Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; युरींना मिळणार मर्जीतले पोलिस

Khari Kujbuj Political Satire: शिक्षण क्षेत्रात राहून शाळा काढून शंभर कोटीची मालमत्ता उभी करणे शक्य आहे का? ते ही सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शाळेतून एवढी जंगम संपत्ती प्राप्त होते का? होय हे शक्य आहे.

Sameer Amunekar

युरींना मिळणार मर्जीतले पोलिस

विधानसभेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी युरी आलेमाव यांना त्यांच्या पसंतीचे पोलिस अधिकारी पोलिस स्थानकात मिळतील, असे आश्वासन दिले आहे. युरी आलेमाव यांना हवे असलेले पोलिस अधिकारी मिळाल्यास त्यांची ताकद वाढेल आणि त्यांना आपल्या मतदारसंघातील किंवा इतर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये अधिक प्रभाव पाडता येईल. पण, याच्या अगदी विरुद्ध विचार करणारे लोक म्हणतात की, मुख्यमंत्री युरी आलेमाव यांना हवे ते पोलिस देऊन त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतील, कारण आपल्या पसंतीचे अधिकारी मिळाल्यावर त्यांची जबाबदारी वाढेल आणि मुख्यमंत्री त्यांना एखाद्या पेचात अडकवू शकतील. युरी आलेमाव यांची ताकद खरोखरच वाढणार की, मुख्यमंत्री त्यांना दिलेल्या आश्वासनातून काही वेगळेच साध्य करणार, हे येणारा काळच सांगेल! ∙∙∙

शंभर कोटीचा बबलू मुल्ला!

शिक्षण क्षेत्रात राहून शाळा काढून शंभर कोटीची मालमत्ता उभी करणे शक्य आहे का? ते ही सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शाळेतून एवढी जंगम संपत्ती प्राप्त होते का? होय हे शक्य आहे.बबलू मुल्ला म्हणजे भाजपाचे हाज समितीचे नेते व भाजपाचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून ओळखणारे उर्फान मुल्ला यांनी हे दिव्य साकारले आहे.असे आम्ही नव्हे भाजपचेच शेख जिना यांनी दावा केला आहे.बबलू उर्फ ऊर्फान मुल्ला हे सरकारी अनुदानावर पाच शाळा चालवित असून शाळेत शिक्षक व कर्मचारी खोगीर भरती करून मुल्ला याने शंभर कोटी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचा दावा जिना यांनी केला आहे. मुख्याध्यापक.असलेल्या बबलूने खोटी शैक्षणिक प्रमाण पत्रे दाखवून स्वतः बरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांना शाळेत नोकरी दिल्याचा आरोप होत आहे मुल्ला हे बोगस प्रमाणपत्रे छापतात असे गंभीर आरोप बबलू वर करण्यात आले आहेत.या पूर्वीही असे जाहीर आरोप बबलूवर झाले होते.मात्र सरकारचा हात पाठीशी असल्यामुळे बबलू बिनधास्त असल्याचे आरोप करणारे म्हणतात. डॉ प्रमोद सावंत आपण शिक्षण मंत्री या नात्याने व झिंगडे साहेब शिक्षण संचालक या नात्याने याची चौकशी होऊन ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होऊ दे असे शिक्षण प्रेमी म्हणायला लागले आहेत.

आतापासूनच सबकुछ धाकू?

सध्‍या गोव्‍यात अनुसूचित जमातीचे राजकीय नेतृत्‍व आपल्‍याकडे यावे यासाठी सर्वांचीच धडपड चालू असून सगळेचजण आपणच एसटींचे खरे पाठीराखे असे सांगण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मडगावात गोमंतक गौड मराठा समाजाच्‍या कार्यक्रमाच्‍यावेळीही त्‍याचेच दर्शन घडले. या कार्यक्रमाला सभापती रमेश तवडकर यांनी उपस्‍थिती लावून मार्गदर्शन केले. मात्र ते कार्यक्रम स्‍थळाहून बाहेर निघाल्‍यानंतर उत्तर गोव्‍याचे जिल्‍हा पंचायत सदस्‍य धाकू मडकईकर यांनी भाषण करताना, या कार्यक्रमाला जी गर्दी झाली आहे ती फक्‍त आपल्‍यामुळे असे म्‍हणत सर्व श्रेय आपणास घेण्‍याचा प्रयत्‍न केला. एका अर्थाने सभापतीची उपस्‍थिती आपल्‍यापुढे कमीच असे सांगण्‍याचा हा प्रयत्‍न तर नव्‍हता ना असे वाटल्‍याशिवाय राहिले नाही. धाकू मडकईकर यांना म्‍हणे लगेच उत्तर गोवा जिल्‍हा पंचायतीचे अध्‍यक्षपद लाभणार आहे. अध्‍यक्ष होण्‍यापूर्वी धाकूच्‍या वागण्‍याची ही पद्धत तर अध्‍यक्ष झाल्‍यानंतर ‘सब कुछ धाकूच’ अशी परिस्‍थिती तर हाेणार नाही ना?

पर्यटन क्षेत्र भायल्यांकडे

पर्यटन क्षेत्राला नवा आयाम देताना सरकारने गोव्यात होम स्टे व्यवसायाला गत हंगामांत प्रोत्साहन दिले व त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा खात्याने केला आहे. पण विरोधी आमदारांना ते मान्य नाही त्यांनी हा व्यवसाय संपूर्णतः परप्रांतियांच्या हाती गेल्याचा आरोप केला आहे. पण प्रत्यक्षांत होम स्टेच कशाला पर्यटनाशी संबंधित सर्वच व्यवसायात परप्रांतीयांचा पगडा वाढल्याचे आढळून येते असे प्रत्येकटा म्हणू लागलाय कारण आपण गोवेकरच आहोत कारण शॅक , टॅक्सी असो वा, अन्य व्यवसाय असो गोवेकर असल्याचे नोंद करून परवाने घेतो व नंतर तो परप्रांतीयांना चालवायला देऊन घरी बसून कमाई करतो. त्यामुळेच परप्रांतीय वाढत चाललेत. आपण मात्र सरकारच्या नावाने बोटे मोडतो. देशात इतरत्र चित्र दिसते तेथे स्थानिकच व्यवसाय करतात, असे अन्य राज्यात पर्यटक म्हणून गेलेले गोवेकर म्हणतात.

शेवटी सरकार पावले!

बेतोडा जंक्शन ते औद्योगिक वसाहतीपर्यंतचा रस्ता अखेर थोडा तरी ओळख पटवतोय की आपला काहीतरी संबंध विकासाशी आहे! गावकऱ्यांच्या आठ दिवसांच्या अल्टीमेटमने साबांखाचे झोपेतून जागे होणे घडले आणि ‘पॅचवर्क’ च्या जादुई उपचारांनी रस्त्याचा इलाज सुरू झाला आहे. या रस्त्यावरून प्रवास म्हणजे खड्ड्यांच्या सहलीचा अनुभव! रस्ता कमी आणि खड्डे जास्त, इतकं की गाडीपेक्षा बैलगाडीच जास्त सुरक्षित वाटावी. पण गावकऱ्यांनी आठ दिवसांचा इशारा दिला आणि चमत्कार झाला – ठेकेदार प्रकट झाला! अर्थात, हे ''पॅचवर्क'' डागडुजी की फक्त फोटोसाठी मेकअप, हे पावसातच कळेल. पण सध्या तरी गावकऱ्यांनी सुस्कारा सोडला आणि पीडब्ल्यूडीने अस्तित्वाचा पुरावा दिला. थोडक्यात काय, लोकशाही जिंकल्यासारखी भावना आहे,– फक्त आठ दिवस द्यावे लागतात, आठ वर्षे नाहीत

आमदारच पंचायत चालवतात

मंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले की, गैरव्यवहार करणाऱ्या सचिव आणि सरपंचांवर कारवाई केली जाईल, पण त्याचबरोबर त्यांनी एक गौप्यस्फोटही केला! जेव्हा अशांवर कारवाई करण्याची वेळ येते, तेव्हा स्थानिक आमदार त्यांची पाठराखण करण्यासाठी येतात आणि कारवाई न करण्याची विनंती करतात. आता यावरून लोक तर्क वितर्क तर लढवणारच ना. आतापर्यंत अनेक आमदार अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी होते, असे आता लोक बोलू लागले आहेत. पंचायत स्तरावर होणाऱ्या गैरप्रकारांना आमदारच जबाबदार आहेत, असे तर अप्रत्यक्षपणे मंत्र्यांनी कबूलच केले. मंत्र्यांनी आमदारांच्या हस्तक्षेपावर बोट ठेवल्याने, ‘आमदारच पंचायत चालवतात’ आणि ‘गैरव्यवहाराला त्यांचाच आशीर्वाद असतो’ अशा चर्चांना उधाण आले आहे.

अशोक नाईक दळवींच्या ‘कॅम्प’मध्ये?

भंडारी समाजाचे नेते अशोक नाईक हे सध्या फोंड्याचे नगरसेवक तथा आगामी विधानसभा निवडणुकीकरता जोरदार तयारी करत असलेल्या विश्वनाथ दळवी यांच्या बरेच निकट आले आहेत. दळवींच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात तर ते सक्रिय होतेच, पण एरव्हीही त्यांची दळवींशी जवळीक वाढलेली दिसत आहे. अशोक हे रवी पात्रांवचे निकटवर्तीय म्हणून गणले जातात. रवी मुख्यमंत्री असताना अशोक फोंडा तसेच दक्षिण गोवा पीडीएचे चेअरमन होते. त्यांच्या दारात त्यावेळी म्हणजे १९९२ साली दहा दहा गाड्या असायच्या. फोंड्यातील लोक आजही या गोष्टीची चर्चा करताना दिसतात. आणि म्हणूनच अशोकबाबत फोंड्याचे नागरिक सध्या ‘ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ’ हे अमर प्रेम या जुन्या चित्रपटातले गाणे गुणगुणताना दिसू लागलेत. भंडारी समाजाची समिती हे रवी व अशोक यांच्या मधल्या तेढीचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात असले तरी शेवटी राजकारणात काहीही घडू शकते, हेच खरे नाही का?

उत्पल राज्यपालांच्या भेटीला

राज्यपाल पी. अशोक गजपती राजू यांची उत्पल पर्रीकर यांनी बुधवारी भेट घेतली. राज्यपाल केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री असताना स्व. मनोहर पर्रीकर यांच्याशी संपर्कात होते. मोपा येथील विमानतळ झाल्यानंतर पर्रीकर यांना आदरांजली वाहण्‍यासाठी ते मोपा येथील विमानतळाच्या पाहणीसाठी गेले होते. तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू हे पर्रीकर यांचे चाहते. त्यांची मैत्री जगजाहीर होती. नायडू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणण्यासाठी पर्रीकर यांनी पडद्यामागे केलेल्या हालचाली आताच्या राज्यपालांना ठाऊक आहेत. त्यामुळे उत्पल सध्या कोणत्याही पदावर नसताना राज्यपालांच्या भेटीसाठी गेले आणि तेथे त्यांचा गप्पांचा फड जमला. राज्यपालांनी पर्रीकर यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पर्रीकर यांचे राजकारण राज्यापुरते कसे मर्यादित नव्हते, याचे दर्शनही उत्पल यांना या निमित्ताने झाले.

अमित शहांचे कोकणीतून उत्तर!!

गोव्‍यातील ऑनलाईन मालमत्ता फसवणुकीसंदर्भात गोव्‍याचे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र पाठविले होते. या पत्राचे उत्तर अमित शहा यांनी चक्‍क कोकणीतून देताना, या संदर्भातील खटला सीबीआयच्‍या आर्थिक गुन्‍हा विभागाकडे देण्‍यात आल्‍याचे म्‍हटले अाहे. मुख्‍यमंत्र्यांनी हे पत्र आपल्‍या फेसबुकवर अपलोड करून आपल्‍या पत्राचे उत्तर कोंकणीतून मिळणे ही आनंदाची बाब असून कोंकणीची व्‍याप्‍ती वाढते ही अभिमानाची गोष्‍ट असे म्‍हटले आहे. आता गुजराती असलेले अमित शहा जर कोंकणीतून पत्राला उत्तर देतात, ही गोष्‍ट जरी मजेशीर वाटली तरी गोव्‍यातील कोकणीवाद्यांना आता आकाश केवळ दोन बोटापुरते उरले असेल यात शंका नाही. मात्र, यावर मराठीवाद्यांची प्रतिक्रिया काय? हे मात्र पहावे लागेल.

उल्हास भाऊ नॉन प्लेईंग कॅप्टन?

सत्ते पुढे शहाणपण चालत नाही, म्हणतात ते खरे. गोवा राज्य सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली.बँक निवडणुकीत उतरलेल्या भाजप समर्थक उमेदवारांनी मुख्यमत्र्यांची भेट घेऊन राजकीय आशीर्वाद घेतले. यावेळी एका मुख्यमंत्र्याच्या उजव्या खांद्याला टेकून विद्यमान अध्यक्ष उल्हास फळ देसाई होते. उल्हास भाऊ निवडणूक लढवित नसून ते ‘नॉन प्लेईंग कॅप्टन’ ची भूमिका बजावणार असल्याचे कळते. आता या सरकार समर्थक पॅनल विरोधात कोण उतरणार हे पाहावे लागणार.

व्हेंझीचा नवा लुक भावणारा

२०२२ मधील निवडणुकीत ‘आप’ने दोन जागा जिकून सर्वांनाच चकित केले होते. वास्तविक निवडणुकीपूर्वीच त्याचे संकेत मिळत होते. बाणावलीतून व्हेंजी व्हिएगस यांनी सुरवातीपासूनच फिल्डींग लावली होती पण वेळ्ळींत मात्र अकस्मातपणे क्रूझ सिल्वा यांनी आघाडी घेऊन ती शेवटपर्यंत टिकवली होती. पण मुद्दा तो नाही निवडून आल्यावर व्हेंझी यांनी सतत आक्रमक पवित्रा घेतला होता तो लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवला होता. पण दिल्लींतील ‘आप’चा गड कोसळल्यापासून त्यांची आक्रमकता काहीशी कमी झाली, असे विधानसभेत दिसून येते पण म्हणून त्यांनी बाणावलींतील आपले काम व लोकसंपर्क मात्र कमी केलेला नाही. कदाचित आलेमांव कुटुंबीयांची वाढलेली सक्रियता हेही त्यामागील कारण असू शकते. मात्र, या विधानसभा अधिवेशनात त्यांचा नवा लुक अनेकांना भावणारा ठरला आहे खरा.अनेकजण आपसात ते मान्यही करतात. तर काहीजणांना या नव्या लुकमुळेच ते मवाळ बनल्याचे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

SCROLL FOR NEXT