पणजी: देशावर आणीबाणी लादल्याबद्दल आता तरी काँग्रेस पक्षाने जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार अरुण सिंह यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या येथील कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.
अरुण सिंह यांनी बुधवारी सकाळी ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत म्हापशातील सारस्वत विद्यालय परिसरात वृक्षारोपण केले. भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित ‘अभिनव संसद’ कार्यक्रमाचेही उद्घाटन केले. त्यानंतर पणजीतील जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
सिंह म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता हाती राज्यघटनेची प्रत घेऊन ‘आपणच राज्यघटनेचे तारणहार’ असा आव आणत असले तरी या पक्षाने आणीबाणी लादून राज्यघटनेची अवहेलना केली आहे. घटनेची सर्वांत जास्त खिल्ली काँग्रेसनेच उडवली. स्वार्थासाठी दुरुस्त्या केल्या. उलट भाजपच्या काळात केलेल्या घटना दुरुस्त्या या वस्तू व सेवा कर लागू करण्यासाठी, मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासाठी, आर्थिक मागास आरक्षण देण्यासाठी आणि महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देण्यासाठी करण्यात आल्या आहेत.
१.सध्या देशात भाजपने अघोषित आणीबाणी लागू केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसने माफी मागावी असे सांगण्याचा नैतिक अधिकार भाजपला नाही, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित होते.
२.पाटकर म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे (भाजप विचारसरणीच्या लोकांचे) कोणतेही योगदान नाही. राज्यघटना अस्तित्वात आणण्यातही ते कुठे नव्हते. या उलट लोकशाहीचे रक्षण काँग्रेसने केले.
३.काँग्रेस पक्षाच्या काळातच लोकशाहीची प्रणाली देशात निर्माण झाली. लोक सध्याच्या सरकारविरोधात बोलण्यास घाबरतात.
४.व्यावसायिक, लेखक, कवी यांनी मध्यंतरी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा आवाज दाबण्यात आला.
५.अशी अघोषित आणीबाणी लादणाऱ्यांनी काँग्रेसकडून माफीची अपेक्षा बाळगू नये, असा पलटवार पाटकर यांनी केला.
‘आपणच लोकशाहीचे रक्षक’ असा आव काँग्रेस पक्ष आणत असला तरी आणीबाणीने त्यांच्या चेहऱ्यावरील बुरखा फाडला गेला आहे. त्यांना ‘लोकशाहीचे रक्षक’ असे म्हणण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. जनतेने त्यांना नाकारणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे निदान आता तरी आणीबाणी लादून लोकशाहीची हत्या केल्याबद्दल काँग्रेसने जनतेची माफी मागावी.अरुण सिंह, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.