Goa BJP State President Damu Naik Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: भाजप–मगो युती 35 पेक्षा अधिक जागा जिंकेल! दामू नाईकांना ठाम विश्‍‍वास; सरकारमुळे मतदान वाढल्याचा केला दावा

Damu Naik: भाजप–मगो युतीला निश्‍चित फायदा होईल आणि युतीचे ३५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असेही दामू नाईक यांनी स्‍पष्‍ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जिल्‍हा पंचायत निवडणुकीत भाजप–मगो युती ३५ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा ठाम विश्‍‍वास भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना व्‍यक्त केला. तर, वाढलेले मतदान विरोधी पक्षांच्‍या पथ्‍यावर पडणार असून, भाजपला अपेक्षित यश मिळू शकणार नसल्‍याचा दावा आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई आणि आपचे राज्‍य निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांनी केला.

जिल्‍हा पंचायत निवडणुकीची तयारी भाजपने अनेक महिन्‍यांपासून सुरू केलेली होती. यावेळच्‍या निवडणुकीत ८० टक्‍के नवे चेहरे देण्‍याचा निर्णय घेऊन त्‍यानुसार जिंकण्‍याची क्षमता, पक्षनिष्‍ठा आदी गोष्‍टी लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करण्‍यात आली होती. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून उमेदवारांचा प्रचार करण्‍यासह नागरिकांनी मतदानासाठी उत्‍स्‍फूर्तरित्‍या बाहेर पडावे, याबाबतची जागृतीही भाजपच्‍या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून सुरू होती.

मंत्री तसेच भाजप आणि मगोच्‍या आमदारांनाही तशा सूचना करण्‍यात आलेल्‍या होत्‍या. दुसरीकडे राज्‍य सरकारने काही महिन्‍यांपूर्वी राबवलेली ‘माझे घर’ योजना, २०१२ पासून भाजप सरकारकडून सुरू असलेला राज्‍याचा विकास, भाजप सरकारने राबवलेल्‍या समाजोपयोगी योजना आदींसारख्‍या कारणांमुळे अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला.

त्‍यामुळे जिल्‍हा पंचायतीसाठी यावेळी विक्रमी मतदान झाले. त्‍याचा भाजप–मगो युतीला निश्‍चित फायदा होईल आणि युतीचे ३५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असेही दामू नाईक यांनी स्‍पष्‍ट केले.

जनतेच्या मनात सरकारविरोधात रोष ; विजय

जनतेच्‍या मनात सरकारविरोधात रोष असतो, तेव्‍हाच जनता उत्‍स्‍फूर्तपणे बाहेर येऊन मतदान करते आणि त्‍यामुळे मतदानाची टक्‍केवारी वाढते, असा आतापर्यंतचा राजकीय इतिहास आहे. त्‍याचाच प्रत्‍यय जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्‍या मतदानातून आलेला आहे. राज्‍यात झालेल्‍या वाढीव मतदानाचा नक्‍कीच विरोधी पक्षांना फायदा मिळेल, असे आमदार विजय सरदेसाई म्‍हणाले. गोवा फॉरवर्डचे जे नऊ उमेदवार रिंगणात होते, त्‍यातील पाच जण निश्‍चित जिंकतील. तर, दोन मतदारसंघांत विजयाची संधी असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची युती हवीच; ठाकरे

भाजपला निवडणुकांत पराभूत करण्‍यासाठी गोव्‍यातील सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील काळातही काँग्रेसकडून प्रयत्‍न केले जातील, असे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले. सोबतच जिल्‍हा पंचायत निवडणुकीत यावेळी काँग्रेसला जास्‍त जागा मिळतील, असा विश्‍‍वासही त्‍यांनी व्‍यक्त केला.

भाजपला पराभूत करण्‍यासाठी विरोधकांची मोट बांधण्‍याची गरज होती, त्‍यासाठीच आम्‍हीही युतीसाठी मान्‍यता दिलेली होती. आपच्‍या नकारानंतर काँग्रेस–गोवा फॉरवर्ड आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजीपी) या तीन पक्षांची युती घडवून आणण्‍याचे प्रयत्‍न तिन्‍ही पक्षांच्‍या नेत्‍यांकडून सुरू होते. परंतु, अखेरच्‍या टप्‍प्‍यात आरजीपीने युतीत येण्‍यास नकार दिल्‍याने काँग्रेस–गोवा फॉरवर्डने एकत्र येण्‍याचे निश्‍चित केले. गोव्‍यातील जनतेला भाजप सरकार नको आहे, हे वारंवार दिसून येत आहे.

दरम्‍यान, यावेळी राज्‍य निवडणूक आयोगाने जिल्‍हा पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घाईगडबडीत जाहीर केला. त्‍यामुळे विरोधी पक्षांना उमेदवारांची निवड आणि प्रचार करण्‍यास आवश्‍‍यक तितका वेळ मिळाला नाही. तरीही मिळालेल्‍या वेळेत काँग्रेसने अधिकाधिक मतदारसंघांत नव्‍या चेहऱ्यांना संधी दिली. गेल्‍यावेळच्‍या निवडणुकीत काँग्रेसला जिल्‍हा पंचायत निवडणुकीत अवघ्‍या चार जागा मिळाल्‍या होत्‍या. यावेळी मात्र त्‍यात नक्‍की वाढ होईल, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुरांचा ताल की संकटांचा काळ? गोव्यात नाताळच्या हंगामात संगीतकारांची मोठी ओढाताण

Goa Opinion: लईराई जत्रेतील चेंगराचेंगरी, नाईटक्लबमधील 25 मृत्यू; यंत्रणांच्या उत्तरदायित्वाची निश्चिती ही काळाची गरज

Christmas 2025: रंगीबेरंगी दिवे, मोठे ख्रिसमस ट्री! राज्यात नाताळ सणाची तयारी जोरात; रस्ते, बाजारपेठा सजावटीने उजळल्या

अग्रलेख: पक्ष-अपक्ष जिंकतील, लोक हरतील!

Manohar Parrikar: 'मनोहर पर्रीकर हे निर्भीड, धुरंधर, द्रष्टे राजकीय नेते'! बायणा रवींद्र भवनमध्ये जयंती साजरी; भाईंच्या आठवणींना उजाळा

SCROLL FOR NEXT