पणजी: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या नाईट क्लबच्या आगीत २५ जणांचा जीव गेल्याप्रकरणी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी भाष्य करावे, अशी जोरदार मागणी विरोधी आमदारांनी सोमवारी (१२ जानेवारी) विधानसभेत केली. त्यांनी मागणीचे फलक फडकवत, घोषणा देत सभापतींसमोरील हौदात धाव घेतल्यानंतर, सभापती गणेश गावकर यांनी विरोधी आमदारांना मार्शलांकरवी विधानसभेबाहेर काढले.
आठव्या गोवा विधानसभेच्या १२ व्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होत असतानाच विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज विस्कळीत केले.
राज्यपाल सभागृहात येताच आणि त्यांनी आपले पहिलेच अभिभाषण सुरू करण्यासाठी उभे राहताच विरोधी पक्षनेते युरी अलेमाव यांनी हस्तक्षेप करत, राज्यातील गंभीर प्रश्नांवर राज्यपालांनी भाष्य करावे, अशी मागणी केली.
विशेषतः रोमिओ लेन येथील 'बर्च' नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झालेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख अभिभाषणात व्हावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. तसेच राज्यासमोरील इतर ज्वलंत प्रश्नांकडेही लक्ष वेधण्याची मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत, सभागृहाची शिस्त व शिष्टाचार पाळण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी सभापतींना विरोधी पक्षनेत्यांना सभागृहातील संकेतांचे पालन करण्यास सांगण्याची विनंती केली. यादरम्यान राज्यपालांनी आपले अभिभाषण सुरू केले.
मात्र, या घडामोडींनंतरही विरोधकांचा संताप शमला नाही. सभागृहातील सातही विरोधी आमदारांनी हातात फलक घेऊन सभापतीसमोरील हौद्यात प्रवेश केला. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू करत आपला निषेध नोंदवला. त्यामुळे काही काळासाठी सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले.
राज्यपालांकडून गोवा पोलिसांचे कौतुक
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य करताना राज्यपालांनी गोवा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. राज्यात गुन्ह्यांचा शोध घेण्याचे प्रमाण ८७.७२% इतके उच्च आहे, जे देशातील सर्वोत्तम कामगिरीपैकी एक आहे.
गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस दल आणि इतर तपास यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी एआय आधारित तपास यंत्रणा अधिक सक्षम केल्या जात आहेत. यामुळे गुन्हेगारांची ओळख पटवणे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करणे अधिक सोपे होणार आहे.
गोंधळात अधिवेशनाची सुरवात
हे अभिभाषण राज्यपाल पुसपती अशोक गजपती राजू यांचे गोवा विधानसभेतील पहिलेच अभिभाषण होते. या गोंधळातही अधिवेशनाची औपचारिक सुरुवात झाली असून, हे पाच दिवसांचे अधिवेशन शुक्रवार १६ जानेवारी पर्यंत चालणार आहे.
आगामी दिवसांत विकासकामे, सार्वजनिक प्रश्न तसेच विविध धोरणात्मक मुद्द्यांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र पहिल्याच दिवशी झालेल्या गोंधळामुळे अधिवेशनाच्या पुढील कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.