पणजी: ‘‘येत्या विधानसभा निवडणुकीतील भाजप-मगो युतीची चर्चा दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत बैठकीमध्ये होईल. त्यानंतरच इतर गोष्टींबाबतच्या अधिकृत बोलणी होईल. पण, भाजप आणि मगो मिळूनच निवडणुकीला सामोरे जातील’’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री तथा मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भाजप-मगो युतीसंदर्भात सोमवारी आल्तिनो येथील मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या सरकारी बंगल्यावर झालेल्या बैठकीला मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी उपस्थित होते. परंतु, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, ‘‘युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पण, निवडणुकीत भाजप-मगो युती असेल आणि विधानसभा निवडणुकीत युतीच जिंकेल’’, असे म्हटले होते. त्यानंतर याबाबत मंगळवारी पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना विचारले असता, ‘‘भाजप आणि मगो पक्षांच्या स्थानिक नेत्यांत युतीबाबत प्राथमिक बैठका सुरू झाल्या आहेत.
परंतु, अंतिम निर्णय हा भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल’’, असे त्यांनी सांगितले.‘‘विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युती लढेल आणि पुढील सरकार आमचेच असेल’’, असाही त्यांनी पुनरूच्चार केला. मडकई येथे पत्रकारांशी बोलताना सुदिन ढवळीकर यांनी, ‘‘युती निश्चित करण्यासंदर्भातील आमची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होईल’’, असे स्पष्ट केले.
युती धर्म पाळूनच पुढे जाऊ!
‘‘मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितल्यानुसार, सध्या मगो पक्षाचे बारा ते तेरा मतदारसंघांत काम सुरू आहे. पण, राज्यात सध्या भाजप आणि मगो या दोन पक्षांची युती आहे. ही युती येत्या विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्यात येईल. युती धर्म पाळूनच आम्ही पुढे जाऊ’’, असे ढवळीकर यांनी सांगितले.
मगोचे लक्ष्य आणखी दोन मतदारसंघ! : राज्यातील सद्यस्थितीचा अंदाज घेत ढवळीकर बंधूंनी मगो पक्षाने बारा ते तेरा मतदारसंघांत काम सुरू केल्याचा दावा केला आहे. परंतु, त्यांचे अधिकाधिक लक्ष ताब्यात असलेल्या मांद्रेसह पेडणे, फोंडा, प्रियोळ आणि शिरोड्यावर आहे. मांद्रे आणि मडकईसह आणखी दोन मतदारसंघ मिळवण्यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्न करतील. परंतु, ते त्यांना द्यायचे की भाजपच्याच ताब्यात ठेवायचे? याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वच घेणार आहे. त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना काहीच दिवसांपूर्वी गोवा भेटीवर आलेल्या बी. एल. संतोष यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना दिल्या होत्या, असे सूत्रांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
मगो कार्यकारी समितीची लवकरच बैठक
‘‘मगो पक्षाच्या कार्यकारी समितीची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर आमसभा घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येतील. त्यानुसार दिल्लीतील बैठकीत युतीबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली जाईल. कार्यकारी समितीची बैठक आणि आमसभा झाल्यानंतर या चर्चेसाठी आम्ही दिल्लीला जाणार आहे. त्यांच्याशी बैठक झाल्यानंतर युती तसेच इतर गोष्टींबाबत मगोची भाजपसोबत अधिकृत चर्चा सुरू होईल आणि त्यानंतरच आम्ही त्यावर सार्वजनिक भाष्य करू’’, असेही मंत्री सुदिन ढवळीकर यांनी नमूद केले.
कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय
‘‘निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेले आमदार कोणत्या पक्षात जातील, हे सांगता येत नाही. गेल्या काही वर्षांत काँग्रेसचे असे अनेकजण भाजपमध्ये गेले आहेत. भविष्यातही तसे होऊ शकते. त्यामुळे मगो आणि भाजपने कार्यकर्ते टिकवून ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठीच भाजपशी युती करण्याबाबत आम्ही प्रथम कार्यकर्त्यांना विश्वासात घेणार असून, त्यांच्या म्हणण्यानुसारच पुढे जाणार आहोत’’, असेही सुदिन ढवळीकर यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.