Goa Politics: खरी कुजबुज; विजयची मडगावात घुसखोरी

Goa Latest Political News: कदाचित निवडणूक जवळ आल्‍यामुळे असेल पण बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव हे हल्‍लीच्‍या दिवसांत बरेच सक्रिय झालेले दिसतात.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

विजयची मडगावात घुसखोरी

विजय सरदेसाई आणि दिगंबर कामत हे दोघेही एकत्र असताना मडगाव दिगंबरचे आणि फातोर्डा विजयचा असा फॉम्‍युर्ला पालिका निवडणुकीसाठी वापरला जायचा. मात्र आता विजय आणि दिगंबर वेगवेगळ्‍या पक्षात आहेत. त्‍यामुळे मडगावातील त्‍यांची ही युती तुटली आहे हे सांगण्‍याची गरज नाही. यामुळेच विजय सरदेसाई यांनी आता आपण मडगावातही उमेदवार उभे करू असा इशारा दिला आहे. मडगावात विजयची किती मात्रा चालणार हे येणारा काळच स्‍पष्‍ट करणार म्‍हणा. मात्र आता परत परत विजय अशा घोषणा करतात त्‍यामागे खरेच काही तथ्‍य आहे की बाबांना घाबरविण्‍यापुरत्‍या त्‍यांच्‍या या घोषणा मर्यादित आहेत? या प्रश्‍नामुळे सध्‍या मडगावकर बुचकळ्‍यात पडले आहेत. ∙∙∙

चर्चिलची सक्रियता

कदाचित निवडणूक जवळ आल्‍यामुळे असेल पण बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव हे हल्‍लीच्‍या दिवसांत बरेच सक्रिय झालेले दिसतात. कुठलाही विषय घेऊन त्‍यावर भाष्‍य करण्‍याचा चर्चिल आलेमाव यांनी जणू रतिबच सुरू केला आहे, असे वाटावे अशा तऱ्हेने ते लागाेपाठ वक्‍तव्‍य करत आहेत. काल आलेमाव यांनी गोव्‍यात वाढलेल्‍या ड्रग्‍स प्रकाराबद्दल असाच आवाज उठविला. ड्रग्‍समुळे युवा पिढी बरबाद होते, असा त्‍यांचा दावा असून पोलिसांनी त्‍यावर नियंत्रण आणले पाहिजे अशी मागणी त्‍यांनी केली. या प्रकरणात मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी लक्ष घालावे, असेही आवाहन त्‍यांनी केले आहे. वास्‍तविक ड्रग्‍सचा हा विषय किनारपट्टी भागात पूर्वीपासून चालू आहे. मग त्‍यावर बोलण्‍यासाठी चर्चिलना आताच का, जाग यावी बरे? ∙∙∙

आरती, घाट आणि आमदार

आमदार राजेश फळदेसाई आणि आमदार प्रेमेंद्र शेट मांद्रेकर यांच्या मतदारसंघांच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीकाठी ‘आरती घाट’ उभारण्याचा प्रस्ताव सरकारने पुढे आणला आणि दोन्ही बाजूंनी राजकारणाची लाट उसळली म्हणे. कारण घाट नदीच्या एका काठावर झाला तर एका आमदाराच्या मतदारसंघात, आणि दुसऱ्या काठावर झाला तर दुसऱ्याच्या! म्हणूनच एका आमदाराने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, आमच्या मतदारसंघात असा ‘आर्थिक घाट’ नकोच, असे ठामपणे सांगितल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनीही ते ऐकून घेतल्याचे सांगितले जाते. पण गावकऱ्यांना मात्र अजूनही संशय आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील लोक सावध झाले असून काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरण्याचीही चिन्हे दिसू लागली आहेत. आता गंमत अशी की, नेमका कोणत्या आमदाराला घाट हवा आहे आणि कोणाला नको हे अजूनही लोकांना समजलेले नाही. दोन्ही बाजूंनी ‘आम्हाला नको’ म्हणण्याची स्पर्धा सुरू आहे. आता हा छोटा ठिणगीचा वणवा मोठ्या आंदोलनात रूपांतरित होतो का, आणि त्यावेळी आमदार लोकांसोबत उभे राहतात की शांतपणे घाटाच्या पायऱ्या मोजत बसतात हे पाहणे मात्र रंजक ठरणार आहे. ∙∙∙

दामबाबके मडगाव में अंधेर नही!

मडगावच्या नगरसेविका पूर्वीच्या पूजा नाईक आणि आताच्या पूजा काणेकर यांनी खोटा जात दाखला सादर करून इतर मागासवर्गीयांना राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक लढवली या कारणावरून त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात पुष्पा विर्डीकर यांनी तक्रार दिली होती. पूजा नाईक यांच्या नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपण्यास काही महिने बाकी असताना हा निकाल आल्याने भाजपसाठी नाही म्हणजे हा एकप्रकारे नैतिक विजय ठरला आहे. त्यामुळेच फातोर्डा भाजप मंडळाचे सरचिटणीस दिलीप नाईक यांनी यावेळी बोलताना दामबाबांच्या या स्थळात जरी ‘देर असली तरी अंधेर बिलकुल नही’. शेवटी दामबाबाने न्याय दिला, असे ते म्हणाले ∙∙∙

हे दरबार जनतेच्या भल्यासाठी?

काम होणार की नाही होणार! हे सांगण्याची धमक ज्या राजकीय नेत्यात आहे, तोच खरा नेता. दुर्दैवाने आपले बहुतांश नेते जनतेला काम करण्याचे खोटे आश्वासन देतात व झुलवून ठेवतात. पूर्वीच्या काळी राजे महाराजे आपल्या समस्या सोडविण्यासाठी दरबारात यायचे. आता आपले काही मंत्री व आमदार आपल्या मतदारसंघात जनता दरबार भरवितात. मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, अनेक आजी व माजी आमदार दरबार भरवितात. भाबडी जनता राजकीय नेत्यांच्या दरबारात आपल्या समस्या घेऊन हजेरी लावतात. मात्र जनतेच्या समस्यांना या दरबारात समाधान मिळते का? काही दरबारात तर समस्या घेऊन येणाऱ्या लोकांना समस्या मांडण्यासाठी तीस सेकंदाचा वेळ ही दिला जात नाही. जनतेचे अर्ज स्वीकारले जातात, मात्र त्यावर कार्यवाही होते का? याचे उत्तर नाही. जनकल्याणासाठी हे दरबार भरविले जात असतील, तर योग्य नियोजनाची गरज आहे. बिचारी जनता आपले काम होणार, आपला नेता आपली समस्या सोडविणार, या भाबड्या आशेने अनेकजण येतात, पण त्यांच्या पदरी निराशाच येते. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; एका वाक्याने सरकार सावध?

‘त्या’ फलकाची पणजीत चर्चा

मडगावात होळीच्या शुभेच्छा देणारे भव्य फलक कॉंग्रेसमध्ये हल्लीच दाखल झालेले चिराग नायक यांनी लावले होते. शहरातील प्रमूख वाहतुक बेटांवर सुमारे १५ फूट उंचीचे काँग्रेसचे हात चिन्ह असलेले हे फलक रविवारी उभे राहिले. परंतु सोमवारी संध्याकाळी अचानक ते फलक गायब झाल्याने मडगावकरत संभ्रमात पडलेच, पण त्याची चर्चा राजधानी पणजीतही सुरू झाली. यामागे म्हणे मडगावातील काही जुन्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी म्हणे परवानगी न घेताच ते फलक लावल्याने ते नगरपालिकेने काढून टाकले व पक्षाची नाचक्की झाली, अशी तक्रार कॉंग्रेस भवनात केल्याची माहिती कानावर पडली आहे. आता कॉंग्रेसची शिस्तभंग समिती यावर काय कारवाई करते की एखादी चौकशी समिती नेमते ते लवकरच कळेल. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: पणजी, फोंडा निवडणुकीवर भाजपने ठरविली रणनीती! गाभा समितीची बैठक, संघटनात्मक हालचालींना वेग

फोंड्यातील शिस्तबद्ध शिमगोत्सव...!

फोंड्यातील यंदाच्या राज्य पातळीवरील शिमगोत्सवाला प्रचंड उपस्थितीत प्रारंभ झाला. मुख्यमंत्र्यांनी या शिमगोत्सवाचे उद्घाटन केले. शिस्तबद्धरीत्या झालेल्या या शिमगोत्सवामुळे मुख्यमंत्री खूष झाले. फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीने अध्यक्ष रितेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिमगोत्सवाचे शिस्तबद्धरीत्या आयोजन केले. याकामी गुरुनाथ ऊर्फ भाई नाईक आणि इतर सहकाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली. व्यवस्थित आणि शिस्तबद्ध आयोजनाबद्दल मुख्यमंत्रीही इंप्रेस झाले. शिमगोत्सवाला खरे म्हणजे व्यापक स्वरूप दिले ते रवी पात्रावने असे सांगताना आता त्यांचे पुत्र रितेश नाईक यांनी ही जबाबदारी स्विकारली असून उत्तमरीत्या शिमगोत्सव आयोजित केल्याबद्दल रितेश आणि सहकाऱ्यांना शाबासकी दिली आणि कौतुकही केले. आता मुख्यमंत्री रितेशवर एवढे खूष आहेत म्हटल्यावर कदाचित फोंडा पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी रितेश नाईक यांनाच मिळते की काय, याबाबत चर्चा होताना दिसली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com