

Art festival Goa : येत्या शुक्रवारपासून (ता.२०) गोवा ओपन आर्टस फेस्टिवलची तिसरी आवृत्ती पणजीतील ओल्ड जीएमसी येथे सुरू होत आहे. कला, संस्कृती, संगीत, नृत्य, सादरीकरण आणि सिनेमा यांचा हा पाच दिवसांचा उत्सव गोव्यातील सर्जनशील समुदायाचा एक उत्साही मेळावा असेल. विविध कार्यशाळा आणि उत्तमोत्तम अन्नपदार्थ यामुळे हा महोत्सव एकत्र येण्याचे आणि गोव्यातील सर्जनशील ऊर्जेचा शोध घेण्याचे ठिकाण असेल.
महोत्सवातील ‘लाईव्ह बॉक्स’ या रंगमंचावर एव्रील उंगर यांनी क्युरेट केलेले क्विअर सादरीकरण, ढाई अखरचे ‘कथा रंग’ हे वाचन सत्र, रुणाल कोलकणकर यांनी दिग्दर्शित केलेले ''अनरिटन'' हे शरीर नाट्य, आसावरी गुरव यांचे ‘एग्सिस्टेंशिअल क्रॅक्सिस’, डेबिट के यांचे ''निखिल, इफ इट्स नॉट टू लेट'', ज्ञानेश मोघे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रकार वामन नावेलकर यांच्या जीवनावर आधारित ‘ॲट द एड्ज ऑफ दि वोल्कॅनो'' हे नाटक इत्यादी नाट्यसादरीकरणे या महोत्सवात सादर होणार आहे.
महोत्सवाच्या म्युझिक स्टेजवर शेल्डन फोन्सेका, द बंजारा ट्रीओ, द लोजल एक्सपिरीयन्स, अनिका भारवाणी, जाझमाताझ, मेनिक्विन डिझॉर्डर, जीजेए कलेक्टिव्ह, बोंजिसिओ गोअनबायब्लड, शिवम अँड द जिप्सीज यांचे संगीत सादरीकरण त्या महोत्सवात अनुभवता येईल.
४१ कलाकारांचे दृश्य कला प्रदर्शन, १९ दिग्दर्शकांच्या सिनेमांचे प्रदर्शन, अंजुम राजाबाली यांचे पटकथा या विषयावरील तसेच संजय दिवेचा यांची संगीत विषयक कार्यशाळा, लहान मुलांसाठी विविध विषयावरील सुमारे १७ तसेच प्रौढांसाठी विविध विषयावरील ११ कार्यशाळा असा भरगच्च कार्यक्रम या महोत्सवात आपल्याला अनुभवता येईल.
महोत्सवाच्या ठिकाणी प्रथमच एक लाईव्ह स्केट पार्क उभारले जाणार आहे. स्केटिंग या खेळाबद्दल जाणून घेण्यासाठी आणि ते शिकण्याचा आनंद घेण्याच्या दृष्टीने हा पार्क डिझाईन केला गेला आहे. एक नवीन मजेदार खेळाशी संबंध जोडायचा असेल तर महोत्सवातील ही जागा तुम्हाला नक्की ती संधी देईल. या महोत्सवातील बहुतेक कार्यक्रम निशुल्क आहेत. काही विशेष कार्यक्रम मात्र सशुल्क आहेत. या महोत्सवातील कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून
घेण्यासाठी आणि महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी गोवा ओपन आर्ट्सच्या संकेतस्थळावर किंवा महोत्सवाच्या ठिकाणी आपली नोंदणी करता येईल. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.