पात्रांवाशिवाय विधानसभा!
माजी मुख्यमंत्री पात्रांव रवी नाईक यांच्या निधनानंतर पहिल्यांदा सोमवारपासून विधानसभा अधिवेशन होणार आहे. त्यांचे विधानसभेतील बोलणे, विधानसभेबाहेर पत्रकारांशी मिस्कील चर्चा करणे, हजरजबाबीपणे प्रश्नांची उत्तरे देणे, विधानसभेत काही खडाजंगी झाली तर ज्येष्ठत्वाच्या नात्याने आमदारांना शांत करणे, त्यांना उत्तम जमत असे. सत्तापक्ष असो किंवा विरोधी पक्षातील आमदार असो त्यांच्यापुढे नरमायचाच. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ अशी म्हण आहे. परंतु गोमंतकीय राजकारणात जी रवी नाईकांना दृष्टी होती, ती इतर कोणत्याच नेत्याकडे नाही, याची जाणीव आणि प्रचिती अनेकदा त्यांच्या बोलण्या-वागण्यातून येत होती. परंतु या विधानसभा अधिवेशनात त्यांची उणीव वारंवार भासून येणार आहे एवढे नक्की.
परप्रांतीय का वाढले!
परवा विधिकारदिन समारंभात बोलताना मुख्यमंत्री दोतोर सावंत यांनी परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येबाबत जी टिप्पणी केली, त्यावर आता उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, की दोन हजार सालानंतर गोव्यात परराज्यांतील लोकांची संख्या वाढली व त्यांतूनच विविध समस्या तयार होऊ लागल्या आहेत. प्रत्यक्षात मुक्तीनंतरच गोव्यात परराज्यांतील लोकांची आवक सुरू झाली, त्यामागील कारणे वेगळी होती. त्यावेळी विविध क्षेत्रांतील माहितगार नव्हते. त्यामुळे सरकारलाच तशा लोकांना आणावे लागले, पण त्यातून गोमंतकीयांमध्ये परावलंबित्व वाढले. केवळ श्रमाची कामेच नव्हेत, तर साध्या कामांसाठी आम्हांला इतरांची गरज भासली. आज तर गोमंतकीय पूर्णतः प्रत्येक बाबतीत परावलंबी झाला आहे. त्यामुळे केवळ परप्रांतीयांना दूषण देऊन चालणार नाही, तर भूमिपुत्रांना स्वावलंबी व्हावे लागेल. पण ते समजून घेण्याची कोणाचीच तयारी नाही.
देवदर्शनासाठी आमिष नको!
मुख्यमंत्री देवदर्शन योजने अंतर्गत यावर्षी शुक्रवारी वालंकिणीला जाणाऱ्या भाविकांना समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मडगाव रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखविला. मात्र १२०० यात्रेकरूंची व्यवस्था असताना पाचशे पेक्षा कमी भाविक दर्शनाला गेले. अर्धे अधिक कोच रिकामे होते. भाविकांनी यात्रेला नकार दिला. हल्लीच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत अल्पसंख्याकांनी भाजपला पाठ दाखवली आहे. हा अनुभव ताजा असताना या देवदर्शन यात्रेचे आम्हांला आमिष नको! हे सुद्धा सांगण्याचा अल्पसंख्याकांचा असा अगळा वेगळा प्रयत्न तर नसेल. अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
पोलिस खात्यातील ‘विक्रमी’ प्रताप!
पोलिस हे लोकांना संरक्षण देण्यासाठी असतात, असा सर्वसाधारण समज आहे. विशेषत: महिलांना या पोलिसांचा मोठा आधार असतो अशीही लोकांची भाबडी समज असू शकते. मात्र काही पोलिस अधिकाऱ्यांचे प्रताप ऐकल्यास बाहेरच्या महिला सोडा खुद्द त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत, हेच दिसून येते. आता दक्षिण गोव्यातील एका पोलिस स्थानकातील एका निरीक्षकाचे विक्रमी प्रताप चर्चेत आहेत. पोलिस स्थानकापेक्षा रात्रीच्यावेळी पबमध्येच अधिक दिसणाऱ्या या निरीक्षकाने आपल्या हाताखालील एका महिला पोलिस उपनिरीक्षकाला सुरुवातीला आक्षेपार्ह मॅसेज तर पाठविलेच. शिवाय संधी साधून तिचा विनयभंगही केला, असे सांगण्यात आले. हे प्रकरण दक्षिण गोव्यातील पोलीस अधीक्षकांपर्यंत पोचले आहे. मात्र विनयभंग करणारा तो पोलिस निरीक्षक राजकीय वजन वापरणारा असल्याने ही चौकशी कुठे पोचली, हे मात्र समजू शकले नाही. यापूर्वी याच निरीक्षकाचे आणखीही विक्रमी प्रताप ऐकू आले होते. मात्र त्यांच्यावरही शेवटी पांघरुण घालण्यात आलेच.
एकंदर जिल्ह्यांची पुनर्रचना
सरकारने ‘कुशावती’ हा तिसरा जिल्हा स्थापन केल्यानंतर त्या विरुद्ध काहूर उठलेले पहायला मिळते. काणकोणकरांचा या जिल्ह्यात समावेश व्हायला विरोध आहे, तर कुडचडेतील लोकांना त्याचे मुख्यालय कुडचडे हवे आहे. आता सरकार काय करते, त्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ही स्थिती असतानाच फेसबुकवर आलेल्या एका पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यात उत्तर, मध्य व दक्षिण असे जिल्हे करावेत असे म्हटले आहे. पेडणे, बार्देश, डिचेाली व सत्तरी मिळून उत्तर, फोंडा, धरबांदोडा, मुरगाव व सासष्टी मिळून मध्य व सांगे, केपे व काणकोणचा मिळून दक्षिण गोवा जिल्हा करावा, असे सुचवले आहे. त्यामुळे प्रादेशिक सलगता राहील, असे म्हटले आहे. आता सरकारने घेतलेला निर्णय काही फिरविला जाणार नाही, मग अशा प्रस्तावांना काही अर्थ राहील का? अशी चर्चा सुरू आहे.
एकी पूर्वीच बेकी!
जिल्हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसने एकत्रित येऊन निवडणूक लढविल्याने काँग्रेस या निवडणुकीत किमान आपले अस्तित्व आहे, हे तरी सिद्ध करु शकले. त्यामुळे हाच प्रयोग विधानसभेत व्हायला पाहिजे, अशी मागणीही वाढू लागली होती. हे दोन्ही पक्ष आता खऱ्या अर्थाने एकत्र येणार असेही सांगितले जात होते. मात्र ही एकी होण्यापूर्वीच दोन्ही पक्षात बेकी तर होणार नाही ना? अशी चिंता काहीजणांना वाटू लागली आहे. याचे कारण म्हणजे, मडगाव नगरपालिका निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघात येणाऱ्या प्रभागात काँग्रेसला अर्ध्या जागा द्याव्यात, अशी मागणी करणारे पत्र फातोर्डा गटातील दोन सदस्यांनी काँग्रेस अध्यक्षांना पाठविले आहे. फातोर्डा हा जरी एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तरी आता या मतदारसंघात गोवा फॉरवर्डने आपला दबदबा निर्माण केला आहे. आणि मागच्या दोन पालिका निवडणुकीत फातोर्ड्यातून आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून गोवा फॉरवर्डने भाजपाची सत्ता मडगावात रोखून धरली होती. हा सारा इतिहास काँग्रेसलाही माहित आहे. या पार्श्वभूमीवर या अर्ध्या जागा मागण्याची पाचर काँग्रेस का बरे मारुन ठेऊ पहात आहे? ही एकी होऊ नये, यासाठीच ही बेकीची पाचर मारुन ठेवली आहे का?
विद्यार्थ्यांना सक्ती
जागतिक मराठी संमेलन पणजीत सुरू आहे, याची किती पणजीवासियांना खबर आहे, हा संशोधनाचा विषय आहे. कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर सभागृह निदान थोडे भरलेले दिसावे, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेक्षकाची भूमिका बजावावी लागली होती. ते विद्यार्थी किती स्वखुशीने आले होते, ते त्यांचे चेहरे पाहिल्यावरच समजत होते. दुपारी भोजन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी काढता पाय घेतल्याने अवघ्या काही जणांच्या उपस्थितीत पुढील सत्रे घेण्याची वेळ शनिवारी आली होती.
मडगावात पालिका प्रभाग वाढणार?
नगरपालिका निवडणुका एप्रिल मे महिन्यात होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यात मडगाव नगरपालिकेचा समावेश आहे. सध्या मडगावात २५ प्रभाग आहेत, ते २७ करण्यात येतील, असे संकेत मिळत आहेत. जर प्रभाग वाढविण्याचा निर्णय झाला, तर हे प्रभाग कुठे व कसे वाढणार, याबद्दल अजून स्पष्ट काहीही झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, अशी चर्चा सुरु आहे. काही प्रभाग महिलांसाठी, ओबीसीसाठी, एससी एसटीसाठी आरक्षित केले जातील. मडगावचे आमदार आपल्याला फायदेशीर आरक्षण करणार अशीही चर्चा सुरू आहे. प्रभाग वाढवले किंवा राखीव करण्याचा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेतला, तर मात्र विरोधकांना त्रासदायक ठरू शकेल. त्यासाठी आतापासूनच विरोधकही सक्रिय झाले आहेत.
आतिषींकडून ‘आप’चे बळकटीकरण
आम आदमी पक्षातून आजी-माजी प्रदेशाध्यक्ष व इतर पदाधिकारी असे पाच जणांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे काम आणि इतर पदाधिकाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी गेली तीन दिवस गोवा प्रभारी आतिषी या गोव्यात आहेत. या तीन दिवसांत त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून राज्याचे नेतृत्व कोणाकडे द्यावे, तसेच इतर पदाधिकारी म्हणून जबाबदारी कोणाकडे द्यावी, याची मते जाणून घेतली आहेत. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत आलेले अपयश मागे टाकून आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीवर आता भर देण्याचे आणि नव्या नेतृत्व निवडीचे काम त्या करणार आहेत. पुन्हा एकदा त्या जनसंपर्क वाढवणे, तळागाळात पक्ष अधिक सक्षम करणे आणि गोव्यातील राजकीय रणनीती अधिक प्रभावी करण्यावर आतिषी यांनी भर दिला आहे. त्यामुळे खरेतर आतिषी यांचे कौतुक करणे गरजेचे आहे, कारण त्यांनी दिल्लीत आणि गोव्यातही लढण्याची आणि झुंजण्याची वृत्ती दाखविली आहे.
पणजीत वाहतूक पोलिस आहेत कुठे?
राजधानी पणजीत सध्या आयनॉक्स आणि फ्रान्सिस्को लुईस गोम्स उद्यान अशा दोन ठिकाणी फूड फेस्टिव्हल, कला अकादमीत जागतिक मराठी संमेलन आणि बांदोडकर मैदानावर ॲक्वा फीश फेस्टिव्हल असे चार मोठे महोत्सव सुरू असल्याने या भागात सायंकाळच्यावेळी स्थानिक आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहने पार्क करण्यासाठीही जागा मिळत नसून, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. असे असतानाही वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी तेथे एकही वाहतूक पोलिस तैनात असलेला दिसत नाही. एरव्ही, पर्यटकांची वाहने अडवून त्यांना चलन देण्यासाठी नाक्यानाक्यांवर पोलिस तैनात करणाऱ्या पोलिस खात्याच्या वाहतूक विभागाला हे चित्र दिसतच नाही का? असा सवाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.