Khari Kujbuj Political Satire Dainiak Gomantak
गोवा

खरी कुजबुज: समाजाची सहानुभूती मिळविण्याचे राजकारण

Khari Kujbuj Political Satire: गोमंतक भंडारी समाजाच्या आमसभेनंतर आता समाजात नवीच मिश्कील चर्चा रंगू लागली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

स्टंटबाजी अशी नडली

चिखली विमानतळ मार्गावर भरधाव बोलेरो उलटली आणि चालक थोडक्यात बचावला. कारण काय? रस्त्यावर काही जणांचे “स्टंटबाजीचे ऑलिंपिक” सुरू होते म्हणे! आता वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी रस्ते असतात की सोशल मीडियासाठी रील्स शूट करण्यासाठी, हा प्रश्न पडू लागला आहे. आजकाल काही तरुणांना हेल्मेटपेक्षा हेअरस्टाईल महत्त्वाची आणि सुरक्षिततेपेक्षा “व्हायरल व्हिडिओ” महत्त्वाचा वाटतो. रस्त्याच्या मधोमध स्टंट करताना मागून येणाऱ्या वाहनांचा विचार नाही, अपघाताचा विचार नाही आणि जीवितहानीचा तर प्रश्नच नाही. जणू सार्वजनिक रस्ते म्हणजे त्यांची खासगी फिल्मसिटीच! या प्रकारात बोलेरोचालक बचावला ही सुदैवाची बाब, पण एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव गेला असता, तर त्या रीलवर किती “लाईक्स” आले असते? गोव्यात पर्यटन वाढतंय, वाहने वाढतायत; पण काहींची बेफिकीर स्टंटबाजी पाहता, शहाणपण मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललंय, असंच म्हणावं लागेल. ∙∙∙

पेडण्यात उत्तम पार्सेकर

सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी सेवानिवृत्तीनंतर राजकारणात येण्याचे आधीच ठरवून टाकले होते. तशी चर्चाही ते कार्यालयात असताना सुरू झाली होती. याचे कारण सत्ताधारी पक्षाशी असलेली त्यांची जवळीक आणि त्यांचे वेगवान कार्य. पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याविरोधात मतदारसंघात असलेली नाराजी आपल्याला फायद्याची ठरू शकते हे अनेक वर्षे सत्तेच्या अत्यंत जवळ वावरलेल्या पार्सेकर यांनी हेरले आहे. त्यांना उमेदवारी मिळणे ही तशी सोपी बाब आहे. त्यांचा फायदा आणखीन एक दोन मतदारसंघातही होऊ शकतो एवढी ताकद ते सध्या बाळगून आहेत. त्यामुळे पार्सेकर यांचा पक्षप्रवेश कधी आणि पेडण्यातील राजकारणाला कलाटणी कधी याची वाट अनेकजण पाहात आहेत. तूर्त पार्सेकर यांनी आपल्या नावाची चर्चा पेडण्यातील राजकीय वर्तुळाला करायला लावून पहिली चुणूक दाखवली आहे. ∙∙∙

कोणाचा राग कोणावर?

म्हापशातील खोर्ली येथे घराघरांतून कचरा गोळा करणाऱ्या चार नगरपालिका ट्रॉलींना आग लावण्यात आली आणि त्या जळून खाक झाल्या. आता प्रश्न असा की, कचरा व्यवस्थापनाचा राग व्यक्त करायचा म्हणून थेट कचऱ्याच्या गाड्याच जाळायच्या, ही कोणती नवीन “स्वच्छता मोहीम” सुरू झाली आहे?रस्त्यावर कचरा टाकणारे आपणच, घंटी वाजवली तरी कचरा वेळेवर न देणारे आपणच आणि मग “पालिका काही काम करत नाही” म्हणून संताप व्यक्त करत ट्रॉली जाळणारेही आपणच! म्हणजे घरातला कचरा बाहेर काढण्याऐवजी आता थेट व्यवस्थेचाच कचरा करण्याची फॅशन सुरू झाली की काय, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. या प्रकारामुळे नगरपालिकेचे नुकसान झालेच, पण शेवटी फटका बसणार तो सामान्य नागरिकांनाच. कारण उद्या कचरा उचलायला गाडी आली नाही, तर सोशल मीडियावर पहिला स्टेटस हाच “म्हापसा अस्वच्छ झालंय!” कचरा जाळून शहर स्वच्छ होत नसतं; उलट काहींच्या डोक्यात साचलेला संताप आणि बेफिकिरी किती धोकादायक आहे, हे मात्र नक्की दिसून येतं. ∙∙∙

दरोड्यातील सहावा संशयित कुठे?

दोन मोठ्या दरोडा प्रकरणात पाच संशयितांना दिल्लीहून गोव्यात आणताना पोलिसांनी जणू एखादा मोठा “इव्हेंट”च केला होता. पत्रकार परिषद, मोठमोठे दावे आणि “सहाव्यालाही लगेच आणू” अशा घोषणा झाल्या, पण आता तो सहावा संशयित अजूनही दिल्लीतच असल्याने लोक प्रश्न विचारू लागले आहेत. पाचजणांना आणून नेमके काय मिळाले, चौकशीत काय उघड झाले, याबाबतही पोलिस गप्प आहेत. त्यामुळे “सहावा संशयित पोलिसांना खरंच हवा आहे की फक्त घोषणांपुरताच होता?” अशी मिश्कील चर्चा सुरू झाली आहे. आता हा अंदाज चुकीचा की बरोबर, हे पोलिसांनीच स्पष्ट करायला हवे, असे लोक म्हणू लागले आहेत. ∙∙∙

मृत्यू गव्यामुळे की घातपात?

उसगावच्या दिनेशचा बिचाऱ्याचा जीव गेला आणि आता त्यावर चर्वितचर्वण होत आहे. त्याचा मृत्यू गव्यामुळे झाला की घातपात? यावर हे चर्वितचर्वण आहे. तसे पाहिले तर फोंड्यात गव्यांनी उच्छाद मांंडला आहे. कुर्टी, ढवळीसारख्या भागातून हे गवे चक्क फोंडा बसस्थानकावर येऊ लागले आहेत. रात्रीच्या वेळेला हे गवे बसस्थानक परिसरात फिरताना आढळल्याने प्रवाशांची त्रेधा उडाली होती. सहा महिन्यांपूर्वीचा हा प्रकार आहे, पण आता सर्रासपणे आणि बिनधास्त हे गवे फोंडा शहरातून चक्कर मारताना दिसतात, जसं काही या गव्यांचे ‘मून वॉक’च आहे. दीड वर्षापूर्वी एका महिलेच्या पोटात गव्याने शिंग खुपसल्याने तिचा मृत्यू झाला होता. या गव्यांना दूर रानात पिटाळून लावण्याचे काम वन खात्याचे आहे. वन खाते म्हणते आम्ही त्यांना पिटाळून लावतोच, पण ते पुन्हा पुन्हा येतात, हे ‘पुन्हा पुन्हा’ चे नक्की कारण काय? याचा शोध वन खात्याचे अधिकारी लावतील काय? ∙∙∙

आरजी बंडामागे कोणाचा हात?

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सध्या कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहण्याचे ठरविल्याचे दिसते. पक्ष संघटनेने आयोजित केलेल्या विजयी मिरवणुका, धरणे आंदोलने व इतर कार्यक्रमांना हे दोघेही हल्ली हजर राहत नाहीत. सोमवारी पणजीत अल्पसंख्याक विभागाच्या पदग्रहण कार्यक्रमालाही दोघेही गैरहजर राहिले. त्यातच आज आरजीच्या मनोज परबांनी समाज माध्यमांवर आपल्याच पक्षातील पदाधिकारी व इतरांना संबोधून वेगवेगळे पोस्ट टाकल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले. आरजी प्रकरणाची सगळी रणनीती विरोधी गटातील दोन विद्यमान आमदारांनी रचल्याचे पिल्लू कुणीतरी सोडले आणि त्याची चर्चा काँग्रेस भवनात सुरू झाली. आमदार वीरेश बोरकर काँग्रेसमध्ये येणार काय, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे ते दोन आमदार काँग्रेसचे तर नाहीत ना? याचा शोध अमित पाटकर, कॅप्टन विरियातो, एम. के. शेख यांनी घेण्यास सुरुवात केली आहे म्हणे. ∙∙∙

गिरीश यांचे वजन वाढले

तमिळनाडूमध्ये निवडणुकीत काँग्रेस पक्ष काही चांगली कामगिरी बजावू शकला नाही. तरीही राजकारणात काही वेगवान हालचाली कराव्या लागतात. केरळात हा पक्ष मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारच निश्चित करू शकला नाही, परंतु तमिळनाडूत ज्या पद्धतीने पक्षाने टीव्हीकेला पाठिंबा देऊन अभिनेता विजय यांना मुख्यमंत्री बनण्यास मदत केली, त्यामुळे राहुल गांधी खूष आहेत. ते स्वतः विजय यांच्या शपथविधीसही उपस्थित राहिले. त्यामुळे गिरीश चोडणकर यांचा मान वाढला असून दिल्लीतही त्यांचे राजकीय वजन वाढण्यास मदत झाली. विजय यांनी मंगळवारी स्वतः काँग्रेस पक्षाच्या सत्यमूर्ती भवनला भेट दिली, त्यावेळी गिरीश यांनी त्यांचे स्वागत केले. त्यामुळेच गिरीश प्रदेशाध्यक्ष बनून गोव्यात परतत असल्याच्या चर्चेने जोर पकडला असावा. ∙∙∙

रुजावी भक्ती, तीच चिरशांती

गोवा ही देवभूमी आहे. इथे देवदेवतांची वसती फार पूर्वीपासून आहे. मंदिरं ही भक्तीची केंद्रं. तिथं आध्यात्मिक सात्त्विक स्पंदनं प्रसरण पावतात. म्हणूनच भवतापांत पोळलेल्यांना तिथं जाऊन प्रणिपात केल्यावर एक विसावा, आंतरिक आराम मिळतो. देव अशाने मिळायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे... असं एक बोधप्रद गीत आहे. मंदिरांत समर्पण शरणागत भावनेने भक्ती घडणं महत्वाचं. मंदिरांत सामाजिक सांस्कृतिक एकोपा घडतो. तिथं सेवा भावना आत्यंतिक गरजेची. कर्तेपणा चालत नाही. अहंकार असल्यावर गटबाजी, वादावादी होते, जिला भक्तीमय माहोलात थारा असूच शकत नाही. मंदिरं हवी, तिथं भाव तोचि देव, ही भावना रूजावी. अपार प्रिती ही भक्ती. भक्ती म्हणजे शक्ती. चिरशांती. ∙∙∙

समाजाची सहानुभूती मिळविण्याचे राजकारण

गोमंतक भंडारी समाजाच्या आमसभेनंतर आता समाजात नवीच मिश्कील चर्चा रंगू लागली आहे. “आमसभेला जाणार नाही” अशी भूमिका घेणाऱ्या देवानंद नाईक गटालाच सभेत काय झाले, कोण काय बोलले आणि कोणते निर्णय झाले याची इतकी सविस्तर माहिती कशी, असा प्रश्न समाजबांधव विचारू लागले आहेत. काहींचे म्हणणे आहे की, जर खरोखरच निर्णयांवर आक्षेप होता, तर पत्रकार परिषद घेण्यापेक्षा थेट सभेत जाऊन प्रश्न विचारायला हवे होते. तर दुसरा गट आता “हे सगळे समाजाची सहानुभूती मिळविण्याचे राजकारण तर नाही ना?” अशी गुप्त चर्चा करू लागला आहे. त्यामुळे “सभेत गेले असते तर चित्र वेगळे दिसले असते,” अशी टोमणेबाज चर्चा समाजात रंगू लागली आहे. ∙∙∙

सर्व काही आलबेल!

बंदर कप्तान खात्यातील एका महिलेला कार्यालयात झालेल्या त्रासाबद्दलचे प्रकरण कार्यालयीन महिला तक्रार निवारण समितीकडे गेले आहे. या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे. ज्या व्यक्तीविरोधात महिलेने तक्रार दिलेली आहे. खात्यातीलच जो कर्मचारी महिलेला त्रास देत आहे, तो कॅप्टन आणि रेडिओ ऑफिसरच्या म्हणे मर्जीतील आहे. त्याला वाचवण्याठी रेडिओ ऑपरेटरने जोर लावला आहे, अशी चर्चा कार्यालयात आहे. ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे, ती व्यक्ती कार्यालयात वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वांची मर्जी राखते. त्यामुळे ज्याच्याविरोधात तक्रार आहे, तो आपल्याला काहीच होणार नाही, अशा आविर्भावात वावरत आहे. ∙∙∙

लोकोत्‍सवातील गर्दीने बाबूंची लोकप्रियता

माजी उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांच्‍या वाढदिवसाला लोकांनी केलेली गर्दी हा चर्चेचा विषय बनलेला असतानाच त्‍यानंतर आणखी तीन दिवसांनी बेतूल येथे आयोजित केलेल्‍या लोकोत्‍सव कार्यक्रमालाही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्‍यामुळे केपे मतदारसंघात मागच्‍यावेळी बाबू निवडणूक हरले, तरी त्‍यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे यावर जणू शिक्‍कामोर्तब झाले. या लोकाेत्‍सवात वेगवेगळे लोकनृत्‍याचे कार्यक्रम आयाेजित करण्‍यात आले होते आणि त्‍यात उत्‍स्‍फूर्तपणे संघ सहभागी झाले होते. हे सर्व पाहिल्‍यास बाबू हे अजूनही केपे मतदारसंघात आपली लोकप्रियता टिकवून आहेत यावर शिक्‍कामोर्तब झाले असे म्‍हटल्‍यास ती अतिशयोक्‍ती होणार का? ∙∙∙

मनोजचा वार वीरेशवर!

गत विधानसभा निवडणुकीत दर्जेदार कामगिरी करीत वीरेश बोरकर यांच्‍या रूपाने एक आमदार निवडून आणलेल्‍या रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स (आरजीपी) पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्‍याचे या पक्षाचे अध्‍यक्ष असलेल्‍या मनोज परब यांनी सोशल मीडियावर टाकलेल्‍या पोस्‍टमधून स्‍पष्‍ट होते. मनोज परब यांनी ज्‍यांना ‘टार्गेट’ केलेले आहे, ते आमदार बोरकर यांच्‍या जवळचे आहेत, पण बोरकर यावर अजूनही बोलण्‍यास तयार नाहीत. उलट काहीच दिवसांपूर्वी पक्षात कोणताही वाद नाही. मनोज परब हेच आमचे नेते आहेत असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते, आताही बोरकर कोणत्या तरी ‘वेळे’ची वाट पाहात असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. एक दोन दिवसांत मनोज त्यांच्यावर घसरेल अशी बोरकरांच्या मित्रांना खात्री आहे. तीच संधी बोरकर साधणार आहेत! ∙∙∙

अंतर्गत प्रचाराला सुरवात

राज्यातील विधानसभा निवडणूक कदाचित नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होणार असे ऐकिवात आहे. आता खरे खोटे केवळ राजकारणीच जाणे. वास्तविक ही निवडणूक येत्या वर्षीच्या मार्चमध्ये अपेक्षित होती, पण चार ते पाच महिने अलीकडे ही निवडणूक आणून सरकार काय साधू इच्छिते त्याचे गणित काही विरोधकांना समजू शकलेले नाही. आता निवडणूक म्हटली की त्यात सरकारचा हस्तक्षेप हा आलाच! त्यामुळेच की काय, आता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात अंतर्गत प्रचाराला सुरवात केली आहे. प्रत्येकजण आमदार होण्यासाठी धडपडतो आहे, त्यामुळे काय माहीत कोण निवडून येईल तो..! ∙∙∙

हा घ्या पुरावा!

पणजीतील नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एका विद्यमान नगरसेवकाचे तिकीट कापण्यामागे भंडारी समाजाचे बोगस प्रमापणत्र मिळवण्याचे कारण असल्याची चर्चा आहे. या नगरसेवकाने भंडारी समाजाच्या अध्यक्षाकडून हे प्रमाणपत्र मिळविले होते. ॲड. आतिष मांद्रेकर यांनी भंडारी समाजाच्या बैठकीत बोगस जात प्रमाणपत्राचा उल्लेख केला होता. त्याशिवाय नगरसेवकांची नावे न घेता त्यांनीही बोगस प्रमाणपत्र मिळविले होते, हेही सांगितले होते. मंगळवारी माजी अध्यक्षांनी बोगस प्रमाणपत्र दिले गेल्याचा दावा फेटाळून लावला होता. परंतु मांद्रेकर यांनी त्यांच्या पोस्टवर नगरसेवकाला दिलेल्या प्रमाणपत्राची कॉपीच जोडली आणि अध्यक्षाला आरसाच दाखवला आहे.

सावर्डेत बक्षिसांची वाढती पावणी

विधानसभा निवडणूक जवळ आल्‍यामुळे सावर्डे मतदारसंघात वेगवेगळ्‍या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्‍याच्‍या प्रकारांना अक्षरश: ऊत आला असून सुरुवातीला दीपक पाऊसकर यांनी पुरस्‍कृत केलेली ‘पाऊसकर चषक स्‍पर्धा’ झाली. त्‍यानंतर आमदार गणेश गावकर यांची ‘आमदार चषक क्रिकेट स्‍पर्धा’ झाली. त्‍याच दरम्‍यान विधानसभा निवडणूक लढविण्‍यासाठी उत्सुक असलेले संकेत आर्सेकर यांनी व्‍हॉलीबॉल स्‍पर्धा आयोजित केली. सर्वांत वरचढ म्‍हणजे माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी आयाेजित केलेली ‘तेंडुलकर चषक क्रिकेट स्‍पर्धा’ ही होय. पाऊसकर यांच्‍या स्‍पर्धेचे पहिले बक्षीस ५० हजार रुपये होते, तर आमदार गणेश गावकर यांच्‍या स्‍पर्धेचे पहिले बक्षीस १ लाख रुपयांचे होते. विनय तेंडुलकर यांनी चक्‍क २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले. आयपीएलमध्‍ये जशी चढ्या भावाची पावणी हाेते त्‍याचप्रमाणे सावर्डेतही आता बक्षिसांची रक्‍कम दिवसेंदिवस वाढत आहे. . ∙∙∙

एसटी नेत्‍यांची आक्रमकता रोखणार?

राज्‍यातील अनुसूचित जमातीचे (एसटी) नेते समाजावरील अन्‍याय रोखण्‍यासाठी गेल्‍या काही वर्षांपासून मैदानात उतरले आहेत. एसटी समाजाला बाधक ठरणाऱ्या प्रकल्‍पांविरोधात शड्डू ठोकत त्‍यांनी सरकारला ते प्रकल्‍पही रद्द करण्‍यास भाग पाडले. आता त्‍यांचे लक्ष लागले आहे, ते आगामी विधानसभा निवडणुकीतील एसटी आरक्षणाकडे. यासंदर्भातील विधेयक केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतले आहे, परंतु त्‍याची अंमलबजावणी होण्‍याची शक्‍यता दिसत नसल्‍याने एसटी समाजाचे नेते हळूहळू आक्रमक होत आहेत. त्‍यांची आक्रमकता निवडणूक वर्षात वाढू नये यासाठी आता राज्‍य सरकार आणि प्रदेश भाजप नेमके काय करणार? याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून राहिले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dinesh Gaude Death Case: होमगार्ड दिनेश गावडेंचा मृत्यू गव्‍याच्या हल्ल्यातच, पोलिसांचा मोठा खुलासा; वन खात्‍याचे अनेक प्रश्‍‍न अनुत्तरितच

Goa Accident: गोव्यात आला अन नियतीनं घात केला! उत्तर प्रदेशच्या 30 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू; ट्रकनं दिली जोरदार धडक

Saligao Panchayat: विश्वासघात अन् अधिकारांचा गैरवापर! साळगाव पंचायत सचिवाचं तडकाफडकी निलंबन; कागदपत्रांमध्ये फेरफार करणं पडलं महागात

Goa Politics: "बापाला मुलांनी शिकवू नये!" मनोज परब यांच्या 'पोस्ट'ने पक्षात खळबळ; ‘आरजी’तील मतभेद चव्‍हाट्यावर!

Goa Tribal Leaders Unity: आदिवासी नेत्यांच्या 'ऐक्या'वर अखेर मोहोर, तवडकर गावडेंमधील मतभेद संपुष्टात; निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी रणनीती

SCROLL FOR NEXT