

पणजी: हडफडे येथील अग्नितांडवाला राज्यातील भाजप सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे मंत्रिमंडळ जबाबदार असून, त्यातून प्रशासनाचे अपयश स्पष्टपणे दिसून येते. या मंत्रिमंडळाने त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यपालांनी कलम ३५६ अन्वये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.
भाजप सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, त्यांना सत्तेत बसण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
पाटकर म्हणाले की, अग्नितांडवात २५ जणांचा जीव गेल्याने जबाबदारी स्वीकारत मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, विनापरवाना क्लबमध्ये कोणाकोणाचे हात बरबटलेत, हे स्पष्ट होते. युरी आलेमाव म्हणाले, मृतांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी. अवैध क्लब होता, यातून प्रशासन ढासळल्याचे दिसते.
विधानसभेत आमदार आमोणकर यांनी हा क्लब पाडण्याची विचारणा केली होती, असे असेल तर सरकारने हा क्लब बंद का केला नाही, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी िदले पाहिजे, असेही असे कॉंग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. केवळ दोन लाख रुपये मृतांच्या कुटुंबाला दिले म्हणून उपयोग नाही, तर प्रकरणी न्यायालयीन चौकशी आवश्यक आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
हडफडे येथे झालेल्या मृत्युतांडवाला राज्यातील भाजप सरकार जबाबदार असल्याची टीका आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केली आहे. दरम्यान, सकाळी ‘आप’च्या शिष्टमंडळाने आग दुर्घटनेतील जखमींची गोमेकॉत रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.
याप्रसंगी राज्य प्रभारी अतिशी म्हणाल्या, हडफडे येथे दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेतील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, हा क्लब विनापरवाना, बेकायदेशीर होता. मग ही व्यवस्था सत्ताधारी भाजप सरकार व त्यांच्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. ही दुर्घटना म्हणजे भाजप सरकारच्या भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेले बळी असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी भाजप सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, ‘हडफडेतील घटनेत मूळ मुद्दा हा आहे की, दुर्घटना घडल्यावरच राज्य सरकारला हा क्लब विनापरवाना चालत असल्याचे कसे लक्षात आले.
मग सरकारचे प्रशासन काय करत होते. याचा अर्थ तो क्लब हप्ते घेऊन सुरू होता अन् त्यात भाजप आमदार, मंत्री आणि सरकारमधील प्रशासक हे सहभागी होते. त्यामुळे या भ्रष्ट सरकारच्या हप्तेखोरीने २५ लोकांचा जीव गेल्याची त्यांनी टीका केली.
आमदार व्हेन्झी व्हिएगस म्हणाले, राज्यातील प्रशासनाला भ्रष्टाचाराने पोखरुन टाकलेले आहे. साधे नळ कनेक्शनसह लिकर परवान्यासाठी पैसे घेतले जातात. अशा प्रकारांमुळेच अनेक अनधिकृत गोष्टी घडताहेत, त्याचेच हे उदाहरण आहे.
आमदार क्रुझ सिल्वा म्हणाले, यांनी क्लब बेकायदेशीर होता हे दुर्घटनेनंतर समजले, आता आग कशी लागली तर गॅस टाकीचा स्फोट झाला, असे पोलिस महासंचालक सांगतात. जखमी म्हणतात क्रॅकर्समुळे आग लागली, मग नेमकी घटना काय हे सरकारलाच माहिती नाही? ‘आप’चे कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनीही सरकारवर टीका केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.