Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेबाबत वेगळेच कनेक्शन समोर! युवकाचा झाला होता बुडून मृत्यू; भुताटकी असल्याचा काहींचा दावा

Arpora Nightclub Fire: तळमजल्यावरील स्वयंपाकघरात असलेले कर्मचारी धोक्याची सूचना मिळताच बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

तळमजल्यावरील स्वयंपाकघरात असलेले कर्मचारी धोक्याची सूचना मिळताच बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी बाहेर येण्यासाठी दरवाजा उघडताच, अचानक कोणीतरी बाहेरून दरवाज्याला कडी लावली.

यामुळे कर्मचारी आतमध्येच पूर्णपणे अडकून पडले. आगीच्या धुरामुळे आणि बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्यामुळे त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली आणि जीव वाचवण्यासाठी मदतीची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नाही.

सुरुवातीला सौम्य आगीचे नंतर रौद्ररूप

शनिवारी रात्री साडेदहाच्‍या सुमारास आग लागली. सुरुवातीला आगीची तीव्रता खूप कमी होती, पण काही वेळातच तिने भीषण रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. स्थानिक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, जर अग्निशमन दलाला सुरुवातीलाच सूचना दिली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती.

अग्निशमन दलाला अरुंद गेटचा अडथळा

या क्लबला मुख्यत्वे दोन गेट आहेत. एक मुख्य आणि दुसरा मागील बाजूला. मुख्य गेटमधून अग्निशमन दलाची गाडी आत जाणे कठीण बनले. कारण तो खूपच अरुंद होता. त्यामुळे दलाला मार्ग शोधावा लागला. यात मोलाचा वेळ वाया गेला. विशेष म्‍हणजे हे सर्व बेकायदेशीर असल्याचे पंचसदस्यांनाही माहिती होते, असा आरोप स्‍थानिकांनी केला आहे.

मुख्यमंत्री पहाटे ३.३० वाजता घटनास्थळी

आगीची माहिती मिळताच, मुख्यमंत्री घटनास्थळी रविवारी पहाटे ३.३० च्या आसपास पोहचले. त्यांच्यासोबत कळंगुटचे आमदार मायकल लोबो, पोलिस महासंचालक आलोक कुमार होते. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, आपत्कालीन तसेच आगीसारख्या दुर्घटनेच्या वेळी बचावासाठी तत्सम यंत्रणा या क्लबमध्ये नव्हत्या. याप्रकरणी दोषी क्लब मालक तसेच क्लबला परवानगी दिलेल्‍या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल.

अशी आणली आग नियंत्रणात

नाईट क्‍लबमध्‍ये जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने अग्निशमन दलाला ४०० मीटरहून अधिक लांबीचे पाईप टाकावे लागले. महत्त्वाचे म्हणजे, क्लबमध्ये आग विझविण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. जर ती यंत्रणा असती तर त्या यंत्रणेतच पाईप जोडून आग वेळीच आटोक्यात आली असती, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पुढे ‘मेहबुबा-मेहबुबा’ गाणे सुरू असताना मागे भडकली आग!

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी ती घटना घडण्याच्या अगदी काही सेकंद पूर्वीची आहे, जी २५ लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. क्लबच्या डान्स फ्लोअरवर एक रशियन बेली डान्सर ‘शोले’ चित्रपटातील ‘मेहबुबा...मेहबुबा’ गाण्‍यावर डान्‍स करत असतानाच अचानक आग लागते आणि सर्वांची धावपळ उडाल्‍याचे या व्हिडिओत दिसते.

डान्‍स सुरू झाल्यावर साधारण दहा सेकंदांतच बेली डान्सरच्‍या अगदी बाजूला आणि वरच्या बाजूला असलेल्या छतावर अचानक प्रखर ज्वाळा भडकतात. आग क्षणार्धात संपूर्ण छतावर अतिशय वेगाने पसरते. त्यानंतर काही क्षणातच तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये पळापळ सुरू होते. डान्स फ्लोअरवर वापरलेल्या इलेक्ट्रिक पायरो गनमधून निघालेल्या ठिणग्या ज्वलनशील सामग्रीवर पडल्याने आग भडकली. दरम्‍यान, या दुर्घटनेतून ती रशियन डान्‍सर बचावली आहे.

आगर आणि क्लब

हा क्लब ज्या ठिकाणी उभा आहे ती जागा आहे आगराची. आजूबाजूला देखील पारंपरिक आगर आहेत. एवढेच नव्हे तर चक्क क्लबमध्ये देखील आत आगर आहे. स्‍थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आत जाण्यासाठी आगरातून वाट देखील केलेली आहे. गोमंतकीयांचा एकेकाळी मिठागर व्यवसाय होता, तो अशा अनेक कारणांमुळे उद्‌ध्‍वस्‍त झाला आहे. याकडे आमदाराचे लक्षच नाही अशा तक्रारी होत आहेत.

व्यवस्थापक घटनेवेळी होता अनुपस्थित

मिळालेल्‍या माहितीनुसार, घटनेच्या वेळी क्लबचा व्यवस्थापक उपस्थित नव्हता. जर तो उपस्थित असता तर परिस्थिती काहीअंशी नियंत्रणात आली असती.

अनेकांचे मोबाईल, लायसन्स राहिले आतच

आगीमुळे अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी साहित्‍य टाकून पळ काढला. पर्यटकांचे मोबाईल, कागदपत्रे क्लबमध्येच राहिली. स्थानिकांनी आरोप केला की, तक्रारी करूनही कारवाई होत नाही. कारण तक्रारीच्या बदल्यात काही जणांना पैसे मिळतात. त्यामुळे बेकायदेशीर क्लब सर्रास सुरू आहेत.

लोकवस्तीतही खुलेआम विनापरवाना नाईट क्लब

जवळपास घनदाट लोकवस्ती असतानाही तेथे विनापरवाना नाईट क्लब सुरू होता, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. त्‍यांच्‍या म्हणण्यानुसार, याबाबत पंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ‘सगळेच बेकायदेशीर आहे, त्यामुळे अनेक जण घाबरून गप्प आहेत’ अशा प्रतिक्रिया परिसरात उमटत आहेत.

युवकाचा बुडून झाला होता मृत्यू

या आगराच्‍या ठिकाणी काही वर्षांपूर्वी एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. तसेच तेथे भुताटकीचे प्रकार घडतात अशी स्‍थानिकांची धारणा आहे. त्‍यामुळे लोक शक्यतो दूरच राहतात. अचानक आवाज येणे, सावल्या दिसणे असे प्रकार घडत असल्‍याचे आम्ही पूर्वीपासून ऐकत आलो आहोत, असे स्‍थानिकांनी सांगितले.

एका युवकाची आगरात धाडसी उडी

प्रत्येकजण सैरभैर झाला होता. अशा बिकट परिस्थितीत एका धाडसी युवकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धाडसी निर्णय घेतला. समोर आगीचा आणि धुराचा वेढा असताना, त्याने कोणतीही भीती न बाळगता थेट जवळच असलेल्या पाण्याच्या आगरात उडी मारली व आपला जीव वाचवला.

बांधकाम दहा वर्षांपूर्वीचे

ज्या ठिकाणी आग लागली ते बांधकाम नुकतेच उभारलेले नाही तर दहा वर्षांपूर्वीचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. फक्त काही अंतर्गत बदल करून येथे क्लब सुरू करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: तुमच्या इच्छा पूर्ण होतील! 'या' राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या संपूर्ण भविष्य!

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

जबरदस्त डाइव्ह मारली, पण नशिबानं साथ दिली नाही, 'तो' थरारक रनआऊट पाहून धोनीच्या आऊटची आठवण ताजी; VIDEO व्हायरल

Goa Nightclub Fire: रोमियो लेन दुर्घटना प्रकरणात गोवा पोलिसांना मोठं यश! फरार आरोपींविरुद्ध 'ब्लू कॉर्नर'चा फास; इंटरपोलकडून नोटीस जारी

इंडोनेशिया हादरलं! जकार्तामधील सात मजली इमारतीला भीषण आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VEDIO

SCROLL FOR NEXT