी’ ठरल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या समाजमाध्यमातील अकाऊंटवर नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. गणपती दर्शनानंतर मडकईकरांची ‘पणजीचा राजा’ गणेशासमोर गुरवारी महापूजा झाली, तिलाही वाढदिवसाचे औचित्य मिळाले. या पूजेवेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यासह इतर मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली, आणि त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही मिळाल्या. तोच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मुलाच्या विवाहाची सरकार दरबारी नोंदणीही पार पडली. त्यामुळे मडकईकरांसाठी हे तीन दिवस आनंददायी ठरलेच, असेच म्हणावे लागेल, विशेष बाब म्हणजे त्यांनी आपला आनंदही काही लपवून ठेवला नाही.

भाटीकर- वेरेकर ‘आमने सामने’?

गणराय काय चमत्कार करेल हे सांगणे तसे कठीणच. आता हेच पहा ना. एरव्ही एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून गणले जाणारे फोंड्याचे मगो नेते डॉ. केतन भाटीकर व काँग्रेस नेते राजेश वेरेकर हे आज येथील बुधवार पेठ गणेशोत्सव मंडळाच्या महानेवैद्याच्या कार्यक्रमावेळी एकत्र आलेले बघायला मिळाले. भाटीकर तिथे आधीच भाविकांना तीर्थ देत होते. तर वेरेकर देव दर्शनाला आले होते. त्यामुळे वेरेकरांना देवदर्शन घेताना भाटिकारांचे दर्शन होणे साहजिकच होते. पण दोघांमध्ये जुजबी बोलण्या पलिकडे काही विशेष झालेले बघायला मिळाले नाही. आणि होणार तरी कसे हो? दोघेही देवाकडे एकच मागणी करणार असल्यामुळे बोलणार तरी काय? नाही का? पण योगायोगाने का होईना ‘आमने-सामने’ आलेल्या या दोघा नेत्यांबद्दल गर्दीने फुललेल्या मंडपात याबाबतीत चर्चा मात्र नंतर बराच वेळ सुरू होती. तरीही गणराय कोणाला पावतो, हे कळण्याकरता २०२७ साल उजाडावे लागेल. एवढे मात्र निश्चित.

लोबोंच्या भेटीगाठी

गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्या त्यांनी जे येतील त्या पंचसदस्यांना पक्षाचे दार खुले केले ठेवले आहे, असे दिसते. त्याशिवाय आम आदमी पक्षानेही जिल्हा पंचायतीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्वबळाची भाषा केली आहे. त्यासाठी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची पणजीत बैठकही पार पडलीय. काँग्रेस आणि भाजप हे या निवडणुकीत स्वबळावर असणार हे नक्की आहे. परंतु सध्या आमदार मायकल लोबो यांच्याकडून ज्या भेटीगाठी सुरू आहेत, त्यावरून ती आगामी २०२७ च्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी तरी नाही ना? असा प्रश्न पडतोय. कारण त्यांनी पेडणे मतदारसंघात गतनिवडणुकीत चर्चेत राहिलेल्या राजन कोरगावकर यांच्या कार्यालयाला भेट दिली आहे. आता या भेटीमागील गुपित फक्त आणि फक्त लोबो यांनाच माहीत असणार आहे. परंतु या भेटीचा विषय भाजपच सोडा पण इतर पक्षांनाही काही दिवस चघळायला मिळालाय, हेही नसे थोडके!

विजयचा ‘आप’ला चिमटा

एकाबाजूने गोव्‍यात भाजपला हरविण्‍यासाठी सर्व विराेधी पक्षांनी एकत्र यावे, अशी भावना व्‍यक्‍त केली जात असतानाच आम आदमी पक्षाने गोव्‍यात आपल्‍याला त्‍यात रुची नाही, असे स्‍पष्‍ट करत आम्‍ही चाळीसही मतदारसंघात उमेदवार उभे करू अशी घोषणा केली आहे. भाजपच्‍या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एकास एक उमेदवार उभा करावा, ही संकल्‍पना हिरिरीने मांडणारे विजय सरदेसाई यांनी काल एका पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे नाव न घेता काढलेल्‍या चिमट्यात येेथे आमच्‍यासारख्‍या पक्षाला चाळीस उमेदवार मिळणे कठीण. अशा अवस्‍थेत बाहेरून आलेल्‍या या पक्षाला चाळीस उमेदवार मिळू शकतील का? आणि चाळीस ठिकाणी उमेदवार उभे केले तर ते जिंकून येऊ शकतील का? असा सवाल केला आहे. यावर ‘आप’चे उत्तर काय असेल बरे?

युवा शक्तीची धूम

राजकारणात येण्याची अनेकांना इच्छा असते. मात्र, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतातच असे नाही. सावर्डे व कुडचडे या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. सावर्डेत तर भाजपला पर्यायच दिसत नाही. भाजपचे आमदार ही सक्रिय आहेत. सावर्डेचे आमदार गणेश गावकर जे सध्या सभापतिपदाचे दावेदार आहेत व तर कुडचडेचे आमदार नीलेश काब्रालही कार्यक्षम आहेत. मात्र, सावर्डे व कुडचडेत दोन युवक भाजपच्या उमेदवारीसाठी दावा करताहेत, हे गुपित लपलेले नाही. दोघेही इच्छुक युवा दावेदार मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांचे खास गणले जातात. आता भाजप व मुख्यमंत्री खरेच यांना उमेदवारी देणार का? उमेदवारी मिळाली तर ते निवडून येणार का? मतदार म्हणतात थांबा व पहा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT