Panjim News सामाजिक व प्राणीप्रेमी कार्यकर्ते हनुमंत परब यांचा गुन्हेगारी यादीमध्ये (हिस्ट्रीशिटर) समावेश करून त्यांच्याविरुद्ध हा सूडबुद्धीने निर्णय घेण्यात आला आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आंदोलनकर्त्यांचा समावेश गुन्हेगारी यादीत करण्याची ही धोक्याची घंटा आहे.
काही अधिकाऱ्यांनी वैयक्तिक आकसासाठी त्यांचा या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे हे नाव त्यातून काढण्याची मागणी करणारे निवेदन आज हिंदू संघटना व प्राणीप्रेमी संघटना यांनी संयुक्तपणे मंगळवारी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना दिले.
पिसुर्ले गावातील पाणी समस्या तसेच खनिज ट्रकांच्या वाहतुकीमुळे गावात होणारे धूळ प्रदूषण यामुळे तेथील ग्रामस्थांनी एकजुटीने आवाज उठविला होता.
या आंदोलनाचे नेतृत्व हनुमंत परब हे करत होते. त्यामुळे त्यांना अटक करून पोलिस स्थानकात झालेली मारहाण बेकायदेशीर होती. काही विरोधकांनी केलेल्या तक्रारींचा संदर्भ घेऊन त्यांचा गुन्हेगारी यादीत समावेश केला आहे.
भीतीचे वातावरण बनविण्याचा प्रयत्न
गुन्हेगारी यादीमध्ये समावेश करायचा असेल तर त्याच्यावर अनेक गुन्हे तसेच तो समाजासाठी घातक असल्याचे पुरावे जमा करावे लागतात.
मात्र, त्यासंदर्भात परब यांच्याविरुद्ध काहीच पुरावे नसताना त्यांचा आवाज दाबून इतरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.
पोलिस स्थानक पातळीवर झालेल्या या चुकीबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून परब यांना न्याय द्यावा, असे कमलेश बांदेकर म्हणाले. यावेळी विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी व अमृत सिंग उपस्थित होते.
एकप्रकारे जनतेच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरवण्यात येत आहे. गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या घटनेबाबत माहिती नसावी याबाबत शंका आहे.
त्यामुळे परब यांचे नाव हिस्ट्रीशिटरमधून वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली जाणार आहे. तरीही काहीच झाले नाही तर पुन्हा सामाजिक संघटना एकत्र येऊन पुढील रूपरेषा ठरवतील.
- कमलेश बांदेकर, पदाधिकारी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.