Goa Latest Political News Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; रिबेलो होणार अधिकच आक्रमक

Goa Latest Political News: महापालिका निवडणुकीत सध्या बाबूश मोन्सेरात गट आणि उत्पल पर्रीकर यांच्या ‘आमी पणजेकार'' गटाकडून प्रचार सुरू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

रिबेलो होणार अधिकच आक्रमक

भू-रुपांतरणासाठी महत्त्‍वपूर्ण असलेले नगरनियोजन कायद्याचे कलम ३९ ‘अ’ रद्द करण्‍याची मागणी करीत माजी न्‍यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी त्‍यासंदर्भातील खासगी ठरावाचा मसुदा विरोधी आमदारांना सादर केलेला होता. अर्थसंकल्‍पीय भाषणात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याबाबत काय भूमिका मांडणार, त्‍यावर पुढील दिशा ठरवू असे रिबेलो यांनी सांगितले होते. परंतु, मुख्‍यमंत्र्यांनी या विषयावर म्‍हणावा तितका प्रकाशझोत टाकला नाही. त्‍यामुळेच फेर्दिन रिबेलो यांनी आता आपली ‘इनफ इज इनफ’ चळवळीच्‍या कक्षा रुंदावण्‍याचा आणि चळवळ गावागावांपर्यंत नेण्‍याचा निर्धार केलेला आहे. आता त्‍यांच्‍या या प्रयत्‍नांना कितपत यश मिळेल, हे पुढील काहीच महिन्‍यांत कळेल. ∙∙∙

उमेदवारांना बाबूशची तंबी

महापालिका निवडणुकीत सध्या बाबूश मोन्सेरात गट आणि उत्पल पर्रीकर यांच्या ‘आमी पणजेकार'' गटाकडून प्रचार सुरू आहे. दोन्ही गटांसाठी ही निवडणूक सध्या प्रतिष्ठेची झाली आहे. मोन्सेरात यांच्या गटाकडून आत्तापर्यंत नगरसेवक स्वतःच पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मोन्सेरात यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना जास्त धावपळ करता येत नाही. यापूर्वी निवडणुकीत ते सर्व प्रभागांतून ज्या पद्धतीने फिरायचे, त्यासारखे यावेळी ते फिरताना दिसत नाहीत. निवडणुकीची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांनी आपल्या उमेदवारांना प्रसारमाध्यमांकडे बोलू नये, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे कोणताही उमेदवार कोणत्याही ‘यूट्यूब'' चॅनेलवाल्यांशी काहीच बोलत नाही. शहरातील अनेक यूट्यूब चॅनलवाल्यांनी बाबूश यांच्या उमेदवारांशी संपर्क साधला, पण त्यांना मिळालेल्या तंबीमुळे ते गप्प राहण्याच्या सूचना असल्याचे सांगतात. ∙∙∙

भाजपातही फॅमिलीराज!

‘दुसऱ्या सांगे तत्त्वज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ असे मराठीत एक बोध वाक्य आहे. भाजपचे तसेच झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या फॅमिलीराजवर प्रखर टीका करून सत्तेत आलेल्या भाजपतही काँग्रेसच्या फॅमिलीराजची परंपरा जोपासली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नीला भाजपात मोठी जबाबदारी दिली आहे. रमेश तवडकर यांच्या पत्नी भाजपच्या महिला विभागाच्या उपाध्यक्ष केले आहेत. आमदार मायकल व दिलायला पती-पत्नी भाजपच्या आमदार आहेत. बाबूश मोन्सेरात, जेनिफर व रोहित तिघे ही भाजपचे एक नंबरचे नेते. त्याशिवाय विश्वजीत व दिव्या यांची जोडी भाजपचे मंत्री व आमदार. केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊंचा मुलगा झेडपी अशी अनेक कुटुंबे भाजपातच मुख्य भूमिका बजावत आहेत. एवढेच काय बिहारात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री करण्यात भाजपच पुढाकार घेत आहे आणि महाराष्ट्रात अजित दादांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री करण्यात भाजपनेच पुढाकार घेतला. याचा अर्थ भाजप जरी काँग्रेसमुक्त भारत म्हणत असला, तरी भाजपने काँग्रेस पक्षाची परंपरा राखली आहे, हेच सत्य. ∙∙∙

कॅसिनोचे इंगित!

मांडवीत नवा मोठा कॅसिनो येणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी म्हणे त्यांच्या भेटीस गेलेल्या पणजीतील कॅसिनो विरोधी मंडळींना दिले आहे. पण त्या नंतर दुसऱ्याच दिवशी सादर झालेल्या अर्थसंकल्पांत सरकारने कॅसिनो नोंदणीसाठी अनेक पटींनी वाढविलेले शुल्क व परवान्यांच्या शुल्कासाठी केलेली वाढ पाहता मांडवीत आणखी कॅसिनो आणण्यास सरकारचा बेत उघड होतो, असा आरोप कॅसिनो विरोधक करत आहेत. भेटीस आलेल्या मंडळींना मांडवीतून कॅसिनो हटविण्याबाबत मुख्यमंत्री ठामपणे काहीच सांगू शकलेले नाहीत, की तसा साधा संकेत देण्याची त्यांची तयारी नाही, त्यामुळे ती समस्या कायम राहणार आहे, म्हणून सरकारवर दबाव आणण्यासाठी वेगळाच काही तरी उपाय योजावा लागेल, असे पणजीकारांना वाटू लागले आहे, अशी चर्चा कानांवर पडू लागली आहे. ∙∙∙

लुईस बर्जरचे गौडबंगाल!

२००८ मधील सरकारकाळांत हे लुईस बर्जर प्रकरण घडले होते. त्या काळात गोव्यात ‘जायका’खाली जी कामे दिली गेली होती, त्यात लुईस बर्जरमार्फत लांच देण्याचा प्रकार घडला होता. त्या काळात सरकार कोणाचे होते व साबांखा खाते कोणाकडे होते, ते लोकांना चांगलेच माहीत आहे. त्या प्रकरणावर खरे तर पडदा पडला होता, पण आता ते प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे कोणाचा कसला हेतू आहे, ते कळायला मार्ग नाही. या प्रकरणात त्यावेळी बांधकाम खाते सांभाळणारे चर्चिलबाब यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली होती, हे खरे आहे. तर त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला अटक होऊ नये, म्हणून मडगावात मोठे शक्तिप्रदर्शन झाले होते. पण त्यानंतर राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. आता जर तसे काही घडले, तर त्या नेत्यांच्या संरक्षणासाठी कोणी येण्याची शक्यता नाही. कारण अनेकजण त्यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे उगाच पुन्हा ते प्रकरण कशाला? अशी विचारणा लोकांमध्ये चाललेली पहायला मिळते. ∙∙∙

भंडारी समाजाला आठवण...

मीराबाग बंधाऱ्याला विरोध करणारे अनेक दिवस आंदोलन करत आहेत. गोमंत भंडारी समाजाच्या अस्थायी समितीला मात्र आता आपले समाज बांधव आंदोलन करत असल्याचा साक्षात्कार झाला आहे. काल शनिवारी भंडारी समाजाच्या अस्थायी समितीच्या सदस्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. आताच त्यांना समाज बांधवांची आठवण का आली, असा प्रश्न चर्चिला जात आहे. गोमंतक भंडारी समाज संस्थेची येत्या सहा महिन्यात निवडणूक होणार आहे. यामुळे एक गट सक्रिय झाला असल्याचे सांगण्यात येते. त्यातूनच या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मिराबाग आंदोलकाची भेट घेतली असावी, असा तर्कही व्यक्त होताना दिसत आहे. ∙∙∙

गोवा फॉरवर्ड सावर्डे मतदारसंघात घुसणार

सध्‍या मीराबाग येथील बंधाऱ्याविरोधातील आंदोलनामुळे सावर्डे मतदारसंघात नाही, म्‍हटले तरी भाजपविरोधी माहोल तयार झाला आहे. अशा परिस्‍थितीत मीराबागच्‍या आंदोलकांना अतिरेकी म्‍हणून संबोधल्‍यामुळे भाजप पक्षाला अधिकच रोशाला सामोरे जावे लागले आहे. सावर्डे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्‍ला असला तरी एकदा या मतदारसंघातून खनिज व्‍यावसायिक अनिल साळगावकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्‍यावेळी त्‍यांचे चिन्‍ह नारळ होते. काल गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी मीराबागच्‍या लोकांना आपला पूर्ण पाठिंबा देताना गोवा फॉरवर्ड आता सावर्डेतही लक्ष घालणार असे ऐलान केले. सावर्डेकरांना नारळाची ॲलर्जी नाही हे यापूर्वी त्‍यांनी एकदा दाखवून दिलेले आहे असे सूचक उद्‍गारही त्‍यांनी काढले. हे उद्‍गार काढताना त्‍यांच्‍यासोबत सावर्डेचे माजी आमदार आणि मंत्री दीपक पाऊसकर होते. पाऊसकर आता गोवा फॉरवर्डमध्‍ये सामील होणार तर नाहीत ना! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND Vs NZ: "अभिषेक, वरुण फायनल खेळणार का"? कॅप्टन सूर्याने दिली प्रतिक्रिया; सेंटनरला म्हणाला 'आता काहीतरी नवे बोला!'

Womens ODI Trophy: शतक हुकले पण सामना जिंकला! गोव्याची चंदीगडवर मात; तनया नाईकच्या झुंजार 95 धावा

Ferdino Rebello: 'सर्व कॅसिनो मांडवी नदीतून बाहेर काढा'! फर्दिन रिबेलो कलम ‘१७ अ’, कॅसिनोविरोधात दाखल कऱणार याचिका

VIDEO: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत वाढली! घोडेमोडणी आटोपून येणाऱ्या स्कुटरला रात्री दिली धडक; बहीणभाऊ जखमी

Fastest Lady Driver: '..पीछे छोड दे सारा जहाँ'! गोव्याची ‘फास्टेस्ट लेडी ड्रायव्हर’ अश्रफी; मोटरस्पोर्ट्‌समधील प्रेरणादायी नाव

SCROLL FOR NEXT