

फोंडा: माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री दिवंगत रवी नाईक यांचे कनिष्ठ पुत्र, फोंड्याचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते रॉय नाईक यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
हे राजीनामापत्र पालिका प्रशासकांना देण्यात आले असून एक प्रत फोंडा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आज फोंडा पालिकेत हे राजीनामापत्र दाखल करून घेण्यात आले. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे रॉय नाईक यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. मात्र, रॉय यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून उलटसुलट प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, रॉय यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चेला उधाण आले आहे. फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर मडकई मतदारसंघातील विविध भागांत झळकलेले त्यांच्या नावाचे शुभेच्छा फलकही चर्चेत आले होते. आता नगरसेवकपद सोडण्याचा निर्णय या घडामोडींशी जोडला जात आहे. रॉय यांची पुढची राजकीय दिशा फोंडा असेल की मडकई, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
...अन्यथा पोटनिवडणूक अटळ
आता नगरसेवक पदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी सात दिवसांचा कालावधी असून जर रॉय नाईक यांनी निर्धारित मुदतीत राजीनामा मागे न घेतल्यास प्रभाग क्रमांक १ मध्ये पोटनिवडणूक अटळ आहे. सध्या रॉय यांचे मन वळविण्यासाठी समर्थकांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. राजीनामा मागे घेण्यासाठी सात दिवसांची मुदत असली तरी तो कायम राहिल्यास रॉय यांचा पुढील राजकीय डाव अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.