Lok Sabha Election: निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, त्यासाठी ‘ईव्हीएम’ पद्धत बंद करून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, अशी मागणी मयेचे माजी सरपंच सुभाष किनळकर यांनी केली आहे. तसा ठरावही त्यांनी आज (रविवारी) झालेल्या पंचायतीच्या ग्रामसभेत मांडला. डॉ. रूपेश लिंगडकर यांनीही या ठरावाचे समर्थन केले.
ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणारी मतदान प्रक्रिया सदोष आहे. ही प्रक्रियाही संशयास्पद असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेवरून जनतेचा विश्वास उडाला आहे, असे सुभाष किनळकर यांनी ठराव मांडताना सांगितले.
मये-वायंगिणी पंचायतीची ग्रामसभा सरपंच विद्यानंद कारबोटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कारबोटकर यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिव प्रणय गावडे यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले.
या बैठकीत रस्ते आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गत पंचायत मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहाराचा मुद्दाही परत एकदा चर्चेत आला. सकाळी 11 वाजता सुरू झालेली ग्रामसभा दुपारी पावणे दोन वाजता संपली.
या ग्रामसभेस उपसरपंच सुफला चोपडेकर यांच्यासह कनिवी कवठणकर, वासुदेव गावकर, विशांत पेडणेकर, दिलीप शेट, कृष्णा चोडणकर, सुवर्णा चोडणकर, वर्षा गडेकर आणि विनिता पोळे हे पंचसदस्य उपस्थित होते. तर सीमा आरोंदेकर या एकमेव पंचसदस्य अनुपस्थित होत्या. ग्रामसभेस ७० च्या आसपास ग्रामस्थ उपस्थित होते.
खनिज वाहतुकीवरून खडाजंगी
अलीकडेच मये गावात खनिज वाहतुकीचा मुद्दा तापला होता. ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. याप्रश्नी पंचायतीला कळविले होते. याप्रश्नी पंचायतीने कोणती कारवाई केली, असा प्रश्न नागेश नाईक, सखाराम पेडणेकर यांनी उपस्थित केला. त्यावेळी पंचायत मंडळ निरूत्तर बनले. या मुद्द्यावरून वातावरण काहीसे तापले. बाबूसो कारबोटकर, नीलेश कारबोटकर आदींनी यावेळी पंचायत मंडळावर प्रश्नांचा भडिमार केला.
अटक बेकायदा
खनिज वाहतुकीविरोधात आंदोलन करणाऱ्या सहाजणांना अटक केली, ती कृती बेकायदा असल्याचे सखाराम पेडणेकर, सुभाष किनळकर यांनी सांगितले. मये तलाव परिसरात बेशिस्तपणे वाहने पार्क करण्यात येतात, अशी तक्रार माजी सरपंच काजल कारबोटकर यांनी करून पार्किंग व्यवस्थेत शिस्त आणावी, अशी मागणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.