पणजी: ईडीने गोव्यात बेनामी मालमत्ता प्रकरणी मोठी कारवाई केली. बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 च्या तरतुदीनुसार ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. ईडीने 27 नोव्हेंबर रोजी हणजूण आणि आसगावसह महत्त्वाच्या ठिकाणी 1268.63 कोटी किमतींच्या 5 लाख चौरस मीटरपेक्षा अधिक असलेल्या 19 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या.
जप्त करण्यात आलेल्या या मालमत्ता शिवशंकर मायेकर नावाच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखालील एका टोळीने बेकायदेशीरपणे बळकावल्या होत्या. या टोळीने जमिनीच्या मालकी हक्कासाठी पद्धतशीरपणे जाणूनबुजून तयार केलेल्या बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता, यामध्ये वाटप प्रमाणपत्रे, अंतिम ताबा प्रमाणपत्रे, सीमांकन प्रमाणपत्र, जुनी विक्रीपत्रे, बक्षीसपत्रे आणि इतर अनेक खोट्या नोंदींचा समावेश होता.
ईडीने या प्रकरणातील तपासाची सुरुवात गोवा पोलिसांनी (Goa Police) दाखल केलेल्या एका गुन्ह्याच्या आधारावर केली होती. हणजूण येथील सर्व्हे क्रमांक 496/1-ए येथील जमिनीच्या संदर्भात यशवंत सावंत आणि इतरांविरुद्ध फसवणूकीबाबत भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी बनावट कागदपत्रे सादर करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून फसवणुकीने जमिनीचा ताबा त्यांच्या नावावर करुन घेतला होता. एवढच नव्हेतर यातील काही भाग तिसऱ्या पक्षांना विकून त्यांनी मोठी बेकायदेशीर कमाई देखील केली होती.
यापूर्वी, ईडीने 9 सप्टेंबर आणि 10 ऑक्टोबर 2025 रोजी तपासणी मोहिमेत या टोळीचे 12.85 कोटी रुपयांचे बँक खाते आणि इतर मौल्यवान मालमत्ता जप्त करुन गोठवली. ईडीच्या तपासात शिवशंकर मायेकर हा या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्याने आपल्या मित्र आणि नातेवाईकांच्या नावावर गोव्यातील (Goa) अनेक जमिनी बेकायदेशीररित्या हडपल्या. मायेकरला 1 ऑक्टोबर 2025 रोजी ईडीने अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
दरम्यान, या घोटाळ्यामुळे 'शिवशंकर मायेकर' टोळीने अवलंबलेली कार्यप्रणाली उघड झाली. सर्वप्रथम, त्यांनी सहज हडपल्या जाऊ शकणाऱ्या जमिनी ओळखल्या. त्यानंतर नकली विक्रीपत्रे, बनावट बक्षीसपत्रे आणि कोमुनिदाद तसेच प्रशासकांनी जारी केलेली भासवणारी बनावट प्रमाणपत्रे यांसारखी मालकी हक्काची कागदपत्रे तयार केली. या बनावट कागदपत्रांचा वापर करुन त्यांनी निवडलेल्या 'फ्रंटमन'च्या नावावर मालमत्ता हस्तांतरित केली. हे फ्रंटमन नंतर ती मालमत्ता विकून बेकायदेशीरपणे पैसे कमवत होते.
तपासात असेही दिसून आले की, हणजूण आणि आसगाव भागात जमिनी बेकायदेशीररित्या मिळवल्याबद्दल आरोपींविरुद्ध आणखी चार गुन्हे दाखल आहेत. ईडी आता अशाच फसव्या मार्गांनी मिळवलेल्या अतिरिक्त जमिनीच्या तुकड्यांचाही शोध घेत असून PMLA अंतर्गत या मालमत्तांची माहिती इतर कायदेशीर अंमलबजावणी संस्थांसोबत शेअर केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.