गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा बुधवारी (दि.15) निकाल जाहीर झाला असून, यावर्षी 92.38 टक्के निकाल लागला आहे. यावर्षी देखील मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. शिवाय अनेक सरकारी शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
यात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली असून, राज्यातील वानरमारे समाजातील गणेश पवार दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असून, तो या समाजातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.
गणेश पवारला दहावीच्या परीक्षेत 44 टक्के मिळाली असून, तो वाळपे, विरनोडा येथील विकाय हायस्कुल शाळेत शिक्षण घेत होता. कातकरी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करत गणेश समाजातून दहावी पास होणारा पहिला विद्यार्थी म्हणून मान मिळवला आहे.
चार दशकांहून अधिक काळ गोव्यात स्थायिक झालेला वानरमारे समाजात शिक्षणाला फार कमी महत्व दिले जाते. वानरमारे समाज भारतातील 75 विशेषत: असुरक्षित आदिवासी गटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
गणेश त्याचे यश एकट्याचे नसून संपूर्ण समाजाचे असल्याचे म्हटले आहे. "शिक्षणाने ज्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. शाळेतील माझा प्रवास आव्हानात्मक होता, परंतु चिकाटीने आपले नशीब बदलू शकते, हे मला शिकता आले. हे यश माझे एकट्याचे नाही; ते माझ्या संपूर्ण समाजाचे आहे. मला आशा आहे की माझ्यामुळे समाजातील इतर मुले देखील शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त होतील," असे गणेश म्हणाला.
तर, 'गणेशने मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. योग्य पद्धतीने सहकार्य केल्यास आणि संधी उपलब्ध करुन दिल्यास प्रत्येक विद्यार्थी यश मिळवू शकतो. हे यश गणेश, कातकरी समाज आणि शिक्षणाच्या ताकदीवर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या सर्वांचे आहे,' असे गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर एफ. बोर्जेस म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.