पणजी: कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना ‘सुपारीबाज’ म्हणणे अत्यंत लज्जास्पद, निषेधार्ह आणि खालच्या पातळीचे आहे. मंत्रिपदावरील व्यक्तीने अशी असभ्य भाषा वापरणे, ही केवळ त्यांची व्यक्तिगत उद्दामता नव्हे, तर भाजप सरकारचे संपूर्ण कलाकारांबद्दल असलेल्या तुच्छ दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असल्याची खरमरीत टीका उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस तथा नाट्य कलाकार व सांस्कृतिक कार्यकर्ते प्रणव परब यांनी केली आहे.
परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपण स्वतः एक नाट्यक्षेत्रातील सक्रिय कलाकार आहे. त्यामुळे गोव्यातील संस्कृतीचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यानेच एका कलाकारावर केलेल्या या जहाल हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो.
ही वर्तणूक केवळ अस्वीकार्यच नाही, तर अत्यंत धोकादायक आहे. कारण ती राज्यातील प्रत्येक कलाकाराला असा इशारा देते की, ‘तुम्ही आवाज उठवलात, तर तुमच्यावर हल्ला होईल.’
त्यांनी पुढे म्हटले आहे की, भाजप सरकारचा कलाकार, लेखक आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांप्रतीचा अपमान आता सतत घडणारी गोष्ट बनली आहे. सर्जनशील अभिव्यक्तीला चालना देण्याऐवजी हे सरकार कलाविश्वाचे राजकारण करून आपल्या विचारधारेत न बसणाऱ्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न करीत आहे.
यात भर म्हणजे, कला अकादमीतील सदोष प्रकाश योजनेचे उदाहरण देता येईल. जगभरातील नामवंत कलाकारांनी याच व्यासपीठावर आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. आज तीच संस्था भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे दुर्लक्षित व कोलमडलेल्या अवस्थेत आहे. गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेल्या या संस्थेची झालेली ही दुर्दशा लज्जास्पद आहे.
नाट्यगृहातील तांत्रिक अपयशाची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी गावडे यांनी कलाकारांवर टीका केली. त्यांनी नाटकाच्या टीमची आणि गोमंतकीय जनतेची माफी मागायला हवी होती. काँग्रेस पक्ष केवळ गावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करत नाही, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्काळ गावडे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी करतो. जे मंत्री कलाकारांचा अपमान करतात आणि सांस्कृतिक संस्थांचे रक्षण करण्यात अपयशी ठरतात, अशांना कला आणि संस्कृती खात्याचा कार्यभार सांभाळण्याचा नैतिक अधिकारच नसल्याचे परब यांनी नमूद केले आहे.
कलाकार हे कोणत्याही समाजाचा आत्मा असतात. त्यांच्यावर असे अपमानास्पद हल्ले करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेवरच हल्ला होय. काँग्रेस पक्ष गोव्यातील प्रत्येक कलाकार, सादरकर्ते व सांस्कृतिक योगदान देणाऱ्या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. भाजपच्या द्वेषमूलक आणि दडपशाहीच्या राजकारणातून राज्याची समृद्ध संस्कृती नष्ट होऊ देणार नाही, असे परब यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.