Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज, बाबूश यांच्‍या मनात आहे तरी काय?

Khari Kujbuj Political Satire: सध्‍या मडगावात दिगंबर कामत यांच्‍याविरोधात काँग्रेस आपला उमेदवार म्‍हणून सावियो कुतिन्‍हो यांना पसंती देईल की चिराग नायक यांना? असा प्रश्‍‍न सर्वांना पडलेला आहे.

Sameer Amunekar

बाबूश यांच्‍या मनात आहे तरी काय?

मंत्रिमंडळ बैठकीनंतर बुधवारी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात लगेच मंत्रिमंडळातून निघून गेले. त्याचा वेगवेगळा अर्थ काढण्यात येत आहे. एरव्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते कार्यालयात बराच वेळ उपस्थित असतात. तेथे जाणाऱ्या पत्रकारांशी संवादही साधतात. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर सवयीनुसार पत्रकारांची पावले बाबूश यांच्या मंत्रालयातील कार्यालयाकडे वळली. मात्र ते तेथे उपस्थित नव्हते. तेथे विचारणा केल्यावर कर्मचाऱ्यांनी ते निघून गेल्याचे सांगितले. ते बुधवारी लवकर मंत्रालयातून का निघून गेले असावेत, याविषयी यानंतर तर्क लढवणे सुरू झाले होते.

प्रभव ‘आप’च्‍या दिशेने?

सध्‍या मडगावात दिगंबर कामत यांच्‍याविरोधात काँग्रेस आपला उमेदवार म्‍हणून सावियो कुतिन्‍हो यांना पसंती देईल की चिराग नायक यांना? असा प्रश्‍‍न सर्वांना पडलेला आहे. त्‍यातच आता यापूर्वी काँग्रेसच्‍या उमेदवारीवर डोळा ठेवून दिगंबर कामत यांच्‍याविरोधात आघाडी उठविलेले युवा नेते प्रभव नायक हे काय करतील? असा प्रश्‍‍न सर्वांना पडलेला आहे. सावियो आणि चिराग असताना काँग्रेसमध्‍ये प्रभवची डाळ शिजणार का? हा प्रश्‍‍नही विचारला जात आहे. प्रभवने अजूनही आपले पत्ते खोललेले नाहीत. पण मिळत असलेल्‍या माहितीप्रमाणे, प्रभव म्‍हणे सध्‍या ‘आप’ नेत्‍यांच्‍या संपर्कात आहे. काँग्रेस व ‘आप’ची युती झाली नाही तर मडगावातून ‘आप’ची उमेदवारी आपल्‍याला मिळू शकते असे वाटल्‍यानेच प्रभव ही चाल खेळत आहे, अशी कुजबूज आहे.

कवठणकरांचे ‘आत–बाहेर’

सुनील कवठणकर हे प्रदेश काँग्रेसचे तसे एक महत्त्‍वाचे नेते. गिरीश चोडणकर अध्‍यक्ष असताना कवठणकरांनी अनेक विषयांवरून भाजप सरकारला धारेवर धरले होते. गत विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्‍वीकारत चोडणकरांनी प्रदेशाध्‍यक्षपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर अमित पाटकर यांची त्‍या जागी नियुक्ती करण्‍यात आली. त्‍यानंतरही काँग्रेस नेतृत्‍वाने कवठणकरांना राज्‍य कार्यकारिणीत घेत त्‍यांच्‍यावर उपाध्‍यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पण तेव्‍हापासून कवठणकर कधी आत, कधी बाहेर अशा पद्धतीने वागत आहेत. नेहमीप्रमाणे काही महिने ‘गायब’ होऊन ते आता पुन्‍हा सक्रिय झाले आहेत. परंतु, मनाने ते काँग्रेसमध्‍ये आहेत की अन्‍य कारणामुळे याचा शोध पाटकरांचे कार्यकर्ते घेत असल्‍याची चर्चा सुरू आहे.

जुनं ते सोनं!

काँग्रेसच्‍या आमदारांनी भाजपमध्‍ये प्रवेश केल्यापासून जुने व नवे कार्यकर्ते यांच्यातील दरी अजूनही कायम आहे. भाजपचे जुने कार्यकर्ते म्हणतात, ‘‘आम्ही एवढी वर्षे तन-मन-धन अर्पण करून पक्षाचा झेंडा फडकवला. आता निवडणूक आली की आमचं नाव तरी कुठं?’’. तर नव्याने आलेले कार्यकर्ते (माजी काँग्रेसवाले) म्हणतात, ‘‘भाऊ, आम्ही आल्‍यामुळे पक्षाची शान वाढली, उमेदवारी आमच्याच खिशात”. आता प्रदेशाध्यक्ष दामू बिच्‍चारे, रोजचं गणित करतायत ‘जुनं ते सोनं की नवं झगमगं?’. अजून उत्तर सापडलेलं नाही. बघुया...कधी या प्रश्‍‍नाचे उत्तर मिळते आणि दामू निर्णय घेतात ते.

मिकीची बाणावलीत पार्टी

विधानसभेची निवडणूक अवघ्‍या दीड वर्षावर आल्‍यामुळे की माहीत नाही, नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको हे सध्‍या नुवे मतदारसंघापेक्षा बाणावली मतदारसंघात अधिक दिसू लागले आहेत. तसेही यापूर्वी मिकीने तीन निवडणुका बाणावलीतून जिंकलेल्‍या आहेत. त्‍यामुळे बाणावलीतील मतदारांबरोबर त्‍यांची उठबस असण्‍यात आश्‍चर्य वाटण्‍यासारखे काही नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी वालंकिणी सायबिणीच्‍या फेस्‍तानिमित्त मिकीचे दोस्‍त मॅथ्‍यू दिनीज यांनी आपल्‍या कोलवा येथील ‘कॅन्‍टूकी’ रेस्‍टॉरंटमध्‍ये आयोजित केलेल्‍या पार्टीला मिकी अगत्‍याने उपस्‍थित होते. त्‍यांनी यापूर्वीच आपण आणि आपली पत्‍नी व्‍हियोला हे दोघेही आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असे जाहीर केले आहे. त्‍यामुळेच मिकी बाणावलीत वारंवार दिसू लागले आहेत की काय?

शिक्षक तो शिक्षकच!

अहंकार माणसाला लहान बनवतो म्हणतात ते खरे. मान देणाऱ्यालाच मान मिळतो हे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकारण्यांना कळत नसावे. परवा कुंकळ्‍ळी पालिका बैठकीत सगळ्यात युवा नगरसेवक उदेश देसाई व सगळ्यात वयाने ज्‍येष्ठ नगरसेवक डॉ. लक्ष्मण नाईक यांच्यात बरीच जुंपली. फिश मिल प्रकल्प आणण्यात लक्ष्मण नाईक यांचा हात असून त्यांना ‘पोटलो’ मिळाल्‍याचा आरोप उदेश देसाई यांनी केला. त्‍यामुळे लक्ष्मण संतापले व त्यांनी रागाच्या भरात उदेश यांना ‘शट अप’ म्हटले. त्‍यामुळे दोघांमध्‍ये जुंपली. ‘शट अप’ याचा अर्थ काय? असे उदेश वारंवार विचारत होते. त्‍यावर लक्ष्मण नाईक यांनी आपल्‍या प्राध्यापकी भाषेत समजावताना ‘शट अप’ म्हणजे ‘तोंड बंद कर’ असे सांगितले. आणि आश्‍चर्य म्हणजे ते ऐकून उदेश गप्प बसले. म्हणतात ना शिक्षक तो शिक्षक!

टॅक्‍सीचालक शोधताहेत रेजिनाल्‍डना

काँग्रेसमध्‍ये असताना आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स टॅक्‍सीचालकांच्‍या प्रश्‍‍नांवर पोटतिडकीने बोलायचे. गोवा माईल्‍सची अंमलबजावणी झाल्‍यानंतर टॅक्‍सीचालकांच्‍या ताळगावातील भव्‍य सभेला उपस्‍थित राहणारे ते एकमेव आमदार होते. त्‍या काळातील प्रत्‍येक विधानसभा अधिवेशनात रेजिनाल्‍डनी हा विषय लावून धरला. त्‍यावर मुख्‍यमंत्र्यांकडून उत्तरे घेतली. पण, २०२२च्‍या आधी काँग्रेसचा त्‍याग करून ते कुडतरीतून अपक्ष लढले आणि निवडूनही आले. त्‍यानंतर त्‍यांनी कोणताही विचार न करता भाजप सरकारला साथ देत उद्योग विकास महामंडळाचे अध्‍यक्षपद मिळवले. तेव्‍हापासून मात्र आक्रमक वृत्तीचे रेजिनाल्‍ड काहीसे मवाळ बनल्‍याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी पेटलेल्‍या कोळसा विषयावर ते आपल्‍या भूमिकेवर ठाम राहिले, पण टॅक्‍सीचालकांकडे मात्र त्‍यांनी पाठ फिरवली. त्‍यामुळे रेजिनाल्‍ड आहेत कुठे? असा प्रश्‍‍न अनेक टॅक्‍सीचालक विचारत आहेत.

सॅमी तावारीस भाजपचे उमेदवार?

‘राजकारण म्हणजे अनिश्चिततेचा खेळ’ अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे. कुंकळ्‍ळी मतदारसंघात भाजपतर्फे निवडणूक जिंकण्याची ताकत असलेला नवीन चेहऱ्याचा शोध घेत असल्याची चर्चा आहे. सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक व तियात्रिस्‍त सॅमी तावारीस यांना भाजप पक्षात घेणार व पुढील विधानसभेच्या निवडणुकीत कुंकळ्‍ळी मतदारसंघात उमेदवारी देणारा अशी चर्चा या मतदारसंघात सुरू झाली आहे. सॅमी तावारीस यांनी हल्लीच भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन राजकीय भविष्याबाबत चर्चा केल्याची चर्चा आहे. सॅमी हे भाजपचे उमेदवार बनल्यास या पक्षातील इच्छुकांची गोची होणार हे निश्चित

काँग्रेसची जबरदस्‍त खेळी?

एल्‍टन डिकॉस्‍टा काँग्रेसचे आमदार असले तरी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मंत्र्यांशी त्‍यांचे चांगले संबंध आहेत. केपेतील एका कार्यक्रमात त्‍यांनी मुख्‍यमंत्र्यांचे भरभरून कौतुक केले होते. विधानसभा अधिवेशनांमध्‍येही एल्‍टन महत्त्‍वाचे प्रश्‍‍न उपस्‍थित करतात. पण, मुख्‍यमंत्र्यांवर जास्‍त घसरत नाहीत. त्‍यामुळे भविष्‍यात एल्‍टनलाही भाजपमध्‍ये प्रवेश मिळू शकतो, अशी चर्चा काही महिन्‍यांपूर्वी सुरू होती. या गोष्‍टींतून एल्‍टन भाजपला जवळचे असल्‍याचे स्‍पष्‍ट झालेले असतानाच आता विरोधकांनी सभापतिपदाचा उमेदवार म्‍हणून एल्‍टन यांनाच पुढे काढले आहे. एल्‍टन आणि भाजपला उघडे पाडण्‍यासाठी काँग्रेसने ही खेळी खेळली का?

युरीभक्त नगरसेवक

‘श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी’ याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. राजकारण्यांचे काही अंधभक्त असतात. आपला नेता सांगतो तेच परम सत्य असे ते कार्यकर्ते मानतात. कुंकळ्‍ळी पालिका मंडळात असाच एक युरीभक्त नगरसेवक आहे. आमदार व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांच्यावर केलेली टीका या नगरसेवकाला सहन होत नाही म्‍हणे. परवा पालिका बैठकीत या भक्त नगरसेवकाने आपली युरीभक्ती व निष्ठा दाखवून दिली. युरी यांच्यावर काही समाजसेवक उगाच टीका करतात व युरीने पैसे घेऊन फिश मिल प्रकल्पाला मान्यता मिळवून दिल्याचे सांगतात. आमदार युरी ‘निर्मळ’ असून वाईट गोष्टींना थारा देत नसल्याचे प्रमाणपत्रच या नगरसेवकाने देऊन टाकले. या भक्ताला नगरसेवक बनविण्यासाठी युतीने बरेच कष्ट घेतले आहेत म्‍हणे. आता तो पांग फेडत आहे, असे आम्‍ही नव्‍हे पालिकेतच बोलले जात आहे.

सभापतिपदी कोण?

विधानसभेच्या सभापतिपदी कोण याविषयी कुतूहल वाढले आहे. सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांचे नाव त्या पदासाठी निश्चित होणार असे सभापतिपदावरून रमेश तवडकर यांनी राजीनामा देईपर्यंत ठामपणे सांगण्यात येत होते. आता सत्ताधारी भाजपकडे विधानसभेत स्पष्ट बहुमतापेक्षा कितीतरी जास्त बहुमत आहे. भाजपने सभापतिपदाचा उमेदवार जाहीर करणे का टाळले आहे, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज ‘उमेदवार ठरला नाही, पण २३ रोजी उमेदवारी अर्ज सादर करू’ असे विधान करून याविषयीचे गूढ आणखी वाढवले आहे.

ऐकलंत का, विद्यापीठ घडविणार मोठ-मोठे अधिकारी

गोवा विद्यापीठाचे मानांकन आणि मूल्यांकन, यांची काय स्‍थिती आहे हे सर्वांना माहीत आहे. परंतु गोव्यातील एकमेव म्हणविणाऱ्या या विद्यापीठाने आता चाणक्य मंडळाच्‍या (पुणे) सहकार्याने युपीएसी प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले. काल उद्‌घाटनाचा कार्यक्रम झाला. कुलगुरूंनी जोरदार भाषण केले. कुलसचिव प्रा. सुंदर धुरी यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगितले. एका अर्थी ही मोठी घटना निश्‍चित आहे, परंतु या प्रशिक्षणाचा लाभ किती गोमंतकीयांना मिळणार आणि कितीजण आयएएस, आयपीएस होतात यावर ठरणार आहे. अन्यथा जोरदार घोषणा, दमदार उद्‌घाटन आणि प्रत्यक्ष काहीच नाही, असे होता कामा नये. अगोदरच या विद्यापीठाची ‘कीर्ती’ सर्वदूर पोहोचलेलीच आहे!

ईडीची लागली ‘बिडी’

हणजूणमध्‍ये ईडीने छापे टाकत काही महत्त्‍वाचे दस्ताऐवज जप्त केले. तसेच रोख रक्कम व महागड्या गाड्याही ताब्‍यात घेतल्‍या. ज्‍यांच्‍यावर कारवाई त्यात लोकप्रतिनिधी, तसेच एका बड्या व्यावसायिकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या व्यक्ती मोठे प्रायोजकत्व देतात, अशी त्यांची गावात ओळख. अनेक संस्थांना त्‍यांनी प्रायोजकत्व दिले आहे. मात्र या कारवाईमुळे प्रायोजकत्व स्वीकारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण ईडीची धडक कारवाई ही जमीन हडप प्रकरणातील बेकायदा आर्थिक व्यवहारांशी संबंधी आहे. या कारवाईची धग आपल्यापर्यंत तर पोहोचणार नाही ना, अशी भीती त्‍यांना वाटतेय. त्‍यामुळे त्‍यांची सध्‍या दातखिळी बसली आहे म्‍हणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ड्रग्समुळे एक जीव जातो, अनेक अमोनियाच्या दुर्गंधीमुळे; मग जास्त धोकादायक कोण? तरुणाचा सरकारला थेट सवाल

Goa Crime: हैदराबादमधील युवकाला मैत्रीच्या बहाण्याने लुटले, पणजीतील हॉटेलात 5.7 लाखांचा गंडा; संशयितांना अटक

MRF Recruitment: कुडाळमध्ये नोकरभरतीची बातमी खोटी, गोव्यातील तरुणांसाठी 12 सप्टेंबरला फोंडा येथेच मुलाखती; एमआरएफ कंपनीचे स्पष्टीकरण

Recruitment Controversy: मनसे आयोजित नोकर भरतीवरुन गोव्यात राजकीय वादंग; फोंड्यात नोकरीसाठी कुडाळमध्ये मुलाखती का? आमदार सरदेसाईंचा भाजप सरकारला सवाल

सत्तरीत विचित्र घटना! भर बाजारात सापडली हाडं,परिसरात खळबळ; नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT