Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

Ponda: फोंड्यात ‘रविराज’ अबाधित राहणार? चर्चेला उधाण; अंतर्गत बंडाळी ठरणार आव्हान

Goa Politics: १९८४ साली मगोपच्या रवी नाईकांनी विधानसभेत प्रवेश केल्यानंतर फोंड्याची समीकरणेच बदलून गेली. तेव्हापासून ते आजपर्यंत हा मतदारसंघ रवींच्या कलाने फिरत राहिला आहे.

Sameer Panditrao

फोंडा : विधानसभा निवडणुका जरी दीड वर्षावर असल्या तरी अनेक मतदारसंघांत निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहे. फोंडा मतदारसंघ हा त्यापैकी एक. १९६७ ते १९९४ पर्यंत १९८० चा अपवाद वगळता हा मतदारसंघ नेहमीच मगोपच्या बाजूनेच राहिला.

केवळ १९८० साली फोंड्यात अर्स काँग्रेसचे जोईल्द आगीयार यांनी बाजी मारली होती. पण १९८४ साली मगोपच्या रवी नाईकांनी विधानसभेत प्रवेश केल्यानंतर फोंड्याची समीकरणेच बदलून गेली. तेव्हापासून ते आजपर्यंत हा मतदारसंघ रवींच्या कलाने फिरत राहिला आहे.

यादरम्यान १९८९ व १९९४ साली जरी मगोपचे शिवदास वेरेकर निवडून आले असले तरी त्यावेळी रवींनी फोंड्याऐवजी मडकईतून निवडणूक लढवली होती. त्यांची फोंडा मतदारसंघावरची पकड कायम असल्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसमय झाला.

त्यामुळेच १९९९ ते २०१७ पर्यंत २०१२ चा अपवाद वगळता रवी येथून काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने निवडून येत राहिले. २०१२ साली मगोप - भाजपची युती झाल्यामुळे रवी पराभूत झाले; पण त्याचा वचपा त्यांनी २०१७ साली काढलाच. २०२२ साली रवींनी भाजपमध्ये प्रवेश करताच परत एकदा समीकरणे बदलली.

फोंड्याने भाजपच्या दिशेने मतदानाची दिशा वळविली. त्यामुळे प्रथमच या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकू शकला. यामुळे फोंड्यावर असलेले ‘रविराज’ अधोरेखित होते. मात्र, यावेळी रवी रिंगणात उतरण्याची शक्यता कमी असल्यामुळे नवी समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे आहेत.

यातूनच आगामी निवडणुकीत फोंड्यात इतकी वर्षे अस्तित्वात असलेले ‘रविराज’ अबाधित राहणार की नाही, अशी चर्चा सुरू आहे. रविपुत्र रितेश हे त्यांच्या जागी रिंगणात उतरू शकतात, असे बोलले जात आहे; पण नगरसेवक विश्वनाथ दळवी या ‘रविराज’ला सुरूंग लावण्याच्या तयारीला लागल्याचे दिसत आहेत. फोंड्याची भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचा सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरू असून त्यांनी मोर्चेबांधणीही केली आहे.

रवी हे राजकारणातील मुरब्बी खिलाडी असल्यामुळे दळवींचा प्रयत्न सफल होईल की नाही, हे सांगणे सध्या कठीण असले तरी त्यांनी रितेशपुढे पर्यायाने रवींपुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता या आव्हानाला रवी कसे तोंड देतात, याचे उत्तर काळच देणार आहे.

भाजपपेक्षा रितेशना काँग्रेसची उमेदवारी सुरक्षित

उमेदवारीसाठी रितेशना भाजपपेक्षा काँग्रेस जास्त सुरक्षित असल्याचे मानले जात आहे. फोंड्यात अल्पसंख्याकांची सुमारे साडेआठ हजार मते असल्यामुळे त्याचा फायदा रितेशना होऊ शकतो. मात्र, भाजपच्या उमेदवारीवर रिंगणात उतरल्यास त्यांना अंतर्गत बंडाळीला तोंड द्यावे लागू शकते, असा होरा राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. नेमके काय होणार, हे काही दिवसांत समजेल.

भाजपची उमेदवारी कोणाला?

हल्लीच फोंडा येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रवी नाईक आणि विश्‍वनाथ दळवी या दोघांनाही कार्य करायला सांगितल्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला, याविषयी कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत.

रवींच्या कारकिर्दीतच विकास

फोंडा मतदारसंघातील बहुतेक विकासकामे ही रवी नाईक यांच्याच कारकिर्दीत झालेली आहेत आणि त्यांचे सातत्याने निवडून येण्यामागे हेही एक कारण आहे. लोकांचाही त्यांना मोठा पाठिंबा लाभत आहे; पण आता याचा फायदा रितेश नाईक यांना किती होणार, ते मात्र पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT