वाळपई: पर्ये-सत्तरी येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (जीआयएम) वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनीवर तिच्याच सहकारी विद्यार्थिनीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, वाळपई पोलिसांनी संशयित २६ वर्षीय सुकन्या सब्भानी हिला अटक केली आहे. सोमवारी तिला न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिस तक्रारीनुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता पर्ये येथील जीआयएम कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक २ मधील खोली क्रमांक २२०५ मध्ये हा प्रकार घडला. तक्रारदार उम्मे ऐमन (२५) ही मूळची लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील असून, सध्या जीआयएममध्ये शिक्षण घेत आहे. ती झोपलेली असताना संशयित विद्यार्थिनीने खोलीत प्रवेश करून तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या हल्ल्यात तक्रारदार विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली असून, हातांनाही जखमा झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. हल्ल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तिने केला आहे. दरम्यान, जखमी विद्यार्थिनीची प्रकृती सध्या स्थिर आहे. अटक करण्यात आलेली सुकन्या सब्भानी (२६) ही मूळची ज्युबिली हिल्स, गोलकोंडा (हैदराबाद) येथील असल्याची माहिती पोलिस तक्रारीत नमूद आहे. दोन्ही विद्यार्थिनींची कुटुंबे गोव्यात दाखल झाली असून, ती वाळपई पोलिस ठाण्यात उपस्थित होती.
हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही विद्यार्थिनींमध्ये यापूर्वी काही वाद किंवा मतभेद होते का, हल्ल्याची पार्श्वभूमी काय होती आणि चाकू हल्ला करण्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा वाळपई पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणी वाळपई पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ आणि ३५१(३) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाळपई पोलिस निरीक्षक विदेश पिळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खुशाली नाईक पुढील तपास करीत आहेत.
वसतिगृहाच्या सुरक्षेचा मुद्दा
या घटनेमुळे वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश नियंत्रण आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणाबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संस्थांनी सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.