पणजी: येथील नॅशनल थिएटरसमोर असलेल्या लाँड्री, सायकल आणि पेंट शॉपला शुक्रवारी संध्याकाळी अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली, मात्र शेजारील इमारतीच्या वॉचमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी हानी टळली.
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याचा फोन त्यांना संध्याकाळी ३.२४ वाजता आला. त्यानंतर तत्काळ प्रतिसाद देत ३.२८ वाजता अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले, तर ३.४३ वाजता दुसरे वाहनही पाठवण्यात आले.
तीन दुकानांना आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट झाले आहे, मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून नुकसानीचे मूल्यमापन सुरू आहे. या घटनेत शेजारील इमारतीतील वॉचमनच्या सावधतेने मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना आग प्रथम निदर्शनास आल्यानंतर तत्काळ इमारतीतील अधिकाऱ्यांना आणि आपत्कालीन सेवेला त्यांनी माहिती दिली.
अवघ्या १५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. जवानांनी शेजारील इमारतींना आग पसरण्यापासून रोखले व परिसर सुरक्षित केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब असली तरी लाँड्रीसह इतर दुकानांचे काही प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
इमारतीतील रहिवाशांची तत्परता
इमारतीतील रहिवाशांनी आपल्या इमारतीतील आपत्कालीन फायर हायड्रंट यंत्रणा वापरून आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या तातडीच्या प्रयत्नांमुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरली नाही, असे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.