वाळपई: आंबेडे, नगरगाव येथील श्रवण बर्वे खून प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. याप्रकरणात शनिवारी (१९ एप्रिल) वासुदेव ओझरेकर याला अटक केल्यानंतर आता श्रवणच्या वडील आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे श्रवणचा जीव बापलेकाने मिळून घेतल्याचा संशय गडद झाला असून, याबाबत उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक रविवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.
सोमवारपासून (१४ एप्रिल) संपूर्ण गोव्यात श्रवण बर्वेचे खून प्रकरण गाजत होते. श्रवणच्या मृत्यूचे गूढ समोर येत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर शवविच्छेदन अहवालातून श्रवणचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास गतीमान करत १५ ते १६ लोकांना ताब्यात घेत चौकशी केली. यातील तिघांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यापैकी एक वासुदेव ओझरेकर याला अटक करण्यात आली. वासुदेवचा कसून तपास केला असता त्याने श्रवणच्या वडील आणि भावाचे बिंग फोडत महत्वाची पोलिसांनी दिली.
वासुदेवने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी उशीरा रात्री देविदास बर्वे आणि उदय बर्वे या दोघांना अटक केली. जन्मदात्या पित्यानेच स्वत:च्या मुलासोबत मिळून स्वत:च्याच दुसऱ्या मुलाचा खून केल्याबाबत आता शंका गडद झाली आहे. दरम्यान, श्रवण बर्वेचा खून का करण्यात आला? तो कसा करण्यात आला? यात वडील देविदास , भाऊ उदय आणि अटकेत असणारा वासुदेव यांच्या काय भूमिका होत्या याबाबत उत्तर गोव्याचे पोलिस अधिक्षक अक्षत कौशल रविवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.
वासुदेवला दहा दिवसांची पोलिस कोठडी
श्रवण बर्वेच्या खून प्रकरणात चौकशी करताना पोलिसांनी चौकशीसाठी अनेकांना पोलिस स्थानकात आणले होते. यानंतर तिघांची कसून चौकशी केल्यानंतर वासुदेव ओझरेकर याला अटक करण्यात आली. पोलिसांनी वासुदेवला न्यायालयात हजर केले असता त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत वासुदेवने बर्वे बापलेकाचे बिंग फोडले आहे.
काय आहे प्रकरण?
श्रवण बर्वेचा आंबेडे - नगरगाव येथे १४ एप्रिल रोजी सकाळी हनुमान मंदिराजवळ मृतदेह आढळून आला होता. श्रवणच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या हत्येचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले होते. पण, त्याचा खून कोणी आणि का केला याची उत्तरे अद्याप मिळणे बाकी होते. दरम्यान, याप्रकरणी आता बापलेकाला अटक करण्यात आल्याने या प्रकरणावरील पडदा उठणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.