Things to do in Canacona: जर तुम्हाला गोव्याच्या नेहमीच्या गजबजाटापासून दूर, निवांत आणि सुंदर समुद्रकिनारे अनुभवायचे असतील, तर दक्षिण गोव्यातील कणकोण तालुका एक उत्तम पर्याय आहे. इथवर पोहोचण्याचा प्रवास थोडा त्रासदायक असला तरी, काणकोणचे विस्तीर्ण, शांत समुद्रकिनारे, स्वच्छ निळे पाणी आणि मनमोहक सूर्यास्त तुमचा थकवा नक्कीच दूर करतील.
काणकोणला कसे पोहोचाल?
राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत काणकोणची कनेक्टिव्हिटी थोडी कमी आहे. उत्तर गोव्यातील म्हापसा शहरापासून सुमारे ३८ किलोमीटरच्या या प्रवासासाठी राज्य परिवहन आणि स्थानिक बस सेवा उपलब्ध आहेत. मात्र, जर तुम्हाला अधिक सोयीस्कर आणि वेळेनुसार फिरण्याची इच्छा असेल, तर दुचाकी किंवा कार भाड्याने घेणे अधिक फायद्याचे ठरू शकते. उत्तर गोव्यातून राज्य परिवहनच्या बसेस म्हापसा बसस्थानकावरून नियमितपणे दक्षिण गोव्यातील काणकोणच्या दिशेने धावतात.
पळोले बीच:
उत्तर गोव्याचे समुद्र किनारे प्रसिद्ध असले तरीही नेहमीच गजबाजलेले असतात आणि म्हणूनच शांततेच्या शोधत असलेल्या पर्यटकांसाठी पळोले बीच हा एक शांत अनुभव देतो. इथे तुम्ही तासंतास समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकता, समुद्राच्या पाण्यात आनंद लुटू शकता आणि शांततेत रममाण होऊ शकता.
पर्यटनाच्या हंगामात इथे थोडी गर्दी जाणवते, पण तरीही हा बीच इतर किनयऱ्यांच्या तुलनेने शांत असतो. इथे राहण्यासाठी बीच हट देखील उपलब्ध आहेत. पळोले बीचवर भारतीय पदार्थांपासून पाश्चात्य पद्धतीचे अनेक पदार्थ सर्व्ह करणारी रेस्टॉरंट्स आहेत.
ऑफबीट बेटांना भेट द्या:
पळोले बीचवरून बोटीने बटरफ्लाय आणि हनुमान बेटांपर्यंत एक रोमांचक प्रवास करता येतो. दररोजच्या बोटींगमध्ये तुम्हाला सुमारे एक तास किनारपट्टीच्या बाजूने फिरवले जाते आणि हनुमान बेटावर तुम्ही उतरून समुद्रात डुबकी मारू शकता.
पाहण्यासारखी ठिकाणे:
खोतीगाव वन्यजीव अभयारण्य: गोव्यातील सर्वात मोठ्या नैसर्गिक अभयारण्यांपैकी एक अभयारण्य दक्षिण गोव्यातील काणकोणमध्ये आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत या समृद्ध जैवविविधतेने परिपूर्ण अभयारण्यात तुम्ही पूर्ण दिवस घालवू शकता.
मल्लिकार्जुन मंदिर: हे सुमारे २०० वर्षे जुने प्राचीन मंदिर काही खास परंपरांसाठी ओळखले जाते. मार्चमध्ये साजरा होणारा शिमगोत्सव इथे मोठ्या उत्साहात पार पडतो. याशिवाय, वीरमेळ आणि शिशिरांनी हे इथले वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहेत.
काबो दे रामा: दक्षिण टोकाला असलेले हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. आपल्या वैभवशाली काळात या किल्ल्यावर २१ तोफा आणि सैनिकांसाठी बराकी होत्या. पोर्तुगीजांच्या राजवटीच्या खुणा म्हणून आजही इथे काही बुरूज आणि तोफांचे अवशेष पाहायला मिळतात.
काणकोणचा प्रवास तुम्हाला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातो. शांत आणि सुंदर अनुभव घेण्यासाठी काणकोण नक्कीच भेट देण्यासारखे ठिकाण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.