ईडीआयआयच्या ४३ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रत्यक्ष उपस्थिती नसली, तरी त्यांची अनुपस्थिती कोणालाही जाणवू दिली नाही. त्यांनी ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित राहत, केवळ भाषण नव्हे, तर एक ठसा उमटवणारे नेतृत्व दाखवले. मुख्यमंत्री स्वतः कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत, पण कार्यक्रम सोडला नाही आणि त्यांच्या याच गोष्टीमुळे पुन्हा एकदा लोकांना चर्चा करण्याची संधी मिळाली. गेल्या काही काळात मुख्यमंत्री सावंत यांच्या कार्यशैलीबाबत एक खास ओळख तयार झाली आहे आणि ती म्हणजे ते एकही कार्यक्रम चुकवत नाहीत, मग तो शारीरिक उपस्थितीत असो वा आभासी स्वरूपात. त्यामुळे आता निवडणुका जवळ आल्याने मुख्यमंत्री गोव्यात अगदी काहीच मिनिटांच्या अंतर फरकाने कार्यक्रम घेऊन ऑनलाइन पद्धतीने कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, पण कार्यक्रम टाळणार नाहीत, अशी चर्चा सुरू आहे.∙∙∙
विकसित भारतसाठी आपले पंतप्रधान झटतात आणि विकसित गोवा करण्यासाठी आपले मुख्यमंत्री झटतात. मात्र, जे विकसित करण्यासाठी काम हाती घेतले आहे ते आधी पूर्ण करायला हवे की नको? मुख्यमंत्री राज्याचे गृह खातेही सांभाळतात. राज्यातील पोलिस जे जनतेची सेवा करण्यासाठी व राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तळमळीने काम करतात त्यांना कामाच्या ठिकाणी सुव्यवस्था मिळायला नको का? केपे पोलिस स्थानकाच्या इमारतीच्या कामाला सुरवात झाल्यास सहा वर्षे उलटली असणार. बाबू कवळेकर मुख्यमंत्री असताना या पोलिस स्थानक इमारतीचे काम धडाक्यात सुरू होते. मात्र, बाबू गेले एल्टन आले आणि त्या इमारतीचे काम बंद पडले. त्या इमारतीच्या परिसरात जंगल वाढायला लागले आहे. अपूर्ण इमारतीला भूत बंगल्याचे स्वरूप यायला लागले आहे. मुख्यमंत्री साहेब पोलिस गेल्या सहा वर्षांपासून एका अडगळीच्या इमारतीत काम करीत आहेत. बाबू व एल्टन यांच्या भांडणात इमारतीचे काम बंद पडले आहे का? आम्हाला त्या इमारतीत जाण्याचे भाग्य मिळणार की नाही? असे आम्ही नव्हे, तर पोलिस विचारीत आहेत. ∙∙∙
पंचायतींच्या आर्थिक निधीत वाढ व्हावी म्हणून अनेक कर ग्रामस्थांवर लादले जातात. त्यातीलच एक म्हणजे घरपट्टी. बोरी पंचायतीच्या मागच्या काही काळापासून वाढीव घरपट्टी म्हणजे एकदम चौपट रक्कम करण्यात आली होती, ती आता अर्धी करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव या पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. या ठरावाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. हा प्रकार केवळ बोरी पंचायतीपुरता मर्यादित नाही, तर राज्यातील अनेक पंचायतींनी वाढीव तीसुद्धा भरमसाट घरपट्टी ग्रामस्थांवर लादली आहे. त्यामुळे ही घरपट्टी आता कमी करण्याबाबत ग्रामस्थ मागणी करीत आहेत. बोरीवासीयांनी पुढाकार घेऊन आपली वाढीव घरपट्टी कमी करून घेतली, आता इतर पंचायतींची पाळी आहे, त्यामुळे पुढील काळात भरमसाट घरपट्टी ग्रामस्थांना भरावी लागणार नाही, असेच एकंदर चित्र दिसत आहे. ∙∙∙
लेखक मिलिंद म्हाडगुत यांच्या पुस्तकाचा काल प्रकाशन सोहळा फोंडा येथे कृषिमंत्री रवी नाईक यांच्या कार्यालयात झाला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाला झालेली गर्दी. सहसा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला विशेष गर्दी होत नसते, पण या सोहळ्याला एवढी गर्दी झाली की सभागृह तर भरलेच, पण शेवटपर्यंत गर्दी वाढतच गेली. कार्यक्रम संपला तरी लोक येतच होते. काही लोक तर दै. ‘गोमन्तक’मधील या कार्यक्रमासंबंधीची बातमी वाचून आल्याचे सांगत होते. आता ही गर्दी पुस्तकाच्या राजकारणासारख्या वेगळ्या विषयाकरता होती? लेखकांकरता होती? प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले दै. ‘गोमन्तक’ व ‘गोमन्तक टीव्ही’चे संपादक संचालक राजू नायक यांच्याकरता होती? की कृषिमंत्री रवी नाईक यांच्याकरता होती? यावर नंतर बराच वेळ चर्चा सुरू होती. पुस्तकाच्या प्रकाशनापेक्षा गर्दीचाच विषय प्रामुख्याने चर्चेचा ठरला, एवढे मात्र नक्की. ∙∙∙
राज्यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) खात्याकडून सध्या मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे एफडीएचे पथक आता गावागावांत जाऊन कारवाई करणार का? अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. बाजारपेठांतील आंब्यांच्या विक्रेत्यांवर छापे, फळांचे नमुने गोळा करणे आणि गलिच्छ खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हॉटेलांवर तातडीची कारवाई यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः आंबा विक्रीला वेग आलेला असताना एफडीएचा वाढता दबाव जाणवत आहे. त्यामुळे काही विक्रेते स्वतःहून स्टॉक स्वच्छ ठेवू लागले आहेत. ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये एफडीएचे पथक कधीही दाखल होईल, याबाबतही जोरदार चर्चा आहे. प्रशासन मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करत असून आपला दबाव कायम ठेवला आहे, हे मात्र नक्की! ∙∙∙
फोंडा मतदारसंघाचे शिल्पकार विद्यमान आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांचे वारस म्हणून रितेशकडे पाहिले जाते. रवी नाईक यांनी खरे म्हणजे फोंड्याचा भरीव विकास केला. ज्यावेळेला रवी नाईक आमदार नव्हते, त्याकाळात हा विकास खुंटला. त्यामुळे पुन्हा एकदा मागच्या निवडणुकीत रवींना मतदारांनी संधी दिली. आता वय वाढतेय म्हटल्यावर रवी माघार घेणार हे नक्की आहे, पण त्यांचा वारस म्हणून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रितेश नाईक यांच्याकडे पाहिले जाते, आता रवींची हुशारी रितेश नाईक कशी काय पुढे चालवतात, ते पहावे लागेल.∙∙∙
भोमा येथील रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. केंद्रीय मंत्रालयाने सदर रस्त्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर केल्यानंतर रुंदीकरणाला असलेला स्थानिकांचा विरोध तीव्र झालेला आहे. लोकांचा आग्रह सध्याचा रस्ता रुंद न करता बगलमार्ग करावा असा आहे. मात्र, कुठ्ठाळी, पर्वरी वा वेर्णा पठार ते मडगावचा पश्चिम बगलमार्ग अशी जी सरकारने उड्डाण पुलांना मान्यता दिली आहे त्याच धर्तीवर भोम येथेही रुंदीकरण न करता उड्डाण पूल उभारला, तर सगळेच प्रश्न मिटतील असे अनेकांना वाटत आहे. तसे झाले तर घरे, मंदिरे, लोकांची व्यापारी आस्थापने हटविली जाणार नाहीत. सरकारकडे तसे पाहिले तर निधी आहेच, मग तो अशा उड्डाण पुलासाठी खर्च झाला तर काय बिघडणार असे ही मंडळी म्हणते. मात्र, असा उड्डाण पूल वा बगलरस्ता झाला, तर सर्व वाहतूक तशी वळेल मग काय होते, व्यवहार कसे ठप्प होतात, त्याची माहिती भोमवासीयांनी असे बगलरस्ते वा उड्डाण पूल झालेल्या ठिकाणाच्या रहिवाशांकडून अगोदरच घ्यावी असेही ते म्हणतात ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.