पणजी: ताळगाव परिसरात वारंवार शेतीत आगीच्या घटना घडतात. मात्र, कुणी बळी गेल्यावरच पंचायत किंवा प्रशासन जागे होणार का, असा सवाल केला जात आहे. सोमवारी घडलेली आगीची घटना भयानकच होती. त्यामुळे असे प्रकार पुढील काळात होऊ नयेत यासाठी आगीचे कारण शोधून त्यावर उपाय योजना करावी,अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, एक तज्ज्ञ समिती स्थापन करावी आणि ताळगावची तात्काळ ग्रामसभा घ्यावी, अशी सूचना ‘आप’च्या नेत्या सिसील रॉड्रिग्स यांनी पंचायत सचिव गौरीश नाईक यांना निवेदन देऊन केली आहे.
सिसिल यांनी निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास टोंक बाजूने शेतात आग लागली होती, ती ताळगावच्या बाजूच्या शेतात पसरली. त्यात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आणि गोंधळाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शिवाय लगतच्या संकुलांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला. अग्निशमन दलाच्या त्वरित प्रतिसादानंतरही, आग सहा तासांहून अधिक काळ धुमसत होती, त्यामुळे अशा घटना पुन्हा उद्भवू नयेत यासाठी प्रभावी उपायांची गरज आहे.
ताळगावातील गवताला लागलेल्या आगीची घटनेतील तीव्रता पाहता, सदर बाब गंभीर आहे. दरवर्षी गवताला आग लागण्याचे प्रकार येथे घडतात. परंतु त्या आगीविरोधात तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे पोलिसांना या आगीच्या प्रकरणाविरोधात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करावा लागला आहे. याशिवाय पंचायतीला आम्ही सीसीटीव्ही बसवण्याची विनंती करणार आहोत, जेणेकरून यापुढे अशा घटना घडू नयेत, असे पणजी पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांनी ‘गोमन्तक'ला सांगितले.
दरवर्षी येथील गवताला आग लागण्याची घटना घडते. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान धावतात आणि तेथील आग विझवतात. यापुढे असे प्रकार घडू नयेत, त्याचबरोबर शेतातील गवताला आगी लावण्याचे प्रकार तात्काळ लक्षात यावेत यासाठी येथील शेतीभोवती पंचायतीने सीसीटीव्ही उभारावेत, अशी आम्ही पंचायतीला विनंती करणार आहोत, असे अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.