Luthra Brothers Bail Dainik Gomantak
गोवा

Luthra Brothers Bail: 'अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवता येणार नाही'; बर्च क्लब आग प्रकरणात लुथरा बंधूंना जामीन

Birch by Romeo Lane Fire Case: प्रकरणावर निकाल देताना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपपत्रातील पुराव्यांवर अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: हणजूण येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबला लागलेल्या भीषण आग प्रकरणात म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन हमीदारांच्या अटीवर नियमित जामीन मंजूर केला आहे.

२५ निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनही केवळ तपासातील त्रुटी आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे व्यक्तीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात डांबून ठेवता येणार नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

या प्रकरणावर निकाल देताना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपपत्रातील पुराव्यांवर अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले की, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ (भाग २ - गैरइराद्यानेे सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी आरोपीला त्याच्या कृतीमुळे समोरच्या व्यक्तीचा मृत्यू ओढवू शकतो, याची थेट व पुरेशी पूर्वकल्पना असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.

आरोपी बँकॉक-फुकेतला पळून गेल्याच्या दाव्यावर न्यायालयाने सांगितले की, आरोपींचा पासपोर्ट आधीच जप्त केला असून त्यांच्यावर लुकआऊट नोटीस जारी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी स्वतःहून मुदतीत आत्मसमर्पण केले होते, तसेच यापूर्वी जामिनावर असताना त्यांनी कोणत्याही अटींचा भंग केला नव्हता.

या खटल्यात ३०६ साक्षीदार असल्याने आणि सहआरोपी फरार असल्याने प्रत्यक्ष खटला संपण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत निकाल लागण्यापूर्वीच आरोपीला दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे म्हणजे पूर्व-शिक्षेसारखे ठरेल जे संविधानाच्या कलम २१ चे उल्लंघन करते, असे नमूद करत न्यायालयाने दोघांनाही अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला.

जीव जाईल याची कल्पना नव्हती

प्रस्तुत प्रकरणात सौरभ व गौरव हे घटनेच्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित नव्हते, तर ते दिल्लीत होते. क्लबमध्ये कोल्ड पायरो किंवा स्पार्कलर मशीन वापरली जात होती याची त्याला कल्पना असली, तरी त्या मशीनच्या वापरामुळे प्रत्यक्ष आग लागून लोकांचा जीव जाईल याची त्याला पूर्वकल्पना होती, हे दर्शवणारा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणेने आरोपपत्रात सादर केलेला नाही

फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित

दस्तऐवजांच्या कथित फेरफार आणि बनावटीकरणाबाबत (कलम ३३६(३) व ३३८) न्यायालयाने नोंदवललेले निरीक्षण असे की, परवान्यासाठी वापरलेल्या कागदपत्रांवर निळ्या शाईने घर क्रमांक टाकल्याचा आरोप असला तरी तो फेरफार प्रत्यक्ष लुथरांनी स्वतः केला किंवा करवून घेतला याचे कोणतेही थेट पुरावे आरोपपत्रात नाहीत. उलट फॉरेन्सिक हस्ताक्षर तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

‘त्या’ कंपनीवर कारवाई नाही

ज्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या (के-डान्स इव्हेंट्स) व्यक्तींनी घटनास्थळी हजर राहून स्पार्कलर मशीन चालवली, त्यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. अशावेळी घटनास्थळी हजर नसलेल्या मालकावर केवळ मालकी हक्कावरून संपूर्ण गुन्हेगारी जबाबदारी लादून त्याला कोठडीत ठेवणे विसंगत ठरते, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

कलम १०५ गैरलागू

संबंधित मशीन पुरवठादाराच्या विधानानुसार अशा उपकरणांचा वापर सुरक्षित मानला जात होता आणि वर्षभरात यापूर्वी कोणतीही दुर्घटना घडली नव्हती. त्यामुळे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन किंवा अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे निष्पन्न झाले तरी ते जास्तीत जास्त कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू) या जामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत मोडू शकते. परंतु प्राथमिक स्तरावर कलम १०५ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या टप्प्यावर निष्पन्न होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayank Yadav Video: 144 किमी प्रति तास वेग...! मयंक यादवनं केली हेटमायरची दांडी गुल, तो बघतच राहिला; व्हिडिओ तूफान व्हायरल

VIDEO: टीम इंडियाला हरवलं, शतकही ठोकलं; तरी शे होप शांतच! 'मी कधीच जास्त उत्साहित होत नाही', विजयानंतरच्या विधानाची चर्चा

Arz NGO Goa: महिला-मुलींच्या संरक्षणासाठी गोवा सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 'अर्ज' संस्थेला कल्याणकारी संस्थेचा दर्जा

Tinder Scam: 'टिंडर'वर मैत्री, गोव्यात बोलावले अन् 'पोक्सो'ची धमकी! ज्येष्ठ नागरिकाला 95 हजारांचा गंडा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता 63 टक्के झाल्यास पगार किती वाढणार? 18,000 बेसिकवाल्यांचे गणित पाहा

SCROLL FOR NEXT