Goa Congress at Alex Sequeira House Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Protest : काँग्रेसचं आंदोलन; बंडखोर आमदार सिक्वेरांच्या पुतळ्याची कार्यकर्त्यांकडून जाळपोळ

जवळपास 50 ते 60 कार्यकर्ते राय परिसरातील सिक्वेरा यांच्या घराबाहेर जमल्याने पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत कार्यकर्त्यांना मज्जाव केला.

सुशांत कुंकळयेकर

Goa Congress Protest : भाजपमध्ये प्रवेश केलेले बंडखोर काँग्रेस आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. बंडखोर आमदारांच्या घरावर आजपासून मोर्चा काढणार असल्याचं याआधीच काँग्रेसने जाहीर केलं होतं. आज नुवेचे आमदार सिक्वेरा यांच्या घरासमोर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काँग्रेसने आंदोलन जाहीर केल्यानंतर आज सकाळपासूनच कार्यकर्ते आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या घराबाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. जवळपास 50 ते 60 कार्यकर्ते राय परिसरातील सिक्वेरा यांच्या घराबाहेर जमल्याने पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत कार्यकर्त्यांना मज्जाव केला. यामुळे काहीकाळ परिसरात तणाव पाहायला मिळाला. खबरदारीचा उपाय म्हणून मोठा फौजफाटा पोलिसांनी तैनात केला होता. दक्षिण गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष साविओ डिसिल्वा यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात येणार होतं.

दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सासष्टीटे मामलेदार घटनास्थळी उपस्थित असून पोलीस बंदोबस्ताची पाहणीही त्यांनी केली आहे. आंदोलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या प्रतिमेचंही दहन केलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज असून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी आलेक्स सिक्वेरा यांच्या घरापासून 200 मीटर अंतरावर नाकाबंदी केली असून कार्यकर्त्यांना रोखून ठेवलं आहे. आलेक्स सिक्वेरा यांच्यानंतर आता उरलेल्या 7 बंडखोर काँग्रेस आमदारांच्या घरासमोर आंदोलन केलं जाणार आहे.

काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षात गेलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या राय येथे गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आमदाराच्या घरासमोर अडविल्याने आंदोलकांनी आमदारांचा पुतळा त्यांच्या घरासमोरच जाळला. त्यापूर्वी त्या पुतळ्याच्या तोंडावर शेण मारून आपला निषेध व्यक्त केला. आज बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलकांना पोलिसांनी अडविल्यावर त्यांनी मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांच्याशी हुज्जत घातली.

दरम्यान काँग्रेसने डॅमेज कंट्रोलसाठीही प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसच्‍या पक्षश्रेष्‍ठींनी विधिमंडळ गटनेतेपदी युरी आलेमाव यांची निवड केली आहे. तथापि, हे पद स्‍वीकारण्‍यास ते इच्‍छुक नाहीत. तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसमध्‍ये गोवा फॉरवर्डचे विलिनीकरण करण्‍यासही विजय सरदेसाई यांना फारसे स्‍वारस्‍य नाही. परिणामी आधीच मनोधैर्य खचलेल्‍या काँग्रेसची वाट अधिक खडतर बनली आहे.

दोन तृतीयांश आमदार फुटल्‍यानंतर गर्भगळीत झालेल्‍या काँग्रेसला बळकटी मिळावी, यासाठी पक्षांतर्गत प्रयत्‍न सुरू आहेत. काँग्रेसने तातडीने कुंकळ्ळीचे आमदार तथा पक्षाचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्‍लीतील श्रेष्‍ठींच्‍या आदेशाद्वारे आलेमाव यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. ‘पक्षाने दिलेली जबाबदारी मी सांभाळेन, मी आनंदी आहे’, अशी प्रतिक्रिया युरी आलेमाव यांनी दिली आहे. मात्र, वास्‍तवात आलेमाव हे पदभार सांभाळण्‍यास उत्‍सुक नाहीत, असे सूत्रांचे म्‍हणणे आहे.

...म्‍हणून युरी आलेमाव नाखूष

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षश्रेष्‍ठींनी राहुल गांधी यांची भेट घडवून आणावी; त्‍यांच्‍यासोबत चर्चेअंती विधिमंडळ गटनेतेपदाचा ताबा घेणे योग्‍य ठरेल, अशी युरी आलेमाव यांची अपेक्षा होती. परंतु, प्रत्‍यक्षात ती फोल ठरली आहे. दुसरीकडे सध्‍या आपल्‍या नावाचा वापर करून घेण्‍यात येईल. मात्र, निवडणुकीच्‍या तोंडावर आपल्‍याकडे अधिकार राहतील का, अशी शंकाही त्‍यांना आहे. युरी हे गेले दोन महिने राहुल, सोनिया यांच्‍याशी संपर्काचा प्रयत्‍न करत होते; पण तो होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT