Goa Bench Hearing About Porvorim Flyover
पणजी: पर्वरी येथील उड्डाण पुलाच्या कामामुळे तेथील वाहतुकीत कोणतीही समस्या होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था व सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार ६० ते ७० टक्केच कामाचे अनुपालन झाले.
उर्वरित काम पुढील सुनावणीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने देत ही सुनावणी सोमवारी (६ जानेवारी) ठेवली आहे.
मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने विविध सोयीसुविधांसंदर्भात केलेल्या निर्देशानुसार आज अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या सोयीसुविधा तसेच रस्त्यांचे डांबरीकरण दहा दिवसांत पूर्ण करण्याची हमी कंत्राटदाराने दिली होती. मात्र प्रत्यक्षात ही कामे पूर्ण करण्यात आली नाही हे अहवालावरून दिसून आले.
दामियन दी गोवा ते हुंडाई शोरूमपर्यंत रुंदीकरण केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्णपणे झाले नाही. ओ कोकेरो जंक्शन ते पीडब्ल्यूडी पाण्याच्या टाकीपर्यंत रस्त्या डांबरीकरण अर्धवट झाले आहे. महागार्गाच्या काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूने असलेले दिव्यांचे खांब हटवून दिवाबत्तीचे काम तसेच टान्स्फॉर्मर्स हटवण्याचे काम झालेले नाही.
या रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रणासाठी कंत्राटदाराला ३० वाहतूक मदतीस नेमण्यास सांगण्यात आले होते, मात्र १५ जणांचीच नेमणूक केली आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर माहिती दर्शक फलक लावण्यास सांगण्यात आले होते ते कामही अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ही अर्धवट राहिलेली कामे पुढील सुनावणीपर्यंत पूर्ण करून अनुपालन अहवाल द्यावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
वाहतुकीला अडथळा ठरत असलेला व रस्ता रुंदीकरणासाठी मॉल दी गोवा येथील पक्का गाळा तसेच संरक्षक भिंत पाडण्यात आली आहे. सांगोल्डा जंक्शन येथे पाण्याचा होणारा निचरा बंद करण्यात आला. १०८ रुग्णवाहिका पर्वरी आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असते व त्याचा वापर करणे शक्य आहे. तात्पुरते ट्रोमा केंद्र स्थापन करण्याचे काम सुरू आहे. आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीत हे केंद्र कायमस्वरुपी स्थापन केले जाईल,असे अहवालात म्हटले आहे.
लोकांच्या माहितीसाठी पर्वरी पोलिस स्थानक क्रमांक, ट्रोमा केंद्राचा क्रमांक , गोवा पोलिस हेल्पलाईन तसेच पर्वरी वाहतूक पोलिस क्रमांक याची माहिती देणारे फलक अजूनही लावण्यात आलेले नाहीत. सांगोल्डा येथील डांबरीकरणाचा एक थर झाला असून त्यावर दुसरा थर घातलेला नाही. शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय ते जलस्रोत खात्यापर्यंतचा रस्ता अजूनही दुरुस्त व्हायचा आहे. त्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू आहे, मात्र तेथील खड्डे तातडीने बुजवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मॉल दी गोवा व साई सर्कल येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे, असे अनुपालन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.