पणजी: प्रतिष्ठित टुडेज ट्रॅव्हलर अवॉर्ड्स 2024 मध्ये गोवा पर्यटन विभागास एक्सलेन्स इन टुरिझम लीडरशिप आणि बेस्ट स्टेट फॉर रिजनरेटीव्ह टुरिझम, असे दोन सर्वोच्च सन्मान प्राप्त झाले. भारतातील प्रवास, आदरातिथ्य, हवाई वाहतूक क्षेत्रातील उत्कृष्टतेस गौरवत टुडेज ट्रॅव्हलर मासिकाने आपला 27 वा वर्धापनदिन साजरा केला. नवी दिल्लीतील ताज पॅलेस येथे हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना माननीय न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या हस्ते ट्रॅव्हलर अवॉर्ड्समध्ये एक्सलेन्स इन टुरिझम लीडरशिप (Excellence in Tourism Leadership) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ट्रॅव्हलर अवॉर्ड्स 2024 मध्ये गोवा पर्यटनाला देशांतर्गत पर्यटन श्रेणी अंतर्गत बेस्ट स्टेट फॉर रिजनरेटीव्ह टुरिझम (Best State for Regenerative Tourism) अर्थात पुनर्संचयित पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून गौरवण्यात आले. गोव्याचे उपनिवासी आयुक्त विकास एस. कांबळे, जीसीएस, यांनी गोवा पर्यटन विभागाच्या वतीने पुरस्कार हा पुरस्कार स्वीकारला.
'हा सन्मान केवळ वैयक्तिक कामगिरी नसून पर्यटन विभागाच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आम्ही नेहमीच गोव्याला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. पुनर्संचयित पर्यटनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य जतन करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी होते', असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले.
ट्रॅव्हलर अवॉर्ड्स 2024 मध्ये गोव्याला मिळालेल्या पुरस्काराचा विशेषत: पुनर्संचयित पर्यटनाच्या क्षेत्रात मिळालेल्या पुरस्काराचा आम्हाला अभिमान आहे. हा पुरस्कार पर्यटन व्यवस्थापनासाठी आमच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा पुरावा आहे. आमचे लक्ष केवळ पर्यटकांना उत्तम अनुभव देणे इतकेच नसून आमचे स्थानिक समुदाय आणि पर्यावरणाला देखील पर्यटनाचा लाभ देणे आहे, असे गोवा पर्यटन विभागाचे संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका म्हणाले.
'मंत्री रोहन खंवटे यांचे पुनर्संचयित पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल अभिनंदन. त्यांच्या अनुकरणीय कार्यामुळे आणि शाश्वत पद्धतींबद्दलच्या वचनबद्धतेमुळे त्यांना पर्यटन नेतृत्वात योग्य ओळख मिळाली आहे. त्यांनी एक मापदंड प्रस्थापित केला असून इतरांना अनुसरण करण्यास प्रेरित करेल, असे टुडेज ट्रॅव्हलर आणि गिल इंडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक कमल गिल म्हणाले.
23 ऑगस्ट 2024 रोजी पार पडलेला टुडेज ट्रॅव्हलर समिट आणि अवॉर्ड्स 2024 हा कार्यक्रम प्रवास आणि पर्यटन उद्योगातील महत्त्वाचा कार्यक्रम होता. या शिखर परिषदेची सुरुवात गोवा पर्यटनाच्या चित्रफितीने झाली, ज्यामध्ये राज्याच्या वैविध्यपूर्ण पर्यटन सेवा आणि शाश्वत पर्यटनासाठीची वचनबद्धता दर्शविली गेली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.