साखळी: साखळीचे प्रतिष्ठित नागरिक, भाजपचे सक्रिय जेष्ठ कार्यकर्ते व सुप्रसिध्द दंतचिकीत्सक डॉ.प्रकाश देसाई यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा कॉंग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) यांना जाहीर केला आहे.
डॉ. प्रकाश देसाई यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप वर जोरदार टीका केली. भाजप हा पुर्वीचा पक्ष राहिलेला नाही.या पक्षाने संपुर्ण गोव्याप्रमाणे साखळीतही निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना बाजूला करुन बाहेरची स्वार्थी लोकांची मोठ्या प्रमाणात खोगीर भरती सुरु केली आहे. हे संधीसाधू बाहेरील लोक पक्ष प्रेमासाठी भाजपमध्ये आलेले नाहीत तर स्वताचा स्वार्थ साधायला, लुटायला आले आहेत. आपण 1994 पासून भाजपचा (BJP) समर्थक होतो. 2012 मध्ये भाजपमध्ये रितसर प्रवेश करुन भाजप कार्यात सक्रिय झालो. ज्या तत्वांमुळे आम्ही भाजपचे कार्य करीत होतो.ते तत्व गोव्यातील भाजपमध्ये राहिलेले नाही. तत्व, विचारसरणी नष्ट झाली आहे.भाजपमध्ये केवळ चिन्ह कमळच बाकी राहिले आहे. विचारसरणी मोडीत निघाली. जुन्या कार्याकर्त्यांना किंमत दिली जात नाही. इतर पक्षातून भाजपमध्ये घुसलेल्या नवीन लोकांना मान सन्मान देऊन त्यांची कामे केली जात आहेत. ज्या पर्रीकर, पार्सेकर यांनी घामा कष्टाने हा भाजप उभा केला होता त्यांच्यावर अन्याय करुन भाजपने गुन्हेगार, भ्रष्टाचार प्रवृत्ती असलेल्या लोकांना भाजपात स्थान दिले आहे. त्यामुळे कंटाळून आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ. देसाई म्हणाले. (Dr Prakash Desais support to Congress candidate Dharmesh Sagalani)
सगलानी यांच्या कार्यावर प्रभावित
कॉंग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांच्या गेल्या आठ वर्षात साखळी पालिकेत केलेल्या कामावर व गरिब, गरजू लोकांसाठी सदैव मदतीचा हात देऊन सगलानी करीत असलेले सामाजिक कार्यावर आपण प्रभावित झालो आहे. सगलानी हे धडाडीचे युवा नेते असून त्यांचे कार्य लोकांनी पाहिले आहे. कोविड "लॉकडाऊन"च्या वेळी त्यांनी हेल्पलाईन सेवा सुरु करुन स्वताचा जीव धोक्यात घालून लोकांना मदत केली होती.यामुळेच सगलानी यांची लोकप्रियता साखळी सह साखळी मतदार संघात वाढली आहे. धर्मेश सगलानी यांना आमदार म्हणून निवडून देऊन एकदाच संधी द्यावी असे मला वाटत असल्याने आपण भाजप सोडून कॉंग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना जाहीर पाठिंबा देत असून माझे कुटुंब व समर्थकांना मी कॉंग्रेस उमेदवार सगलानी यांना मतदान करुन निवडून देण्याचे आवाहन करीत आहे.
दहा वर्षात अपेक्षित विकास नाहीच
भाजपचे आमदार डॉ. प्रमोद सावंत गेली दहा वर्षे आमदार, गोवा साधन सुविधा मंडळाचे चेअरमन, सभापती व गेली तीन वर्षे मुख्यमंत्रीपदी असूनही साखळी मतदार संघाचा अपेक्षित विकास करु शकले नाही. साखळी मास्टर प्लान च्या निव्वळ घोषणा केली. प्रत्यक्षात झालाच नाही. साखळीचा नवीन कदंबा बसस्थानक ही बांधायला दहा वर्षे लागली. तो बसस्थानकही निवडणूकीमुळे घाई-गडबडीत उरकून घेतला. केवळ रस्ते केले म्हणून विकास म्हणता येत नाही. साखळी मतदार संघातील बेकारी नष्ट करण्यासाठी औद्योगिक वसाहतीची गरज होती पण आमदार सावंतने जाहिरनाम्यात आश्वासन देऊनही औद्योगिक वसाहत उभारु शकला नाही. खाण व्यवसाय हा ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय. गेली दहा वर्षे हा व्यवसाय आमदार सावंत पुन्हा सुरु करु शकले नाही हे मोठे अपयश आहे. आज खाणपट्टीतले लोक या भाजप व आमदार सावंत यांना कंटाळले आहेत.लोकांना गोव्यात व साखळी मतदार संघात परिवर्तन पाहिजे आहे व हे परिवर्तन केवळ कॉग्रेसच देऊ शकेल. साखळीत कॉंग्रेसला सगलानीच्या रुपाने योग्य असा उमेदवार लाभला असून त्याला प्रचंड बहुमताने विजय मिळावा या साठी सर्वांनी काम करावे असे आवाहन डॉ. प्रकाश देसाई यांनी केले आहे.
कॉंग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यावेळी बोलताना म्हणाले आज साखळी मतदार संघातील लोकांना बदल हवा आहे.गेल्या दहा वर्षातील एक निष्क्रिय आमदार, मुख्यमंत्री डॉ. सावंत (Pramod Sawant) यांना जनता आता कंटाळली आहे. गेल्या दहा वर्षात केवळ भ्रष्टाचार व बेरोजगारी वाढविण्याचेच काम डॉ. सावंत यांनी केले आहे.खाण व्यवसाय पुन्हा सुरु न केल्याने खाण पट्ट्यात बेकारी कोसळली, लोक कर्जबाजारी झाले आहेत. भाजपला निष्ठावंत कार्यकर्त्यांची तर कदरच नसल्याने साखळीच नव्हे संपुर्ण मतदार संघात आमोणा, सुर्ल, वेळगे, पाळी आदी भागात भाजपचे कार्यकर्ते भाजपला कंटाळून कॉग्रेसमध्ये येत आहेत. आपल्याला पाठिंबा देत आहेत. गोव्यात कॉग्रेसचेच सरकार येणार असून साखळी मतदार संघात परिवर्तन घडणार. आपण मुख्यमंत्र्यांचा पराभव करुन पुन्हा एकदा इतिहास घडविणार असे सगलानी म्हणाले.
साखळी परिसरात व भाजप गोटात एकच खळबळ
डॉ. प्रकाश देसाई यांचा कॉग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना पाठिंबा देण्याचा अगदी शेवटच्या क्षणी व अचानक घेतलेल्या निर्णयामुळे साखळी परिसर व भाजप गोटात एकच खळबळ माजली आहे. डॉ. प्रकाश देसाई हे साखळी येथील प्रतिष्ठित,जमिनदार व राजेशाही घराण्यातील असून साखळीत त्याचा दंतचिकित्सक दवाखाना आहे.एक निष्कलंक, चरित्रवान, लोकप्रिय डॉक्टर म्हणून साखळीच नव्हे तर संपुर्ण डिचोली व सत्तरी तालुक्यात ते परिचित आहेत. त्यांचा लोकांशी जनसंपर्क, पेशंट व इतर नागरिकांशी संबंध चांगले आहेत. त्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे साखळीत भाजपसाठी जबरदस्त धक्का समजला जातो. त्यांचे असंख्य पाठिराखे साखळी मतदार संघातील विविध गावात आहेत.डॉ.देसाई हे 1994 पासून भाजपचे समर्थक म्हणून ओळखले जायचे. 2012 मध्ये त्यांनी भाजपमध्ये रितसर सदस्य बनून भाजपसाठी सक्रिय काम करणे सुरु केले होते. 2012 व 2017 च्या विधानसभा निवडणूकीत साखळीचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या भाजप प्रचारातही डॉ. देसाई यांनी सहभाग घेतला होता.पण आता त्यांनी भाजपमधून बाहेर पडून 2022 च्या निवडणूकीत साखळीचे कॉंग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.