पणजी: नामवंत रंगकर्मी तथा कला अकादमीच्या ‘रंगमेळ’चे माजी प्रमुख प्रा. अफसर हुसेन (71) यांचे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झोपेत असतानाच सांगोल्डा येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना ममता हुसेन या आहेत.
मूळ राजस्थानमधील हुसेन हे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे स्नातक होेते. त्यांनी फाईन आर्टची पदवी घेतली होती. ‘रंगमेळ’साठी त्यांनी उत्तमाेत्तम नाटके बसविली.
त्यापूर्वी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरमध्ये ते कार्यक्रम अधिकारी होते. भारतीय नाट्य शैलीतील नाटके बसविण्यात त्यांना विशेष रस होता. फाईन आर्टचे विद्यार्थी असल्याने ते नाटकांचे नेपथ्यही करायचे. 1990-91 दरम्यान ते कला अकादमीच्या नाट्य विद्यालयात नाट्य शिक्षक म्हणून रुजू झाले. नंतर रंगमेळचा अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे होता.
सध्या ते कला अकादमीच्या गोवा कॉलेज ऑफ थिएटर आर्टमध्ये व्याख्यान तत्त्वावर शिकवायचे. शनिवारीही ते तिथे गेले हाेते. तिडोराव (राजस्थानी लोककथेवरील), आधे-अधुरे, ऊरुभंग, भगवत अज्युकम् अशी त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके गाजली. त्यांचा एकुलता मुलगा अपघातात गेल्याने मध्यंतरी त्यांच्यावर माेठा आघात झाला होता. राजस्थानहून त्यांचे नातेवाईक गोव्यात पोचल्यावर मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जाणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.