वाळपई : सत्तरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी डेंग्यूचे संशयास्पद रुग्ण आढळले होते. कोपार्डे, सातोडे, भिरोंडा या गावात तर जवळपास 30 रुग्ण मिळाले होते. आता त्यात वाढ होऊन दाबे, धामशे, करंझोळ गावात डेंग्यूचे संशयास्पद रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे संशयास्पद रुग्णांची संख्या 43 हून अधिक झाली असून सत्तरी तालुक्यात चिंता वाढली आहे.
वाळपई आरोग्यकेंद्राचे प्रमुख डॉ. अभिजीत वाडकर आणि त्यांची टीम सध्या सत्तरीतील विविध गावांमध्ये जनजागृती करीत आहे. उपाययोजना म्हणून वरील गावांत धुराची व औषध फवारणी करण्यात आली असून ते काम अजूनही सुरूच आहे. दरम्यान, आता नवीन सापडलेल्या संशयास्पद रुग्णांना आरोग्य केंद्रात देखरेखेसाठी ठेवण्यात आलेले आहे.
याबाबत बोलताना डॉ. अभिजीत वाडकर म्हणाले की, संशयास्पद रुग्णांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतले आहेत. अहवाल आल्यानंतरच डेंग्यूबाबत खातरजमा होईल. सध्या तरी लोकांनी आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या परिसरात कोणतेही प्रकारचे पाणी साचून राहणार नाही याची दक्षता बाळगण्याची गरज आहे. सातोडे, भिरोंडा, कोपार्डेबरोबरच हा वाढता धोका दाबे, करंझोळ, धामशे गावात पोहोचला आहे.
गेले तीन महिने अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे सहाजिकच शेती, बागायती, घराच्या परिसरात पाणी साचून राहण्याचे प्रमाण वाढले. तसेच रस्त्यालगतच्या गटारांत पाणी साचून राहणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी हे आवश्यकच आहे, असं डॉ. अभिजीत वाडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.