Goa Road Accident: गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्यातील रस्ते अपघाताबद्दल चिंता व्यक्त करणारे ट्विट केले आहे. गेल्या 48 तासांत रस्ते अपघातात 5 व्यक्तींचा बळी गेलाय.
या संबंधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी जे मौन बाळगले आहे ते लाजिरवाणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मागील 2-3 दिवसांत रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले असून गेल्या 48 तासांत तब्बल 5 व्यक्तींचा बळी गेल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे.
या अपघातांचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येतेय की बरेचसे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्याने होत आहेत.
वाहनांचा भरधाव वेग, वाहन चालवताना अमली पदार्थांचे सेवन करणे, अती उत्साहीपणा अशा प्रकारांमुळे वारंवार अपघात होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
धारगळ जंक्शन येथे मागील काही काळापासून अपघात घडण्याचे सत्र सुरु आहे. यावर उपाय म्हणजे धारगळ येथे फ्लायओव्हर होणे गरजेचे असून फ्लायओव्हर होण्यासाठी स्थानिकांनी सभा घेत आंदोलन सुरु केले आहे.
दिवसेंदिवस गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असून आमदार, मुख्यमंत्र्यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून वारंवार अपघात होणाऱ्या ब्लॅक स्पॉटवर आवश्यक त्या सुधारणा करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गोमंतकीयांनी जनतेचे दुःख आणि वेदनांची अजिबात कदर नसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या निष्काळजी, बेजबाबदार आणि असंवेदनशील वृत्तीची गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे.
भाजपने गोमंतकीयांना गृहीत धरले असून सरकारही अहंकाराच्या ओव्हरडोजखाली काम करत आहे, असा आरोप अमित पाटकर यांनी केला.
मी सावर्डे येथिल दोन जवळच्या मित्रांच्या अंत्यसंस्काराला हजर होतो. हरमल येथे अपघातात बळी गेलेल्या दोन भावांच्या घरी आज भेट दिली.
तिथले वेदनादायक व हृदयद्रावक वातावरण काळीज पिळवटून टाकणारे होते. गोव्याला भाजपच्या शापातून मुक्त करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन अमित पाटकर यांनी केले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.