Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; मंत्रिपद कुणाचे जाणार?

Khari Kujbuj Political Satire: भाजपचे प्रदेशाध्यक्ष सध्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यग्र आहेत. गोव्यातील ४० पैकी ३९ मतदारसंघांमध्ये मेळावे झाले.

Sameer Panditrao

मंत्रिपद कुणाचे जाणार?

आज होणार उद्या होणार म्हणून गाजत असलेला मंत्रिमंडळ बदल अजून झालेला नाही, त्यामुळे राजकारणी लोकांत सध्या चलबिचल सुरू आहे. मंत्रिमंडळ बदलावरून अनेक वावड्या उठत असून त्यात फोंडा तालुक्यातील चारपैकी दोघाजणांचे मंत्रिपद जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. तसे पाहिले तर एकच फोंडा तालुक्यातील चारही आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. या चारपैकी कुणाची खुर्ची जाणार हे अजून निश्‍चित झालेले नाही, मात्र कार्यकर्ते एकमेकांना हळूच विचारून कानोसा घेताना दिसले. ∙∙∙

दामूंचा ४०वा मेळावा !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सध्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यग्र आहेत. गोव्यातील ४० पैकी ३९ मतदारसंघांमध्ये मेळावे झाले. शेवटचा मेळावा फातोर्ड्यात म्हणजेच दामू यांच्या मतदार संघात १३ रोजी निश्चित करण्यात आला आहे. आपल्या मतदारसंघात शेवटचा मेळावा आयोजनामागे काहीतरी हेतू नाही ना, याची चर्चा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दामू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पार्टी दिलेली नाही. म्हणजे शुक्रवारी फातोर्ड्याच्या भाजप कार्यकर्त्यांना मोठ्या मेजवानीचा बेत असेल. मेळावाही संध्याकाळी ६ नंतर. म्हणजे अर्थ ही झाला व स्वार्थ ही झाला. आहे ना चांगली दामूंची शक्कल. ∙∙∙

कसेही राहू; चर्चेत राहू!

राज्य सरकार सध्या विविध कारणांनी चर्चेत रहात आहे की, राहण्यासाठी प्रयत्न केले जातात, हा प्रश्न अनेकांना पडत असेल, याबद्दल दुमत असणार नाही. काही दिवसांपूर्वी गोविंद गावडे हे मंत्रिमंडळात राहणार की, जाणार याविषयापर्यंत आलेला वाद चर्चेत होता. हे प्रकरण गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचले. तोच आरोग्य मंत्री विश्वजित राणे आणि गोमेकॉतील डॉक्टर यांच्यातील वाद माफिनाम्यापर्यंत येऊन थांबेल, असे वाटत होते. पण अखेर त्यात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. हा विषयही माध्यमांमुळे गल्लीतून दिल्लीपर्यंत गेला. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप सरकार चर्चेत राहिले आहे. शिवाय असे वादाचे प्रसंगही माध्यमांना खाद्य देऊन जात असून, सररकारविरोधात चांगल्या आणि वाईटही प्रतिक्रिया येत असल्या तरी पक्ष चर्चेत राहत आहे, हे कदाचित पक्षाला सुखावह वाटत असेल. आता टॅक्सी ॲप अग्रीगेटरमुळे मंत्री माविन आणि आमदार मायकल लोबो यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालेय आणि हा विषय पुढे चार-पाच दिवस चर्चेत राहणार हे नक्की. ∙∙∙

डॉक्टरांचा संप अन् मुख्यमंत्र्यांची ‘मध्यस्थी’

गोमेकॉमधील डॉक्टरांनी संप मागे घेतल्याने सध्या गोव्यात एकच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मध्यस्थी करून हा संप मिटवला, त्यामुळे साहजिकच ते याचे श्रेय घेत आहेत. पण पडद्यामागे अनेक गोष्टींची चर्चा सुरू आहे. काही जणांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांनी वेळेवर मध्यस्थी केली नसती तर डॉक्टरांनी संप अधिक तीव्र केला असता. काहीजण तर डॉक्टरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आम्ही लोकांना त्रास देऊ इच्छित नाही, असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे संप करून रुग्णांना वेठीस धरायचे, यावरून त्यांच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ‘जनतेच्या हितासाठी’ हा मुखवटा घालून ते केवळ आपल्या स्वार्थासाठी आंदोलन करत आहेत, असेही बोलले जात आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांची प्रगल्भता

गोमेकॉ त आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सीएमओ डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांचा अपमान केला. त्यामुळे वैद्यकीय कर्मचारी संपावर गेले होते. आरोग्यमंत्र्यांनी माफी मागूनही प्रकरण निवत नव्हते. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी संयमाने स्थिती हाताळली. काही जणांसोबत बैठका घेतल्या. राज्याचे नेतृत्व कसे प्रगल्भ हवे, याचा वस्तुपाठ त्यांनी हे प्रकरण हाताळताना घालून दिला. सार्वजनिक जीवनात वावरताना आक्रस्ताळेपणा करून चालत नाही, तर अधिकारांचा नम्रपणे वापर करायचा असतो हे सीएमनी दाखवून दिले. प्रकरण हाताबाहेर जाण्याआधीच निवळले. या प्रकरणावरून सरकार कोंडीत सापडणार याची वाट पाहत बसलेल्यांच्या तोंडचे पाणी मुख्यमंत्र्यांनी पळवले एवढे नक्की. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डॉक्टरी पेशातच नव्हे तर संपूर्ण गोव्यात वाढलेली पहायला मिळाली! ∙∙∙

खुर्चीची माफी कसली?

‘गोमेकॉ’च्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना वैयक्तिक माफी नको होती, तर त्यांच्या खुर्चीला माफी हवी होती, असा युक्तिवाद मंगळवारी ऐकू आला. याची समाजमाध्यमांवर जोरदार खिल्ली उडवली जात आहे. खुर्चीची कसली माफी, अशी खोचक विचारणा करताना अनेकजण दिसून येत आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी असो किंवा बहुउद्देशीय कर्मचारी असो. त्याचा मानसन्मान जपला गेला पाहिजे. पदाइतकीच त्या व्यक्तीची प्रतिष्ठा महत्त्वाची असते. त्यामुळे डॉ. कुट्टीकर यांची नको तर खुर्चीची माफी मागितली पाहिजे, या दाव्यात दम राहत नाही, असे समाज माध्यमांवर बोलले जात आहे. एका गंभीर विषयाची चर्चा अशा पातळीवर एका वाक्याने कशी घसरते, ते मंगळवारी दिसून आले. ∙∙∙

सुभाष भाऊंची खंत!

सुभाषभाऊंना खंत आहे ती म्हणजे बोरी - शिरोड्यातील बगल रस्त्याची. आता पूर्वीची स्थिती राहिलेली नाही. कारण काही ठिकाणी रस्त्यांचे रूंदीकरण झालेले नाही, मात्र वाहनांची गर्दी वाढत आहे, या प्रकारामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार होत असल्याने लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. बोरी-शिरोड्यातील बगल रस्ता बांधला तर बऱ्याच समस्या दूर होण्याची शक्यता आहे, मात्र हे काम अजून सुरू झालेले नाही, त्यामुळेच सुभाष भाऊंनी फोंड्यातील एका सरकारी कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्र्यांसमोर ही खंत व्यक्त केली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT