सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी), बंदर–कप्तान आणि वजन–माप खात्यांचे मंत्रिपद मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच दिगंबर कामतांनी पायाला भिंगरी लावली आहे. खात्याच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी विविध भागांचे दौरे करून अंतर्गत रस्ते, पूल, रवींद्र भवनांच्या इमारतींची स्थिती समजून घेत, अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करीत आहेत. ‘दोन महिन्यांत जनतेला बदल दिसेल’ असे त्यांनी याआधीच जाहीर केले आहे. त्यांचा विश्वास आणि कामाची पद्धत बघून दीड वर्षांत कामत अनेक बदल घडवतील असे दिसत आहे. मग, त्यांच्यासोबतच मंत्री झालेल्या तवडकरांना ही दीड वर्षे कमी का वाटत आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ∙∙∙
फोंड्यात सध्या निवडणुकीसाठी डावपेच आखण्यास प्रारंभ झाला आहे. भाजप, काँग्रेस आणि मगो पक्ष आपापल्यापरीने डावपेच खेळत आहेत आणि मतदार कुणाच्या मागे आहेत, त्याचा मागोसा घेत आहेत. या खेळात मात्र विद्यमान आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक ‘वेट अँड वॉच’ची भूमिका साकारत आहेत. सध्या गुढघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीत उतरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सणवारीत फोंडा शहरात मोठे बॅनर्स झळकत आहेत. मात्र, मतदार राजा कुणाच्या मागे उभा राहणार हे अजून कुणालाच माहिती नाही, त्यामुळे आटापिटा करून त्याचा काय फायदा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ∙∙∙
मडगाव पालिकेचा नोकरभरती विषय आता गाजू लागला आहे. या नोकरीसाठी पुन्हा परीक्षा घ्यावी, अन्यथा पालिकेचे कामकाज रोखून धरू असा इशारा कॉंग्रेसच्या एनएसयूआयने दिला आहे. सोमवारी नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांना कॉँग्रेसने या नोकरभरतीविषयी जाबही विचारला. दामूंनी त्याला आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देताना आता काहीही होणार नाही, तुम्ही पाहिजे तर कोर्टात जा असे सुनावले. आता काँग्रेसची मागणी पूर्ण झाली नाही, तर ते न्यायालयात जाणार का हे बघावे लागेल. ∙∙∙
राज्यात अनेक ठिकाणी आयआयटी उभारण्यासाठी सरकारने जिवाचा आटापिटा केला. सर्वच ठिकाणी लोकांच्या उग्र संतापाला सरकारला सामोरे जावे लागल्यामुळे आता कोडार येथे आयआयटी उभारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, पण आयआयटीमुळे बदनाम झालेल्या सरकारी यंत्रणेला आता कोडारवासीयांनीही दणका द्यायला सुरवात केली आहे. सरकार एकीकडे म्हणते आयआयटीमुळे गोमंतकीयांना फायदा आहे, पण मुळात आयआयटीत गोमंतकीय विद्यार्थ्यांना मर्यादित प्रवेश आहे. त्यामुळे हा फायदा कसा काय बुवा असा सवाल केला जात आहे. गोवा राज्य एवढेसे त्यातून कोमुनिदादी ज्यांच्या जवळ आहेत, ते या जमिनी फुंकून टाकत आहेत, म्हणूनच तर लोकांचा हा रोष आहे. ∙∙∙
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा वाढदिवस अनेक गोष्टींनी गाजला. दिगंबर कामत यांचे ‘१५ साल तक भाजप आ नहीं सकता’ हे म्हणणे अजूनही समाज माध्यमावर गाजत आहे. आता गुन्हेगारी इतिहास असलेली एक व्यक्ती दामूंना केक भरवतानाचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात दामूबाब सांगतात की आम्ही कुणाचे चारित्र्य प्रमाणपत्र पाहून कुणाला घरात प्रवेश देणे किंवा नाही ठरवत नाही. माझे स्वतःचे चारित्र्य जाणून घ्या व नंतरच असे फोटो व्हायरल करा असा सल्ला ते देतात. आपल्याला हजारो लोकांनी येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गुन्हेगारी इतिहास असलेले व्यक्ती दररोज विरोधकांच्या घरात ये जा करीत असतात. आपल्याकडेसुद्धा विरोधक अशा व्यक्तींबरोबर खाताना, पिताना, फिरतानाचे फोटो आहेत, पण तिसऱ्या व्यक्तीकडून ते व्हायरल करण्याइतपत खालची पातळी आपण गाठलेली नाही. आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात, आनंदात झाला हे मात्र कुणाला तरी खुपले असेल अशी प्रतिक्रिया दामूंनी दिली आहे. हे सर्व सांगताना दामूंचा निशाणा नेमका कोणत्या राजकारण्यावर होता हे स्पष्ट केले असते तर बरे झाले असते असे लोक बोलताना दिसतात. ∙∙∙
राज्यात सध्या ईडीच्या कारवाईने एकच खळबळ उडवून दिली आहे. पणजीपासून ते इतर शहरांपर्यंत, वेगवेगळ्या प्रकरणांच्या निमित्ताने ईडीने टाकलेले छापे चर्चेचा विषय बनले आहेत. या महिन्यातील छापे तर विशेषतः जास्त चर्चेत आहेत. हे छापे राजकीय विरोधक आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर पडत असल्याने राज्यात ‘ईडी सरकार’ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. सरकार समर्थक म्हणतात की ही फक्त एक नियमित तपासणी आहे, तर काहीजण याला राजकीय षडयंत्र मानतात. ‘हे छापे म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे का?’ असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व छाप्यांमुळे खरंच काहीतरी मोठे साध्य होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल, पण सध्या तरी राज्याच्या राजकारणात या छाप्यांची चर्चा थांबलेली नाही. ∙∙∙
पूर्वी दिगंबर कामत काँग्रेस पक्षात असताना त्यांचे जवळचे कार्यकर्ते गोपाळ नाईक हे मडगाव गट काँग्रेसचे अध्यक्ष होते. नंतर दिगंबर कामत यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपात प्रवेश केला आणि गोपाळही भाजपवासी झाले. त्यांनी दिगंबर कामत यांची पाठ कधी सोडली नाही. आता दिगंबर कामत यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यावर मडगाव येथे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात गोपाळ त्यांच्याबरोबर असतोच. काल रवींद्र भवनची पाहणी करण्यास दिगंबर गेली होते. खरे तर तिथे गोपाळचे तसे काही काम नव्हते, पण गोपाळ तिथेही होता. दिगंबर कामत यांच्या बरोबर असताना हा गोपाळ नेहमीच आनंदी असतो बरे का! ∙∙∙
गोवा विद्यापीठामध्ये आता निवडणुकीचे वारे वाहत आहे. विद्यापीठ प्रशासनाद्वारे काही विद्यार्थ्यांच्या अजून परीक्षा सुरू असल्याने निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत, परंतु अनेकांनी विद्यार्थी संघटनांद्वारे आपापल्या पद्धतीने प्रचाराला सुरवातदेखील केली आहे. परंतु सर्वांत अग्रेसर आहे ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)... त्यांनी आपला जाहीरनामा तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सूचना मागविल्या आहेत. एरव्ही मागील काही वर्षांचा विद्यापीठ निवडणुकांचा आढावा पाहता विद्यापीठ निवडणुकांमध्ये ‘टुगेदर फॉर गोवा युनिव्हर्सिटी’ संघटना जिंकत आली आहे, परंतु यंदा अभाविपने जिंकण्याचा चंग बांधला असून जोरदार तयारी सुरू आहे. विद्यापीठात एनएसयुआयकडून मात्र काहीच हालचाली होताना दिसत नाहीत... एकंदरीत विद्यापीठ निवडणुकीत नेमकी कोणती संघटना बाजी मारेल हे येणारा काळ ठरवेलच. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.