Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: 'आम्हाला न्याय द्या’; बाणास्तरीतील मृतांच्या नातेवाईकांचे सरकारकडे साकडे; दिवाडी बेटावर शोककळा

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident: ‘माझ्या मुलीला सांभाळा’, असे आपल्या शेजारच्या मैत्रिणीला सांगून भावना फडते या रविवारी घराबाहेर पडल्या होत्या. जणू काही आपण परतणार नसल्याची जाणीव त्यांना झाली होती, अशी आठवण बाणस्तारी अपघातातील मृत फडते दाम्पत्याचा मुलगा साहील याने साश्रूपूर्ण नयनांनी सांगितली.

काळाने फडते कुटुंबावर घाला घातल्याने संपूर्ण दिवाडी बेटासह कुंभारजुवे मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. ‘आमचा मायेचा हात हरपला, आम्हाला न्याय द्या’, अशा दु:खद स्वरात दिवंगत सुरेश फडते (५८) आणि भावना फडते (५२) यांची दोन मुले साहील (२७) आणि आंचल (२१) यांनी सरकारला साकडे घातले.

दिवाडीतील मुड्डी, मळार येथे ब्राह्मण देवाच्या मंदिराजवळ फडते यांचे घर आहे. हल्लीच त्यांनी घराचे बांधकाम सुरू केले असून सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. सुरेश हे खोर्ली येथील फन्स्कूल येथे इलेक्ट्रिशन म्हणून कामाला होते. ३१ जुलै रोजी ते निवृत्त झाले होते.

परंतु शाळा व्यवस्थापनाने त्यांना एक वर्षासाठी मुदतवाढ घेण्याची विनंती केली होती. सुरेश आणि भावना हे अत्यंत शांत स्वभावाचे दाम्पत्य. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मुड्डी परिसर शोकाकुल झाला आहे.

फडते यांचे पुत्र साहील हे पोलिस खात्यात रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण शाखेत छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. ते म्हणाले, रविवारी सायंकाळी ६ वाजता त्यांना कामावरून फोन आल्याने घरातून निघाल्यानंतर फेरीबोटीत वडिलांची भेट झाली.

त्यानंतर मी कामानिमित्त थेट वास्को येथे गेलो. काम संपवून परतताना वारंवार मोबाईल वाजू लागला. अखेर सेंट जासिंतो बेटाजवळ वाहन थांबवून फोन घेतला असता, बाबांना अपघात झाल्याचे कळले.

थेट गोमेकॉत गेलो असता, डॉक्टरांनी बाबा गेल्याचे सांगितले. मात्र, आई कुठे आहे, हे कळत नव्हते. नंतर आईचाही मृतदेह सापडला आणि तीही आम्हाला सोडून गेल्याचे समजल्यावर माझ्यावर आभाळच कोसळले. सुरेश यांच्या पश्‍चात वृद्ध आई-वडील, भाऊ- भावजय, दोन मुले आणि पुतण्या असा परिवार आहे.

अन् रडताही येईना...

आज आई-बाबा गेले तरी मला रडता येत नाही. कारण घरात वृद्ध आजी-आजोबा असून त्यांना आधार द्यायचा आहे. आजोबा विनायक आणि आजी सत्यवती दोघेही ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. या कठीण काळात त्यांच्या आरोग्याची आम्हाला चिंता आहे. त्यांना रक्तदाबाची समस्या आहे, असे साहील यांनी सांगितले.

विद्युतीकरण अपुरे

फडते यांनी दोन महिन्यांपूर्वी घराचे बांधकाम सुरू केले होते. विद्युतीकरणाचे काम सुरेश स्वतःच मित्र सदानंद सावंत यांच्या सहकार्याने करत होते. रविवारी जाण्यापूर्वी सुरेश यांनी सदानंदची भेट घेऊन शेवटच्या टप्प्याच्या कामाची कल्पना दिली होती.

मात्र, आता ते हयात नसल्याने त्यांच्या मित्रालाच ते पूर्ण करावे लागणार आहे. बांधकामासाठी सुरेश यांनी आपल्याकडील सगळे पैसे खर्च केले असून साहील यांनी ९ लाखांचे कर्ज घेतले आहे.

‘ती’ प्रार्थना ठरली अखेरची

गोमेकॉत जाताना वाटेत बांबोळी येथे ‘फुलांचो खुरिस’ दिसला. तेथे फुले आणि मेणबत्ती लावल्याने देव पावतो, असे ऐकले होते. त्यासाठी गाडी थांबवून गेलो. खिशात केवळ १०० रुपये होते. ते देऊन फुले घेतली.

आई-वडील सुखरूप असू देत, अशी प्रार्थना केली. आता देवा तूच पाव रे बाबा, असा धावा केला; परंतु तोपर्यंत काळाने घाला घातला होता, अशी ‘आपबिती’ साहील यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (मंगळवारी) साहील यांची फोनवरून विचारपूस केली. ‘अशा कठीण काळात धीर सोडू नका’, असे सांगून त्यांनी सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.

‘आम्हाला न्याय द्या’ अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली, असे साहील यांनी सांगितले. सोमवारी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी फडते कुटुंबीयांची भेट घेऊन, आपण तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT