कुंकळ्ळी: कुंकळ्ळी आयडीसी परिसरातील परशुराम मेटॉक्स कंपनीत पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर साठवलेले पेपर, रॉकवूलसह काही महागडी मशिनरी जळून खाक झाली असून लाखोंचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे समजते.
पहाटे सुमारास चार वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंकळ्ळी व मडगाव अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
जवानांनी जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
आगीच्या भीषणतेमुळे कंपनीतील साठवणुकीतील मोठ्या प्रमाणावर कागदसाठा व रॉकवूल साहित्य पूर्णपणे जळून गेले. तसेच, कंपनीत वापरल्या जाणाऱ्या काही मशिनरीही जळाल्याने उत्पादन प्रक्रियेला मोठा फटका बसणार असल्याचे कामगारांनी सांगितले.
अग्निशामक जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण आणले. आग आटोक्यात आल्यानंतर मडगाव अग्निशामक दलाची गाडी परतविण्यात आली, तर कुंकळ्ळी अग्निशामक दलाची गाडी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळीच थांबवण्यात आली आहे. कंपनीचे कामगार जळालेला पेपर, रॉकवूल व अन्य अवशेष बाहेर काढण्याचे काम करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, कंपनी व्यवस्थापनाकडून तपशीलवार अहवाल मागविण्यात आला आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले असून, आयडीसी परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये सुरक्षा उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
वारंवार घडणाऱ्या शॉर्ट सर्किटमुळे होणाऱ्या आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विद्युत यंत्रणांची तपासणी नियमितपणे होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
या घटनेमुळे कुंकळ्ळी आयडीसी परिसरातील उद्योगपती व कामगारवर्गामध्ये चिंता निर्माण झाली आहे. पुढील तपास कुंकळ्ळी पोलिसांकडून सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.