पणजी: शिरगावची देवी लईराईची जत्रा 5 मे रोजी साजरी होत आहे. संपूर्ण गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमेवरील भाविकही मोठ्या संख्येने या जत्रेसाठी येतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयी - सुविधांसाठी प्रशासन सज्ज असून प्रशासकीय पातळीवरील aसर्व ती तयारी पूर्ण झाली आहे.
देवी लईराई मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात फेरी भरते. यात पूजेच्या साहित्यासह घरगुती साहित्याची, खेळण्यांची आणि खाज्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात लावली जातात. देवी लईराईचे आवडते मानले जाणारा ‘मोगऱ्याचा गजरा’ व्रिकेत्यांचीही दुकाने सजलेली असतात. फुले, पुष्पाहार, अगरबत्ती, खाजे, कापूर, ओटीचे साहित्य यासह मोगऱ्याच्या गजऱ्यांना मोठी मागणी असते.
याबाबत मोगऱ्याची शेती करणारे मये येथील शेतकरी सोमनाथ पोळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे देवी लईराईची जत्रा मर्यादित स्वरूपात झाली. आम्ही येथील छोट्याशा जागेत मोगरा फुलाची शेती करतो. मोगरा लागवडीसाठी येणारा खर्च उत्पन्नापेक्षा अधिक आहे. लागवडीनंतर सुरवातीला तीन महिने येणाऱ्या फुल विक्रीतून खर्च निघतो. मात्र, नंतर निसर्गाने साथ दिली तरच काही प्रमाणात नफा हाती पडतो, असे त्यांनी सांगितले.
लईराईच्या जत्रेदरम्यान मोगऱ्याच्या माळांना मोठी मागणी असते. या काळात बरीच दमछाक आणि धावपळ होते. पण आई लईराची सेवा केल्याचा एक वेगळाच आनंद प्राप्त होतेा, असे श्री. पोळे म्हणाले. जत्रा दोन दिवसांवर आल्याने मोगऱ्यांच्या माळा करून ठेवल्या आहेत. अनेक फूल दुकानदार आणि फिरते विक्रेते आमच्याकडून कळी आणि माळा विकत घेतात. दहा ते पंधरा गुंठ्यात मोगऱ्याची लागवड करतो. वर्षाकाळी अंदाजे दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. नियमित निगा, पाणी, खत आणि मुनष्यबळ यासाठी अधिक खर्च होतो. वर्षभराचा खर्च वजा जाता वर्षाला साधारणपणे एक ते दीड लाखांचे उत्पन्न मिळते, अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोना काळात चांगले पीक आले होते, पण सर्व मंदिरे बंद असल्याने मोगऱ्याला मागणी नव्हती. जत्राही मर्यादित स्वरूपात झाल्याने जवळजवळ विक्री झालीच नाही. तरीही आम्ही मोगऱ्याच्या माळा करून देवी लईराईला वाहिल्या. तेवढीच देवीची सेवा झाल्याचे समाधान मिळाले, असेही श्री. पोळे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.