

Jasprit Bumrah vs Quinton de Kock Bold: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 लढतीत भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा कमाल दाखवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेक गमावून भारतीय संघ पहिल्यांदा गोलंदाजीसाठी मैदानात उतरला.
लाखो चाहत्यांनी तुडुंब भरलेल्या या मैदानात सुरुवातीपासूनच टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेचा सर्वात अनुभवी आणि आक्रमक फलंदाज क्विंटन डिकॉक मैदानात असेपर्यंत भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते, मात्र जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये असा काही चमत्कार केला की, संपूर्ण स्टेडियम बुमराहच्या नावाने दुमदुमून गेले.
डावाच्या सुरुवातीला बुमराहच्या एका चेंडूवर डिकॉकने चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले होते, मात्र बुमराहला अशा प्रकारे डिवचणे डिकॉकला महागात पडले. पुढच्याच चेंडूवर बुमराहने आपला अनुभव पणाला लावत एक वेगात आत येणारा चेंडू टाकला. डिकॉकने हा चेंडू सरळ येईल अशा समजुतीने लेग साईडच्या दिशेने हवेत उडवण्याचा प्रयत्न केला, पण बुमराहची ती 'इन्स्विंगर' चेंडूची गती आणि दिशा डिकॉकला ओळखता आली नाही. चेंडू थेट मिडिल आणि लेग स्टंपच्या बेल्सवर जाऊन आदळला आणि डिकॉक क्लीन बोल्ड झाला. अवघ्या 6 धावांवर डिकॉकला बाद करुन बुमराहने भारताला पहिले मोठे यश मिळवून दिले.
डिकॉकसाठी बुमराह हा नेहमीच एक कोडं ठरला आहे. याआधीही टी-20 क्रिकेटमध्ये बुमराहने डिकॉकला वारंवार बाद केले असून बुमराहविरुद्ध डिकॉकची सरासरी 10 पेक्षाही कमी आहे.
बुमराहचे वादळ येथेच शमले नाही. डिकॉकची शिकार केल्यानंतर आपल्या दुसऱ्याच षटकात त्याने रेयान रिकल्टनलाही तंबूचा रस्ता दाखवला. बुमराहने टाकलेल्या चणाक्ष 'स्लोअर' बॉलवर रिकल्टनने चकवा खाल्ला आणि तोही आऊट झाला. या विश्वचषकात बुमराह जबरदस्त लयीत असून त्याची इकॉनॉमी 6 पेक्षाही कमी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच आजही त्याने आपल्या सुरुवातीच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेची कंबर तोडली. अहमदाबादच्या या खेळपट्टीवर बुमराहची ही धारदार गोलंदाजी पाहून आफ्रिकी फलंदाज पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.