
पणजी: कला अकादमी ही कुणा शहाजहाँची मालमत्ता नव्हे! तसा कुणाचा समज झाला असल्यास तो निव्वळ भ्रम आहे. कलाकार व रसिकांसाठी या वास्तूचे महत्त्व केवळ शब्दातीत. नूतनीकरणाच्या नावाखाली कला अकादमीची घालवलेली रया आणि निर्माण झालेल्या अक्षम्य त्रुटी सरकारच्या नजरेस आणून देणाऱ्यांना विरोधक ठरवले जात आहे. जो कुणी समस्या दाखवून देईल, त्याचे निर्दालन करण्याची प्रवृत्ती बळावली आहे.
कला व संस्कृती मंत्री गावडे यांची कालची पत्रकार परिषद त्याचाच परिपाक होता. कला अकादमीत ‘पुरुष’ नाटकाच्या सादरीकरणावेळी प्रकाशयोजनेचा झालेला घोळ व नाट्यरसिकांचा झालेला रसभंग सर्वश्रुत आहे. त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. दोन फ्लड लाइट्स वापरून सपाट प्रकाशयोजनेत उपरोक्त नाटक सादर करावे लागले. परंतु अडथळा निर्माण झाला हे सत्य असूनही त्या संदर्भात साधी दिलगिरी सोडाच, उलटपक्षी घडलेला प्रकार मानवनिर्मित नसून तांत्रिक होता व केवळ दोन मिनिटांचा होता, असे अत्यंत सहजपणे सांगून मंत्री गावडे यांनी बेजबाबदारपणे हात झटकले.
इतकेच नाही तर अभिनेते शरद पोंक्षे यांना ‘सुपारी घेणारे’ असे जे संबोधले ते आक्षेपार्ह आहे. विहित रक्कम भरून कला अकादमीत पोंक्षे व टीमने नाटक सादर केले. स्वत:चे पैसे खर्चून स्वत:च्या ध्वनिसामग्रीचा वापर केला. अचानक प्रकाशयोजनेत अडथळा आल्यानेच पडदा टाकावा लागला. तिकिटे काढून नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांप्रति दायित्व समजून पोंक्षे यांनी त्यांचा दोष नसतानाही दिलगिरी व्यक्त करण्याची दिलदारी दाखवली.
जे लोक पैसे देऊन नाटक पाहायला आले, त्यांना नेमके काय झाले आहे, हे सांगणे अपरिहार्यच होते. दुसरे असे, व्यथा मांडायला पोंक्षे यांनी काही पत्रकार परिषद घेतली नव्हती. तर पत्रकारांनी त्यांना गाठल्याने त्यांनी विदारक अनुभवावर भाष्य केले, ज्यात काही गैर नव्हते. या साऱ्या प्रकारात पोंक्षे यांनी सुपारी घेण्याचा प्रश्न येतोच कुठे? गोव्याच्या सुपीक जमिनीत पोफळी विपुल आहेत. त्यामुळे, गोविंदविड्यात अन्य बहुगुणी गोष्टींसोबत सुपारी घालण्यासाठी ती द्यावी किंवा घ्यावी लागत नाही!
प्रकाशयोजनेसंदर्भात टीका होणे क्रमप्राप्त होते. झालेल्या प्रकारावर मंत्री गावडे यांनी खेद व्यक्त केला असता तर ते भरून पावले असते. पण, त्यांनी पोंक्षे यांच्यावर दुगाण्या झाडण्यात धन्यता मानली. ‘तुम्ही गैर लोकांच्या नादात फसलात’, अशा शब्दांत त्यांनी आरोप केले. आता ही कोण गैरमाणसे? तीही जाहीर करायची होती. सरकार नियुक्त विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखालील कृती समितीवरही गावडे यांनी तोंडसुख घेतले आहे. प्रश्न विचारणारे पत्रकारही त्यांना नकोसे वाटतात. असे चेहरे समोर आल्यावर ओळखपत्र विचारण्याची त्यांना गरज भासते. ही मुस्कटदाबी कोणत्या अधिकाराने सुरू आहे? पोंक्षे काय चुकीचे बोलले होते? गावडे यांचा आरोप कलाकारांचा अपमान करणारा आहे. अशी बदनामी व तिरस्कार होत असेल तर कलासंपन्नतेचा वारसा लाभलेल्या गोव्याची बदनामीच होईल.
आणखी एक मुद्दा - नाट्यगृहात प्रकाशयोजनेसाठी ज्या प्रकारची प्रणाली बसविली आहे, त्यातील त्रुटी मान्य करून गेल्या जुलै महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नेमलेल्या समितीने जे उपाय सुचविले होते, त्यानुसारच यापुढे पावले उचलण्याचे कला व संस्कृती मंत्र्यांनी ठरविले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी बांधकाम खात्याकडून नेमलेल्या समितीचे अस्तित्वच संबंधित मानत नव्हते. पोंक्षे यांनी या नाट्यप्रयोगादरम्यान स्वतःची ध्वनियंत्रणा वापरण्यासंबंधीचे विधान केले होते, तेदेखील गावडे यांनी खोडून काढले.
त्यांच्या संस्थेने वापरलेली ध्वनिसाधने नाट्यगृहाच्या मुख्य यंत्रणेला जोडली गेली होती, असा त्यांचा दावा. पण, किमान ध्वनिसाधने वापरावी लागणे हीदेखील नामुष्कीच नव्हे का? प्रकाशयोजनाप्रणाली मुळातच नूतनीकरणावेळी कशी व का बसविली, याचा खुलासा करण्याऐवजी बगल का द्यावी लागली? पोंक्षे यांनी नाट्यगृहातील वातानुकूलन व्यवस्था, त्यातून ठिबकणारे पाणी याविषयी केलेल्या तक्रारींबद्दल मंत्र्यांनी शब्दही उच्चारला नाही. याचाच अर्थ गावडे सोयीस्कर भूमिका घेत आले आहेत.
प्रकाशयोजनेत घोळ झाला हे मंत्री महोदयांना मान्य आहे. पण तो तांत्रिक होता असे सांगून झालेल्या रसभंगावर लेपन होत नाही. कोट्यवधी खर्चूनही आजतागायत ज्या-ज्या समस्या दिसून आल्या, त्या गावडे यांनी फेटाळून लावल्या. उलट जे डोळस आहेत त्यांना आंधळे ठरवले जात आहे. कला अकादमी म्हणजे काही आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ नाही. उठसूठ विडे उचलण्याचे वा सुपारी बहाद्दरांच्या बैठकीचे ते ठिकाणही नाही. समस्या दाखवणारे कुणी तुमचे शत्रू नाहीत.
कला अकादमी जर बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत आहे, काम अपूर्णावस्थेत आहे, तर अकादमीचा वापर केला जाणेच अयोग्य आहे. बांधकाम खात्याचे नाव पुढे करता तर त्यांना पुढे येऊन उत्तरे देऊ द्या. स्वत:लाच उत्तरे द्यायची असतील, तर प्रश्न विचारू द्या; ओळखपत्रे विचारीत बसू नका. त्याअभावी प्रश्न विचारण्याचा अधिकारही डावलू नका. कर नाही, तर डर कशाला? पोंक्षे जातिवंत अभिनेते आहेत, म्हणूनच त्यांनी प्रेक्षकांची क्षमा मागितली. शेवटी काहीही झाले तरी नेता आणि अभिनेता यात फरक असतोच!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.