डिचोली: पाळी येथील स्फोटके (Gelatin) चोरीप्रकरणी डिचोली पोलिसांनी (Bicholim Police) तिघा संशयितांना अटक केली असून, चोरीस गेलेली स्फोटकेही हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, हे प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपविण्यात आले असून, त्यांचे पथक या प्रकरणाचा तपास करणार आहेत. लवकरच हे पथक डिचोलीत दाखल होणार आहे, अशी माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे.
पाळी-डिचोली येथील ‘केल-टॅक एनर्जी’ या कंपनीचे गोदाम फोडून आतील जिलेटिनचा स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारे डेटोनेटर आदी 100 किलो स्फोटके गेल्या आठवड्यात चोरीस गेली होती. याप्रकरणी संबंधित कंपनीने डिचोली पोलिसांत तक्रार दिली होती. स्फोटके चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांचीही झोप उडाली होती. डिचोलीचे पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणी तपासाला गती दिली.
उपलब्ध झालेल्या महत्वाच्या धाग्यांवरुन पोलिस निरीक्षक गडेकर यांनी तपासाची चक्रे फिरवताना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रीतेश गावडे (सत्तरी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्फोटके चोरल्याची कबुली दिली. संशयिताने दिलेल्या माहितीनुसार, प्रीतेश गावडे याच्यासह कृष्णा गावकर (कुळे) आणि गौरीश शेवाडकर (सत्तरी) या संशयितांना अटक केली. पोलिसांनी शोध घेऊन स्फोटके हस्तगत केली. नौदल पाणबुड्यांच्या सहकार्याने सत्तरीत म्हादई नदीपात्रात शोध मोहीमही राबविण्यात आली.
संशयितांना गुरुवारपर्यंत रिमांड
स्फोटके चोरीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केलेल्या तिघांही संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना गुरुवार दि. 9 डिसेंबरपर्यंत रिमांड घेतला आहे. स्फोटके ठेवताना आवश्यक ती खबरदारी घेण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल संबंधित कंपनीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.