पणजी: गोमंतकीय जनतेला विरोधी पक्षांची युती झालेली हवी आहे. प्रत्येक गोमंतकीयाची ही भावना असून, तिचा आदर करत काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील आहे. मात्र, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. येत्या पंधरा दिवसांत युतीचे चित्र स्पष्ट व्हावे. ‘अलीकडे आणि पलीकडे’ अशी भूमिका असू नये, असे काँग्रेसचे नेते अमित पालेकर यांनी सांगितले.
गोमन्तक टीव्हीवरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात पालेकर बोलत होते. गोवा फॉरवर्डचे नेते व प्रवक्ते प्रशांत नाईक यांनीही त्यात सहभाग घेतला. संपादक-संचालक राजू नायक यांनी उभयतांशी संवाद साधला.प्रशांत नाईक म्हणाले की, आम्ही युतीचे दरवाजे बंद केलेले नाहीत, बोलणी बंद केली आहे.
काँग्रेसकडून युतीसाठी बोलणी करण्याकरिता व्यक्ती पाठविली जाते, तेव्हा निर्णय घेण्याची क्षमता असलेले सक्षम नेते पाठविण्यात यावेत. वेळ निघून जाण्यापूर्वी युतीबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. गोवा फॉरवर्डने ‘गोवा प्रथम’ ही संकल्पना मांडली आहे. युती झाली नाही तर गोव्याच्या हितासाठी एकत्र येऊ इच्छिणाऱ्यांची युती करावी, हा त्यामागील उद्देश आहे.
‘गोंय, गोंयकार, गोंयकारपण’ हा त्याचा मूळ गाभा असून, त्यानुसार पावले उचलली जात आहेत. गेल्या वर्षी दिवाळीत विजय सरदेसाई यांनी युतीसाठी पहिल्यांदा प्रयत्न केला; मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही. येत्या काळात गोव्याच्या हितासाठी जे योग्य असेल, तेच केले जाईल, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीसंदर्भातील आपापली भूमिका मांडताना काँग्रेस व गोवा फॉरवर्डमधील चर्चेतील अडथळ्यांवरही भाष्य केले.
पालेकरांनी डागली पाटकरांवर तोफ
अमित पाटकर यांनी मागील दोन महिन्यांत जितक्या वेळा भेट घेतली, त्यापेक्षा ते काँग्रेसचे अध्यक्ष असताना भेटले असते तर आज युतीचे चित्र वेगळे असते. त्यावेळी पाटकरांनी चर्चा का केली नाही, असा सवाल अमित पालेकर यांनी केला. गिरीश चोडणकर यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते गेले. त्यानंतर ५ ऑगस्टला गोवा फॉरवर्डने युतीसंबंधी बोलणी बंद केल्याचे जाहीर केले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी योग्य ती बोलणी सुरू असल्याचेही पालेकर यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये काही ‘शकुनी मामा’ : नाईक
गोमंतकीय जनतेला विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकत्र यावे, अशी इच्छा आहे; मात्र त्यास वारंवार तडा दिला जात आहे. आमचे नेते विजय सरदेसाई यांनी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शविली होती; परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसमध्ये काही ‘शकुनी मामा’ असून ते अडचणी निर्माण करत आहेत. काणकोणपासून पेडण्यापर्यंत जनतेला सोबत घेऊन जाणारा काँग्रेसमधील एक नेता दाखवा, असे आव्हान प्रशांत नाईक यांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.