Goa Politics: खरी कुजबुज; खरेच ‘हार’चे ‘आ’ झाले?

Khari Kujbuj Political Satire: ज्याचं जळतं त्याला कळतं, अशी एक म्हण आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारे व विद्यार्थी परीक्षेत नापास झाले तर विद्यार्थ्यांना जाब विचारणारे शिक्षक आज स्वतःच परीक्षेला घाबरू लागलेत.
Goa Latest Political News
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

...आणि शिक्षक घाबरले परीक्षेला!

ज्याचं जळतं त्याला कळतं, अशी एक म्हण आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारे व विद्यार्थी परीक्षेत नापास झाले तर विद्यार्थ्यांना जाब विचारणारे शिक्षक आज स्वतःच परीक्षेला घाबरू लागलेत. सर्वोच्च न्यायालयाने एका निकालाच्या वेळी पहिली ते आठवीपर्यंत शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना ‘टीचर एलीजिबिलिटी टेस्ट’ अर्थात ‘शिक्षक पात्रता चाचणी’ सक्तीची केली आहे. जे शिक्षक सरकारी किंवा खासगी अनुदानित शाळांत शिकवतात व ज्यांना सेवानिवृत्तीसाठी पाच वर्षांपासून जास्त कार्यकाळ आहे, अशा सर्व शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार. दोन वर्षांच्या अवधीत ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती आहे. अन्यथा त्या शिक्षकावर कारवाई होणार. आता शिक्षक ही परीक्षा द्यायला घाबरू लागलेत. देशातील विविध राज्यांतील शिक्षक आता सरकारवर हा निर्णय अंमलात न आणण्यासाठी दबाव टाकू लागले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेत कठीण प्रश्न विचारणारे शिक्षकच आता परीक्षेच्या संकटात सापडलेत.‘अब आएगा असली मजा’ असे आता विद्यार्थी म्हणू लागलेत. ∙∙∙

‘आयआयटी’ की ‘खो-खो’

कोडार-बेतोडा येथे प्रस्तावित असलेल्या आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. ‘आयआयटी आमका नाका’ अशा बॅनरखाली स्थानिकांनी एकत्र येत आपला निषेध नोंदवला आहे. विविध सरकारी खात्यांना निवेदन देऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी ते करणार आहेत. गरज पडल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. यापूर्वी हा प्रकल्प अनेक ठिकाणी हलवण्यात आला, पण प्रत्येक ठिकाणी स्थानिकांनी विरोध केल्याने तो पुढे सरकू शकला नाही. आता पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारवर टीका होत आहे. ‘सरकारला बहुतेक खो-खो खेळण्यात मजा येत असावी’, म्हणूनच ते ‘आयआयटी’साठी एक निश्चित जागा ठरवू शकत नाहीत, अशी चर्चा जिथे-जिथे हा प्रकल्प सरकतोय, त्या भागातले रहिवाशी करताहेत!. ∙∙∙

प्रवाशांच्या जीवाशी खेळ

राजधानी पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत इलेक्ट्रीक बसेस चालतात. यातील बहुतांश बस विनावाहकच असतात. वाहन चालकच तिकीट काढतात, अन् तेच वाहनही चालवतात. ही सर्कस मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पणजीतील ‘इव्ही बस’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी हा जीवघेणा खेळ खेळला जातोय. एका बाजूने राज्यात बेरोजगारी वाढलीय, दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे चालक आणि वाहकाची भूमिका एकाच व्यक्तीला निभावावी लागत आहे. वाहकांना काढल्यापासून प्रवाशांची संख्याही घटली आहे.... आज पणजी बसस्थानकावर बसचा अपघात घडला... एकंदर अशा प्रकारे ‘वेड पांघरून पेडगावला जायचा’ प्रकार थांबणार की नाही, अशी चर्चा सुरू असून स्मार्ट सिटीत स्मार्ट रस्ते तर नाहीतच.... किमान सुरळीत स्मार्ट प्रवास घडावा, अशी सामान्य मागणी पूर्ण होऊ शकत नाही का? अशी चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू झाली आहे. ∙∙∙

‘नेमका’ उद्देश काय?

राज्‍यातील मुख्‍य जंक्‍शनवर ‘एआय’बेस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्‍याची घोषणा वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी सोमवारी रस्‍ते सुरक्षा सप्‍ताहानिमित्त वास्‍कोत आयोजित कार्यक्रमात बोलताना केली. सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांमुळे चालक सावध पद्धतीने वाहने चालवतील आणि त्‍यामुळे अपघात कमी होतील, अशा हेतूने वाहतूक खात्‍याने पणजीसह इतर काही शहरांतही सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवले आहेत. पण, त्‍यांची सद्यस्‍थिती काय आहे ते सर्वांनाच माहीत आहे. शिवाय त्‍यामुळे अपघातांवर नियंत्रण आले नसल्‍याचे आकडेवारीवरूनच स्‍पष्‍ट होते. त्‍यात आता मंत्री गुदिन्‍हो यांनी ‘एआय’बेस कॅमेरे बसवण्‍यात येणार असल्‍याचे सांगितल्‍यामुळे सरकारी तिजोरीतून त्‍यावर कोट्यवधी रुपये खर्च होणार हे निश्‍चित. असे कॅमेरे बसवण्‍याचा निर्णय अपघात रोखण्‍यासाठी की ‘इतर’ काही कारणांसाठी घेतला जात आहे? या प्रश्‍‍नाचे उत्तर रस्‍ते सुरक्षेसंदर्भात काम करणारे कार्यकर्ते शोधत आहेत.∙∙∙

खरेच ‘हार’चे ‘आ’ झाले?

भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांच्‍या वाढदिवसानिमित्त फातोर्डा येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री दिगंबर कामत यांनी ‘पुढील १५ वर्षे भाजप राज्‍यात सत्तेवर येऊ नये यासाठी दामू नाईक यांनी काम करावे’, असे जे वक्तव्‍य केले, ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. यावरून भाजपात नाराजी आणि विरोधकांत हास्‍य पसरलेले असतानाच, कामत यांनी सोमवारी आपल्‍या नेहमीच्‍या शैलीत सारवासारव केली. ‘ १५ बरस तक भाजप हार नही सकती है’ असे आपण म्‍हटले होते. पण, कुणीतरी ‘हार’च्‍या ठिकाणी ‘आ’ केले, असे त्‍यांनी सांगितले. त्‍यामुळे कामतांनी नेमके काय म्‍हटले हे ऐकण्‍यासाठी अनेकजण व्‍हायरल व्‍हिडिओ शोधून पुन्‍हा पुन्‍हा ऐकत आहेत. पण, कामतांना नेमके काय म्‍हणायचे होते? हे त्‍यांना आणि भाजप नेत्‍यांनाच माहीत. ∙∙∙

दामूंना परिणाम दिसेल?

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या कार्यक्रमाला कधी नव्हे ते काही आमदार व अनेक मोठे मान्यवर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पण या कार्यक्रमात काही युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची वागणूक चर्चेचा विषय बनली आहे. काही सरकारी अधिकारी, विशेषतः उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना व्यासपीठावर जाण्यापासून अडवण्यात आले. इतकेच नाही, तर काही निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांनाही या युवा कार्यकर्त्यांनी अडवून ठेवले होते. कार्यकर्त्यांना अशी वागणूक दिल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झालीय. वाढदिवसाचा हा आनंद अशा वागणुकीमुळे मावळत असल्याचे बोलले जातेय. ज्यांना दामूंना भेटायचे आहे, त्यांना अडवून ठेवून स्वतःची टिमकी वाजवायची या कार्यकर्त्यांना काही गरज नव्हती! ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; पाचव्या मृत्यूने गूढ वाढले

बिस्किटे खाल्ली कोणी?

सचिवालयातील हा किस्सा. सोमवारी कॅन्टीन चालकाकडून एका सचिवाच्या कार्यालयाला चहापानाचे बिल पाठवण्यात आले. त्या कार्यालयातही चहा व किती बिस्कीटे आणली गेली याची नोंद होती. तेथील कर्मचाऱ्यांनी कुतूहलाने बिलाची पडताळणी केली. त्यात बिस्कीटांच्या पुड्यांची संख्या जास्त नोंदलेली आढळली. त्यामुळे आणखीन कोणी बिस्कीटे आणली का, याची विचारणा सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आली. प्रत्येकाने कानावर हात ठेवले. यामुळे प्रत्यक्षात कार्यालयाने न मागवलेली बिस्कीटे खाल्ली तरी कोणी, असा प्रश्न चर्चेला आला आणि त्याचीच चर्चा सोमवारी सचिवालयाच्या तिसऱ्या मजल्यावर होती. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: 'युतीतील पक्षांचे खच्चीकरण हेच काँग्रेसचे ध्‍येय'! आतिषी यांचा स्‍वबळावर लढण्याचा नारा; निवडणुकीत नवे चेहरे उतरवणार

कला अकादमीचे अध्यक्षपद

कला अकादमीचे अध्यक्षपद सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. गोविंद गावडे कला व संस्कृती मंत्री असताना तेच कला अकादमीचे अध्यक्ष होते. नंतर कला संस्कृती खाते मुख्यमंत्र्यांकडे आले आणि ते अध्यक्ष झाले. आता ते खाते रमेश तवडकर यांच्याकडे आले तरी कला अकादमीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आलेले नाही. त्यांना ते पद नको असल्यास कला व संस्कृतीचे आगर असलेल्या काणकोण तालुक्यातील एखाद्या जाणकारास ते पद देऊ शकतात. पण हा विषय मुख्यमंत्र्यांसमोर काढायचा कोणी हा प्रश्न आहे. त्यामुळे कला अकादमी तूर्त मुख्यमंत्र्यांकडेच राहील, अशी चर्चा आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com