पणजी: राज्य मंत्रिमंडळात समावेशासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे डोळे लावून असलेले इच्छुक आमदार आणि मंत्रिमंडळातून आपल्याला काढून टाकतील काय, अशी धास्ती वाटणारे मंत्री यांची धडधड आणखीन वाढली आहे.
मुख्यमंत्री काल 9 (सप्टेंबर) दिवसभर दिल्लीत होते. मात्र, याविषयावर ते पक्षश्रेष्ठींशी बोललेच नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चालले आहे, हे समजण्यास काही दिवसांची प्रतीक्षा आमदार आणि मंत्र्यांच्या पदरात पडली आहे.
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील, असे ‘गोमन्तक टीव्ही’वरील मुलाखतीत सांगितले होते. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मंत्र्यांच्या कामगिरीचा मध्यावर आढावा घेत, असा बदल करण्याचे समर्थन त्यांनी केले होते.
‘विकसित गोवा 20247’चे लक्ष्य गाठण्यासाठीही मंत्रिमंडळ फेरबदलाची अपरिहार्यता त्यांनी व्यक्त केली होती. सुरवातीला विधानसभा अधिवेशनाआधी मुख्यमंत्री खांदेपालट करतील, अशी राजकीय चर्चा होती. मात्र, तशा कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने नंतर विधानसभा अधिवेशनानंतर मंत्रिमंडळात बदल होईल, असे सांगण्यात येत होते.
विधानसभा अधिवेशन होऊन महिना उलटला तरी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला प्राधान्य न दिल्याने गणेशचतुर्थीनंतर याला ते प्राधान्य देतील, असे बोलले जात होते. मुख्यमंत्री वस्तू व सेवा कर परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने सोमवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीनंतर मुख्यमंत्री किमान भाजपचे (BJP) राष्ट्रीय सचिव (संघटन) बी.एल. संतोष यांची भेट घेतील, असे वाटत होते. मात्र, कोणालाही न भेटता मुख्यमंत्री रात्री गोव्याकडे निघाले होते.
चार राज्यांतील विधानसभा निवडणूक तयारीत भाजपचे पक्षश्रेष्ठी सध्या व्यस्त आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल या विषयासाठी ते वेळ देऊ शकत नाहीत. मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांचा अधिकारातील विषय असला तरी पक्षशिस्तीप्रमाणे पक्षश्रेष्ठींची मान्यता त्याला घ्यावी लागते.
यासाठी मुख्यमंत्र्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट होणे आवश्यक आहे. ते दोन्ही नेते आज उपलब्ध न झाल्याने मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय पुढे रेटता आलेला नाही. कार शोरूम मालकांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ
शोरुममधील डेमो कार घेण्यासाठी शोरुम मालकाला इनपुट टॅक्स क्रेडिट वस्तू व सेवा कर परिषदेकडून देण्यात येत नव्हते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा विषय बैठकीत उपस्थित केला. चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांचे म्हणणे परिषदेने मान्य केले. यामुळे गोव्यासह देशातील कार शोरुम मालकांना इनपूट टॅक्स क्रेडिटचा लाभ होणार आहे.
ऑनलाईन गेमिंग, कॅसिनोंनी करासंदर्भात केलेली मागणी व वस्तुस्थिती यासंदर्भात अहवाल तयार केला आहे. ऑनलाईन गेमिंगवरील महसूल गत सहा महिन्यांत 412 टक्क्यांनी वाढला; तर कॅसिनोवरील महसूल 30 टक्क्यांनी वाढला, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी दिली. जीएसटी बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
त्याअंतर्गत कर्करोग उपचार औषधांवरील कर 12 वरुन घटवून 5 टक्के करण्यात आला. तसेच नमकीन व शेवेच्या पदार्थांवरील कर 18 वरुन 12 टक्के करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.