खरी कुजबुज Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

Khari Kujbuj Political Satire: काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना आज भेटीसाठी सकाळी वेळ दिली होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना आज भेटीसाठी सकाळी वेळ दिली होती. या भेटीसाठी त्यांना काही काळ हॉटेलमध्ये वाट पहावी लागलीही. अखेर त्यांना पाचारण केल्यानंतर पाटकर यांना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याच शेजारी बसावे लागले. ही बैठक व्यवस्था करावी लागली ती प्रभारी सचिव अंजली निंबाळकर अचानक आल्यामुळे. या बैठक व्यवस्थेची छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमात व्हायरल झाली, त्यावर नेटकऱ्यांनी चिमटेही काढण्याची संधी घालवली नाही. मात्र, पाटकर यांनी आपल्या मनातील खदखद या बैठकीत बोलून दाखविली. परंतु बाहेर प्रसारमाध्यमांसमोर आपण काँग्रेसचेच आहोत, असे सांगायला पाटकर, तर आम्ही सर्व एक आहोत हे सांगायला चोडणकर विसरले नाहीत. ∙∙∙

खाकीला उशिराच जाग!

संदीप सलायन यांना मंगळूरच्या अक्षताने गुंगीचे औषध दिले, त्यांची सोन्याची साखळी व पाकीट लंपास केले, यात नंतर संदीप यांचा जीव गेला. विशेष म्हणजे, या अक्षताने यापूर्वी पणजीतही असेच कारनामे केले होते व तिथे तिच्यावर गुन्हेही नोंद होते; पण आपल्या खाकी वर्दीला तेव्हा जाग नव्हती. त्यांनी या प्रकरणाचा तपास न केल्याने अक्षताबाईंना ‘पोलिस आपले काहीच वाकडे करू शकत नाहीत, असा विश्वास मिळाला!’ हाच आत्मविश्वास घेऊन तिने पुढचा डाव टाकला. आता जेव्हा चोरीचे रूपांतर थेट ‘मर्डर’मध्ये झाले, तेव्हा कुठे झोपलेले पोलिस खडबडून जागे झाली व त्यांनी तत्परतेने शोधमोहीम सुरू केली. खरे तर, हीच तत्परता जर पहिल्या गुन्ह्याच्या वेळी दाखवली असती, तर आज संदीप यांचा जीव वाचला असता! पण, ‘हवे तेव्हा गुन्हेगाराला पाताळातून शोधून काढू शकणारे’ आपले पोलिस बहुधा मोठी दुर्घटना घडण्याचीच वाट पाहत असतात, हेच या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. ∙∙∙

दोतोराचे बिंग व कोकणी!

गावात डॉक्टर होता. लोकप्रिय. काही वर्षांनी कुणीतरी वार्ता आणली, डॉक्टरची पदवी खोटी. ते ऐकताच इतकी वर्षे जगलो कसे, हा विचार करून गावकऱ्यांची बोबडी वळली. हीच गोष्ट ५०व्या कोकणी नाट्यस्पर्धेच्या घडली. काही वर्षे बनेलगिरी करून कॉपी मारून नाटके करणाऱ्यांचे पितळ उघड पडले. स्पर्धा, कोकणी, कला अकादमी, चौर्यलेखक सर्वांची नाचक्की मुद्देमालासह उघड झाली. मात्र, कळले नव्हते तोपर्यंत गावातील डॉक्टर व त्याचे औषध रामबाण होते. कळले तेव्हा इतकी वर्षे चुकीचे औषध पोटात गेल्याने व्याधी होणार नाही ना, अशी भीती लोकांना वाटली. समांतरपणे, कॉपी मारणारे आणखी किती असतील या शंकेनेच म्हालगड्यांचे धाबे दणाणलेत. टुकार नाटके आली; पण चौर्य नव्हते. १० जुलैला कोकणी नाटक-५० कार्यक्रमाची तयारी कला अकादमीत सुरू आहे. ∙∙∙

रस्ता हॉटमिक्सचा की खडीचा?

पर्वरी उड्डाणपूल सुरू झाल्यापासून पर्यायी सर्व्हिस रोड आणि पुलाखालचा रस्ता वाहनचालकांच्या नशिबी आला आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे मोठ्या थाटामाटात हॉटमिक्सिंग झाले होते; पण आजची अवस्था पाहिली तर अनेकांना प्रश्न पडतोय, खरेच इथे हॉटमिक्स झाले होते की फक्त उद्‌घाटनापुरतेच डांबर पुसले? रस्त्यावर जागोजागी पसरलेली खडी पाहून वाहनचालकांचा वेग आपोआप कमी होतो. मात्र, टायर पंक्चर होण्याचा वेग तितकाच वाढल्याची चर्चा आहे. काहीजण तर म्हणतात की, ‘या रस्त्यावरून एक फेरी मारली की पंक्चरवाल्याचाही व्यवसाय तेजीत येणार!’ आता निदान रस्त्यावरची खडी तरी उचलावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. ∙∙∙

बैठकीतील सूचना?

काँग्रेसच्या आजच्या राष्ट्रीय सरचिटणीस वेणुगोपाल यांच्या बैठकीत अमित पाटकर गटाच्या समर्थकांनी आपली बाजू ठामपणे मांडल्याचे दिसून आले. परंतु त्यांच्यासमोर ज्या आवेशाने भूमिका मांडली, त्याच आवेशात दक्षिण गोव्याचा माजी जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. याशिवाय ज्यांनी-ज्यांनी वेणुगोपाल यांची भेट घेतली, त्यातील अनेकांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना सावधगिरी बाळगल्याचे दिसून आले. अनेकांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे सांगितले. त्यामुळे एकतर ज्यांना ज्यांना बैठकीचे निमंत्रण होते, त्यांना बैठक झाल्यानंतर बाहेर काय सांगायचे, हे आतूनच सूचित केले गेले होते काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. ∙∙∙

कुशावतीतील ‘तो’ जावई अजून का रिलिव्ह नाही?

याचे त्याचे पाय धरून का होईना, कुशावती जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेत एकाच ठिकाणी चिकटून बसलेल्या त्या सरकारी जावयाच्या बदलीचा आदेश आल्यावर आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांना त्याने आपण ही बदली मागून घेतली आहे, असे सांगितले होते; पण या जागेवरून हटण्याची इच्छा नसलेल्या त्या अधिकाऱ्याने त्याच्या गॉडफादरचे पाय धरल्यावर त्याने आपला शब्द टाकून ही बदली तात्पुरती रोखून धरली. त्यामुळेच या सरकारी जावयाच्या जागेवर ज्या अधिकाऱ्याची बदली झाली त्या अधिकाऱ्याला त्याच्या जागेवरून त्याच्या वरिष्ठांनी अजून रिलिव्ह केलेले नाही. दुसऱ्या बाजूने त्या जावयाला आहे त्याच ठिकाणी ठेवता यावे यासाठी त्याच्या गॉडफादरने चक्क मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अपॉइंटमेंट मागितली आहे. वास्तविक त्या जावयावर सगळेच नाराज असून भाजप नेत्यांसाठी हा अधिकारी नको त्या जागेवरील दुखणे बनले आहे. तरीही त्याला त्याच ठिकाणी ठेवण्याचा हा अट्टहास का बरे? ∙∙∙

कवळेकर राष्ट्रीय नेते!

गोव्यातील धनगर समाजाचे नेते कोण? असे विचारल्यावर आपसुकच चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांचे नाव कोणीही सांगेल. त्यांच्या नेतृत्वात गोव्यात धनगर समाज ‘एसटी’ आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळेल हे कळेलच; परंतु कवळेकर भाजपात गेल्यापासून त्यांना राष्ट्रीय स्तरावर धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आहे एवढे नक्की. हल्लीच आग्रा येथे भव्य लोकमाता अहिल्यादेवी संमेलन झाले यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, केंद्रीय मंत्री आदी मान्यवरांच्या मांदियाळीत सभेला संबोधित करण्यासाठी त्यांना बोलविले होते. त्यावेळी पिवळा फेटा बांधून कवळेकरांनी अतिशय दिमाखात जोरदार भाषण केल्याचे अनेकांनी पाहिले.

‘धडा’ की शिस्तीचा इशारा?

उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातील एका ग्रामपंचायतीत सध्या विकासकामांपेक्षा एका वेगळ्याच घटनेची चर्चा रंगली आहे. एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या अनुभवी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. कारण काय, तर सततची छळवणूक, टोमणे आणि त्रास! पण खरी गंमत पुढे आहे. हा प्रकार घडण्यापूर्वीच संबंधित कर्मचाऱ्याने काही पंचसदस्यांना फोन करून, ‘आता संयम सुटला तर जबाबदार मी नसणार,’ असा इशाराच दिला होता. त्यामुळे जे घडले तो अनेकांसाठी धक्का नव्हताच. आता पंचायत कार्यालयात फाईल्सपेक्षा ‘कानशिलात प्रकरण’ जास्त चर्चेत आहे. काहीजण म्हणतात, वाद मिटवण्यासाठी संवाद हवा; तर काहींच्या मते, दोन कानाखाली खाल्ल्यानंतर तरी काहींचा आवाज कमी होईल! ∙∙∙

अजेंडा ‘हिंदू’!

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राज्‍यातील राजकीय वातावरण तापत चालले आहे. भाजपसह काँग्रेस, ‘आप’च्‍या राष्‍ट्रीय नेत्‍यांचे पाय गोव्‍याकडे वळण्‍यास सुरवात झाली आहे. शनिवारी काँग्रेसचे राष्‍ट्रीय सरचिटणीस सी. के. वेणुगोपाल आणि ‘आप’चे राष्‍ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल गोव्‍यात होते. या दोन्‍ही नेत्‍यांनी ज्‍या पत्रकार परिषदा घेतल्‍या, त्‍यात त्‍यांनी राज्‍यातील प्रश्‍‍नांवर बोलण्‍याऐवजी अयोध्‍येतील राम मंदिरात झालेल्‍या घोटाळ्याचा मुद्दा उपस्‍थित करून केंद्र सरकारला धारेवर धरण्‍याचा प्रयत्‍न केला. यातून या दोन्‍ही पक्षांचा अजेंडा आता हिंदू मतदारांना आकर्षित करणे हाच असल्‍याची चर्चा राज्‍यभर सुरू आहे. ∙∙∙

दिगंबरा, दिगंबरा...

काही दिवसांपूर्वी मडगाव येथील मार्केटमधील काही व्यापारी पावसाचे पाणी मार्केटमध्ये शिरून मालाची नासाडी होते, अशी तक्रार घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याकडे आल्यावर मोठा पाऊस आल्यावर मी स्वतः अधिकाऱ्यांना घेऊन येऊन पाहणी करतो, असे आश्वासन कामत यांनी त्यांना दिले. दोन दिवसांपूर्वी मडगाव येथे खराच असा मोठा पाऊस आल्यावर मडगाव पालिकेचे अधिकारी पाहणी करण्यासाठी तिथे आले. त्यावेळी काही व्यापाऱ्यांनी ‘दिगंबर आले, दिगंबर आले’ अशी चर्चा सुरू केली. त्यावेळी खरेच तिथे दिगंबर आले; पण ते दिगंबर हे दिगंबर कामत नव्हते, तर ते मार्केटमध्ये दुकान असलेले व्यापारी दिगंबर सावळ होते. आडनाव वेगळे असले म्हणून काय झाले, शेवटी ते ‘दिगंबरच होते ना!’ ∙∙∙

‘नक्षा पायलट’ प्रकल्प काय आहे राव?

राज्य सरकारच्या भू-व्यवस्था व भूमिअभिलेख संचालनालयाने ‘नक्षा’ नावाचा एक प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पानुसार कुंकळ्ळी नगरपालिका क्षेत्रातील जमिनीचे मोजमाप व मालकी हक्कांचे दाखले गोळा करण्यात येणार आहेत. यासंदर्भात काम पूर्ण झाले असून जनतेला व जमीन मालकांना आपल्या जमिनीच्या मालकी हक्काबद्दल किंवा जर कोणाच्या जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असेल त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व काही तक्रारी असल्यास सोळा जुलै ते चौदा ऑगस्टपर्यंत म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुनावणी होणार आहे. मात्र, ही सुनावणी कुंकळ्ळीत न ठेवता मडगावात ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात इंग्रजी वर्तमानपत्रात आलेली जाहिरात व्हायरल होत आहे. आम जनता मात्र या ‘नक्षा’ प्रकल्पाबद्दल अनभिज्ञ आहे. साहेब हे नक्षा प्रकरण काय आहे? असा प्रश्न आम नागरिक विचारीत आहेत. ∙∙∙

उदो-उदो काय कामाचा?

कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांचे स्वागत करताना मोपा विमानतळावर मोठी घोषणाबाजी करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हेही गोव्यात येतात; पण भाजपने असे कधी केल्याचे दिसले नाही. वेणुगोपाल नेमके कशासाठी आले होते ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. ना त्यांनी कॉंग्रेसच्या धोरणांवर भाष्य केले ना आघाडीत येण्यासाठी इच्छुक पक्षांशी चर्चा केली. मात्र, त्यांचे घोषणाबाजीने झालेले स्वागत कॉंग्रेस नेते, कार्यकर्त्यांची मानसिकता दर्शवत होती.∙∙∙

वेगवेगळा न्याय का?

आपले शिक्षण खाते, उच्च शिक्षण खाते व तांत्रिक शिक्षण खाते सरकारच्या इशाऱ्यावर व सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर चालते काय? असा प्रश्न पडायला लागतो. सत्ताधारी पक्षाचे नेते, सत्ताधारी पक्षाचे आमदार व मंत्री चालवित असलेल्या शिक्षण संस्थांना वेगळा न्याय व ज्यांचे राजकीय गॉडफादर नाहीत, अशा शिक्षण संस्थांना वेगळा न्याय मिळत असल्याचा आरोप होत आहे. मंत्र्याच्या शिक्षण संस्थेतर्फे चालत असलेल्या शाळा, उच्च माध्यमिक व महाविद्यालयांना शिक्षक व इतर पूर्णवेळ कर्मचारी नेमण्यास तातडीने परवानगी मिळते. मात्र, इतर शिक्षण संस्थांत वर्षानुवर्षे रिक्त असलेली शिक्षकांची पदे भरण्यासाठी परवानगी मिळत नाही. चार-चार वर्षे कंत्राटी पद्धतीवर शिक्षक भरती करणाऱ्या त्या शिक्षण संस्थांना वाली नाही. मंत्र्याच्या शाळेत मात्र दहा-दहा शिक्षक भरण्याची परवानगी मिळते. म्हणजे शिक्षणातही राजकारण, असे समजायचे का? ∙∙∙

चालक आणि दिशा!

काँग्रेसमध्ये सध्या चालक कोण आणि दिशा कोण ठरवतो, हा प्रश्नच पडावा, अशी परिस्थिती आहे. पक्षातील नाराजी विझविण्यासाठी आलेले राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या गाडीचे स्टेअरिंग विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या हाती होते, तर मागच्या सीटवर प्रभारी माणिकराव ठाकरे आणि नवे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विराजमान होते. गाडी हॉटेलकडे निघाली खरी; पण काँग्रेसचा राजकीय प्रवास नेमका कुठे चालला आहे, याचा ‘जीपीएस’ मात्र अजूनही सापडलेला दिसत नव्हता. चालक बदलून प्रवास सुरळीत होत नाही; त्यासाठी दिशा, स्थान आणि प्रवाशांमध्येही एकमत लागते, हे काँग्रेसला पुन्हा एकदा लक्षात आणून देणारे हे दृश्य ठरले. ∙∙∙

पर्यटन खात्याने लक्ष द्यावे!

हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, अशी एक म्हण आहे. गोवा पर्यटन खात्यातर्फे राज्यातील अनेक मंदिर व इतर धार्मिक परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले जात आहे. आता पर्यटन खात्याने गावडोंगरी येथील देव मल्लिकार्जुन मंदिर आवाराच्या सौंदर्यीकरण कामासाठी साडेपाच कोटींचे कंत्राट एका कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, पर्यटन खाते हे काम पूर्ण करू शकणार का? असा संशय आहे. संशयास कारण आहे, केपे तालुक्यातील एका प्रसिद्ध मंदिर आवाराचे सौंदर्यीकरणाचे काम. दोन वर्षांपूर्वी पर्यटन खात्याने केपे तालुक्यातील या मंदिराच्या सौंदर्यीकरण कामास सुरवात केली होती. मात्र, कंत्राटदाराने काही चूक केल्यामुळे ते काम गेल्या वर्षभरापासून तसेच सोडून देण्यात आलेले आहे. या अपूर्ण राहिलेल्या सौंदर्यीकरण कामामुळे मंदिर परिसराचे असलेले सौंदर्य गायब झाले आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व भक्तांना हे अपूर्ण काम पाहणे भाग पडते. पर्यटन खात्याने याकडे लक्ष देणे गरजेचे नाही का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT