पणजी: गोव्यात 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अवधी असला तरी राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या ताज्या विधानांनी गोव्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपने आगामी निवडणुकीत स्वबळावर 30 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला असून फातोर्डा मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांना शह देण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे.
लोबो यांनी एक अत्यंत सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, "पुढच्या निवडणुकीनंतर भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आणि विजय सरदेसाई यांनी भाजपला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केल्यास, त्यांचे स्वागतच केले जाईल." मात्र, त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, भाजप फातोर्डा मतदारसंघातून आपली निवडणूक लढवेल आणि विजय सरदेसाई यांचा पराभव करण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करेल.
लोबो यांनी यावेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) उदाहरण दिले. निवडणुकीपूर्वी मगोप विरोधी बाकांवर होता, परंतु चर्चेनंतर आणि सत्तेच्या समीकरणानंतर ते आता मंत्रिमंडळाचा भाग आहेत, असे सांगत त्यांनी भविष्यातील युतीचे दरवाजे उघडे असल्याचे संकेत दिले. तरीही, फातोर्ड्यात भाजप कोणतीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
दुसरीकडे, भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी 2027 च्या निवडणुकीसाठी मोठा दावा केला. नाईक म्हणाले की, "भाजप केवळ 27 जागा जिंकून थांबणार नाही, तर आम्ही स्वबळावर 30 जागांचा टप्पा पार करु." मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी कधीही विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून विकासकामे अडवली नाहीत. सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याची त्यांची वृत्ती भाजपला मोठ्या विजयाकडे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दामू नाईक यांनी स्पष्ट केले की, सरकारने प्रत्येक मतदारसंघात विकासकामे पोहोचवली आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातही भेदभाव न करता कामे झाल्यामुळे जनतेचा कल भाजपकडे असल्याचे त्यांनी सांगितले. फातोर्डा (Fatorda), जिथे विजय सरदेसाईंचे वर्चस्व आहे, तिथे भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केल्याने आगामी काळात येथील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.