पणजी: राज्यात हंगामी पिके तुरळक प्रमाणात घेतली जात असली तरी कुळागरात पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. यात नारळ, पोफळी, केळी, अननस आदी पिकांचा समावेश आहे. या कुळागरांतील पिकांमधील एक महत्त्वाचे पीक म्हणजे पोफळी होय.
दरम्यान, दरवर्षी पोफळीच्या लागवड क्षेत्रातही वाढ होत आहे. यंदा 2023-25 आर्थिक वर्षात पोफळी लागवड क्षेत्रफळात तब्बल 18 हेक्टरने वाढ झाली असल्याचे कृषी संचालनालयाच्या अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी 2081 हेक्टर इतके क्षेत्र पोफळीच्या लागवडीखाली होते. यंदा एकूण 2099 हेक्टर क्षेत्रफळात पोफळीची लागवड करण्यात आली आहे.
यंदा राज्यात पोफळीपासून एकूण 3978 टन सुपारीचे उत्पादन घेण्यात आले. जिल्हावार आकडेवारी पाहिल्यास उत्तर गोव्यात पोफळीच्या लागवडीत 8 हेक्टरने वाढ झाली आहे. दक्षिण गोव्यात 10 हेक्टरने पोफळीच्या लागवडीत वाढ झाली आहे.
राज्यात सुपारी हे एक महत्त्वाचे पीक आहे. राज्यात सर्वाधिक सुपारी लागवडीखालील क्षेत्रफळ व उत्पादन हे फोंडा तालुक्यात घेण्यात येते. फोंड्यात 997 हेक्टर क्षेत्रफळात पोफळीची लागवड केलेली असून एकूण 1992 टन उत्पादन घेण्यात येते. सर्वात कमी लागवडीखालील क्षेत्रफळ व उत्पादन मुरगाव तालुक्यात आहे. मुरगाव तालुक्यात 1 हेक्टर जमीन पोफळीच्या लागवडीखाली असून केवळ 2 टन सुपारीचे उत्पादन घेण्यात येते.
गेल्या वर्षभरात पोफळीच्या लागवडीत कुठल्याच तालुक्यात घट झालेली नाही, परंतु सासष्टी, मुरगाव आणि बार्देश तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांत पोफळीच्या लागवड क्षेत्रफळात वाढ झाली आहे. सांगे, डिचोली, पेडणे आणि तिसवाडी तालुक्यात प्रत्येकी एक हेक्टरने पोफळीच्या लागवडीत वाढ झाली आहे.
केपे, काणकोण, फोंडा तालुक्यात प्रत्येकी दोन हेक्टर तर धारबांदोडा तालुक्यात पोफळीच्या लागवडीत तीन हेक्टरने वाढ झाली आहे. सत्तरी तालुक्यात सर्वाधिक 5 हेक्टर क्षेत्रफळावर पोफळीची लागवड करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.