Fortified Rice: सरकारकडून दिल्या जाणाऱ्या फॉर्टिफाईड तांदळावरून सोशल मीडियावर सध्या वाद निर्माण झाला आहे. काही जणांनी सोशल मीडियावर तांदळांमध्ये प्लास्टिकचे मिश्रण केल्याचे दावे केले होते. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. अखेर सरकारला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली की
तांदूळ चांगले आहेत; परंतु याचा धसका तिसवाडीतील स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला आहे. सोशल मीडियावर झालेल्या चुकीच्या प्रकारामुळे दुकानदारांमध्ये चिंता वाढली आहे.
स्वस्त धान्य दुकानावर दर महिन्यात गरिबी रेषेवरच्या कुटुंबाना (एपीएल) ८-१० किलो तांदूळ दिले जातात, तर गरिबी रेषेच्याखालील कुटुंबांना (बीपीएल) प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ मिळतात. आता फॉर्टिफाईड तांदळाच्या नावाआड प्लास्टिक तांदूळ मिश्र करून दिले जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लाकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात ग्राहक येऊन थेट स्वस्त धान्य दुकानदारांना जाब विचारू लागल्याने त्यांची गोची झाली आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फॉर्टिफाईड तांदळांच्या नावाआड प्लास्टिक तांदूळ दिले जात असल्याचे व्हिडियो व्हायरल झाले होते. परिणामी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नागरीपुरवठा मंत्री रवी नाईक यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली की, प्लास्टिक तांदूळ उत्पादित करण्यात सामान्यापेक्षा जास्त खर्च येईल.
फॉर्टिफाईड तांदूळ म्हणजे काय?
फॉर्टिफाईड तांदूळ हे तुटलेल्या सामान्य तांदळांतून बनवले जातात. पहिले त्यांचे पीठ करून त्यात आयर्न, फोलिट ॲसिड, व्हिटामीन बी 12 सारखे पौष्टिक मिश्र केले जाते. त्यानंतर प्रक्रिया करून त्यांचे तांदळात रूपांतर केले जाते. स्वस्त धान्य दुकानांवर दिल्या जाणाऱ्या अर्ध्याअधिक तांदळात या फॉर्टिफाइड तांदळांचा समावेश असतो.
प्लास्टिक तांदूळ असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने जरी स्पष्टीकरण दिले असले, तरी अजूनही ग्राहकांना शंका आहे. याचा त्रास स्वस्त धान्य दुकानदारांना होत आहे. आम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय करताे आणि लोककल्याणासाठी सरकारच्या योजनेचा लाभ ग्राहकांना देतो.- राजेश नाईक, व्यावसायिक, खोर्ली
प्लास्टिक तांदूळ असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सरकारने स्षष्टीकरण दिले आहे. परंतु जेव्हा ही योजना सुरू केली होती, तेव्हा लोकांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता होती. आता अखेर सरकारने ती केली आहे. तसेच मीदेखील माझ्या चिंबल-मेरशी परिसरात ग्राहकांमध्ये जागृती केली आहे.- गिरीश उस्कैकर, व्यावसायिक, चिंबल
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.